कालव्यात पडलेल्या चितळाला दिले जीवदान

कालव्यात पडलेल्या चितळाला दिले जीवदान
(स्वाब बचाव दल व वन विभाग ने सहा तास चालविली मोहीम)
तळोधी(बा.):
तळोदी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या आलेवाही बीटातील खरकाळा गावाजवळ गोसीखुर्द कालव्यामध्ये काल चितळ पडल्याची माहिती स्वाब संस्थेचे पदाधिकारी व वनविभागाला मिळाली त्यानुसार सायंकाळला या चितळाला सुरक्षित काढण्याकरिता बचाव मोहीम राबविण्यात आली. सायंकाळी साडेपाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत सलग सहा तास ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी स्वाब संस्थेचे बचाव दल प्रमुख जीवेश सयाम, अध्यक्ष यश कायरकर, गणेश गुरणुले, आदित्य नान्हे यांनी कालव्यामध्ये उतरून चार किलोमीटर या चितळाचा पाठलाग करीत या चितळाला सुरक्षित दोराद्वारे पकडून कालव्याच्या बाहेर काढले  व सोडले असता त्याने जंगलाच्या दिशेने रात्रीच्या अंधारातच धुम ठोकली. अशाप्रकारे अंदाजे सात ते आठ वर्षे वयाच्या या नर चितळाला रात्रीच्या अंधारात सुरक्षित मोहीम राबवून जीवदान  देण्यात आले. यावेळेस वन विभागाचे आलेवाही बीटचे वनरक्षक पंडित मेकेवाड, स्वाब बचाव दल प्रमुख जीवेश सयाम, अध्यक्ष यश कायरकर, शिक्षण विभाग प्रमुख नितीन भेंडाळे, पदाधिकारी गणेश गुरनुले, आदित्य नान्हे , अनमोल सेलोकर, साहिल अगळे हे स्वाब सदस्य, वन चौकीदार देवेंद्र उईके, वन मजूर वामन निकुरे उपस्थित होते.
              विशेष म्हणजे पवनी कडून चंद्रपूर कडे जाणारा हा गोसेखुर्द चा कालवा संपूर्ण तळोधी वनपरिक्षेत्रात च्या जंगलातून जात असल्यामुळे व हा कालवा खुला असल्यामुळे सतत या कालव्यामध्ये नागभीड व तळोधी वनपरिक्षेत्रातील वन्यप्राणी पडत असतात. काही महिन्यांपूर्वी नागभीड वनपरिक्षेत्रात एक रानगवा, त्यानंतर तळोधी वनपरिक्षेत्रामध्ये एक नीलगाय, त्यानंतर रानटी डुकरे, काही दिवसांपूर्वी पूर्वी तर पाच चितळे, आणि पाळीव गाय, बैल ,म्हशी, या कालव्यात सतत पडत असतात. सध्या कालवा सुरू करण्यात आला नसल्यामुळे कालव्यामध्ये साचलेला पाणी ही कमरेपर्यंतच किंवा कुठे पांच फुटच असल्यामुळे या प्राण्यांची जीवित हानी झालेली नाही. अशा वन्यप्राण्यांना स्वाब बचाव दल व वन विभागामार्फत सुरक्षित काठण्यात आले. मात्र ज्या दिवशी हा कालव्याचे पाणी सुरू होऊन आठ ते दहा फूट पाण्याचा प्रवाह असेल तेव्हा मात्र सतत वन्यजीव या कालव्यात पडून मेल्याच्या घटना ही घडतीलच. तळोधी - शिंदेवाही व नागभीड वनपरिक्षेत्रातून एका बाजूने हा कालवा तर त्याच्याच दुसऱ्या बाजूने गोंदिया - बल्लारशा रेल्वे ट्रॅक असल्यामुळे गोंदिया बल्लारशा रेल्वे ट्रॅकवर वाघ, चितळ, सांबर, रानगवे, अस्वली, बिबट यांचे मृत्यूच्या घटना ह्या सतत घडत असतात. तर आता या कालव्यामुळे या कालव्यातही पडून वन्यजीव मेल्याच्या घटना घडतीलच. त्यामुळे आता या जंगलात वावरणाऱ्या वन्यजीवांकरिता 'इकडं खाई तिकडे विहीर' अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
"या कालव्यावरून वन्यजीवांना ये जा करण्याकरिता जागोजागी काही अंतरावर पूल व कालव्यातून चढण्याकरता पायऱ्या बनवणे गरजेचे आहे. वारंवार या घटना घडत असून याबद्दल प्रसार माध्यमाद्वारे वारंवार लिहिल्या जात आहे. व तशी मागणी निवेदनाद्वारे आमच्या संस्थेद्वारे वारंवार होत असते. मात्र प्रशासन व गोसीखुर्द बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने वन्यजीवांची मोठी जीवित हानी टाळता येणार नाही. याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे." - यश कायरकर, वन्यजीव प्रेमी व अध्यक्ष 'स्वाब फाउंडेशन'.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!