शाळकरी मुलांचे बांधकाम विभागात आंदोलन - सावली ते हरंबा रस्त्याचे कामाची मागणी @ रस्ता नादुरुस्तीमुळे मार्गावरील बस बंदचा शिक्षणावर परिणाम
सावली – सावली ते हरंबा रस्त्यावर मोठ- मोठे खड्डे पडल्यामुळे रहदारीस अडचण येत आहे. बस वाहतुकीस अडचण येत असल्याने महामंडळाने मार्गावरील बसच बंद केली असून या मार्गावरील शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात रस्त्याचे काम करावे या मागणीसाठी आंदोलन केले.
सावली ते हरंबा मार्गांवर जवळपास ११-१२ गावचे नागरिक शिक्षणासाठी, बाजारासाठी, दवाखान्यासाठी व इतर कामासाठी प्रवास करतात. मात्र हा मार्ग जडवाहतुकीमुळे पूर्णतः उखडलेला असून पायी चालणेही कठीण झालेले आहे. अनेक अपघात या मार्गांवर घडले आहेत. या मार्गांवर जवळपास ५०० विद्यार्थी सावली येथे शिक्षणासाठी येत असतात. रस्ता खराब असल्यामुळे या मार्गावरील महामंडळाची बस फेरी बंद झाली असून याचा परिणाम शाळकरी मुलांवर होत असून विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आक्रोश करीत सावली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढत ठिय्या मांडला व रस्त्याचे काम करण्याची जोरदार मागणी केली.
रस्त्याचे काम मंजूर मात्र निधीअभावी रखडले बांधकाम
मागील तीन वर्षांपासून या मार्गाचे काम मंजूर असून वालिया, नितीन वायलालवार, प्रमोद कॅन्स्ट्रक्शन, अमृत कॅन्स्ट्रक्शन अशा ६ कंत्राटदारांकडे काम आहे. रस्त्याची किंमत २७ कोटीची आहे मात्र शासन कामाचा निधीच देत नसल्याने कंत्राटदार काम करीत नसल्याची माहिती आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!