माँ महिला बचत गटावरील आरोप खोटे!
अधिकृत चौकशीत गट निर्दोष; नऊ महिलांचे लिखित निवेदन
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील जांभूळघाट येथील माँ महिला बचत गट हे मागील सहा वर्षांपासून शासनाचे स्वस्त धान्य दुकान नियमानुसार चालवत आहे. या काळात गटाविरुद्ध कोणतीही तक्रार नोंदवली नव्हती. मात्र अलीकडेच गटाच्या सदस्य कांता सुधाकर मसराम यांनी अध्यक्ष व सचिव यांच्यावर अपहार आणि कमिशनसंदर्भात गंभीर आरोप केले होते. या प्रकरणाची तहसीलदार, जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच निरीक्षण अधिकाऱ्यांकडून चौकशी झाली असता सर्व आरोप खोटे, निराधार आणि तथ्यहीन असल्याचे निष्पन्न झाले.
बचत गटाचे सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शक आणि नियमानुसार झाल्याचे सरकारी पत्रही गटाला प्राप्त झाले आहे. पत्रकार परिषदेत अध्यक्ष स्नेहा कोवे आणि सचिव रिना चौधरी यांनी माहिती देत सांगितले की, कांता मसराम यांनी सुरुवातीपासून खोट्या सह्या व खोटी माहिती तयार करून लोकांची दिशाभूल केली आहे. गटातील १० पैकी ९ महिलांनी गटाच्या समर्थनार्थ अधिकाऱ्यांना लिखित निवेदन दिले असून, कांता मसराम यांनी "सर्व महिला माझ्या बाजूला आहेत" हा केलेला दावा चुकीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महिलांनी सांगितले की, आरोप करणाऱ्या कांता मसराम यांच्या वक्तव्यांत अनेक विसंगती आढळून आल्या. त्यांनी स्वतः एका पत्रकार परिषदेत उपस्थित असल्याचा दावा केला असला तरी त्या दिवशी सकाळी ११ ते सायं ५ या वेळेत त्या स्वस्त धान्य दुकानातच उपस्थित असल्याचे नोंदींवरून स्पष्ट झाले आहे. तसेच सहा महिन्यांपूर्वी सचिव रिना चौधरी या धान्य बाजारात विकतात, असा केलेला आरोपही पूर्णपणे तथ्यहीन असल्याचे महिलांनी सांगितले. उलट, गटातून एक लाख रुपये मागून ते न मिळाल्याने गटाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी आरोप केले.
या सर्व घटनांमुळे समाजात अफवा, गैरसमज आणि महिलांविषयी अविश्वास निर्माण झाल्याचे गटातील सदस्यांनी सांगितले. खोटी माहिती पसरवून दिशाभूल केल्याबद्दल कांता मसराम यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे तसेच माध्यमांमधून प्रसिद्ध झालेल्या खोट्या बातम्यांविरुद्ध न्यायालयीन दाद मागणार असल्याचे अध्यक्ष स्नेहा कोवे व सचिव रीना चौधरी यांनी जाहीर केले. पत्रकार परिषदेला सीमा गजभे, प्रेमीला गोंगले, अरुणा गजभे, तुळसा गजभे, निर्मला गजभे, कल्पना नागोसे व माधुरी मसराम अशा नऊ महिला सदस्य उपस्थित होत्या.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!