शासकीय नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची १०.५ लाखांची फसवणूक!

 

शासकीय नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची १०.५ लाखांची फसवणूक!

नगर परिषद मुल येथे बाबूची जागा लावून देण्याच्या नावाखाली दोन आरोपींनी आर्थिक फसवणूक केल्याची गंभीर तक्रार पोलीस ठाण्यात दाखल


मुल (जिल्हा चंद्रपूर) | शासकीय नोकरी मिळविण्याच्या आशेने एका तरुणाने आपल्या कुटुंबाची शेती विकून व साठवलेली रक्कम देत दिले, मात्र त्या विश्वासाचा गैरफायदा घेत, दोन इसमांनी एकूण १० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना मुल शहरात उघडकीस आली आहे.

परसोडा (ता. कोरपणा) येथील साईश्वर भालचंद्र पुलगमवार (वय २१) यांनी मुल पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, राजेश उर्फ राजू पुद्दटवार (रा. गुजरी चौक, मुल) व प्रशांत उर्फ नाना आक्केवार (रा. पंचशील वॉर्ड, मुल) या दोघांनी नगर परिषद, मुल येथे बाबू पदावर शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले.

साईश्वर यांचे भाऊजी दिगंबर डुग्गेवार यांच्यामार्फत या आरोपींची ओळख झाली होती. राजेश पुद्दटवार नगर परिषदेतच बाबू पदावर कार्यरत असून, त्याने आपल्या सहकाऱ्यासह, प्रशांत आक्केवार याच्या मुंबईतील 'ओळखींच्या' आधारावर ही नोकरी नक्की लावून देतो असे ठासून सांगितले.

साईश्वर यांनी टप्प्याटप्याने रक्कम देण्याचे मान्य केले. त्यानुसार त्यांनी ०४ मार्च २०२५ ते २६ एप्रिल २०२५ या काळात गुगल पे तसेच नगद स्वरूपात एकूण १० लाख ५० हजार रुपये संबंधितांना दिले. या व्यवहारांमध्ये मुल येथील विविध ठिकाणी रक्कम दिल्याचे नमूद आहे. यामध्ये क्रिडा संकुल समोर, नगर परिषद कार्यालय, बाजार समिती इ. ठिकाणांचा समावेश आहे.

परंतु नंतर साईश्वर यांना संशय येऊ लागला. कारण, नोकरीबाबत काहीही लिखित वा अधिकृत घडत नव्हते. त्यांनी नगर परिषदेतील मित्रांकडून चौकशी केली असता, कोणत्याही बाबूच्या जागा निघाल्या नसल्याचे स्पष्ट झाले. अखेर ०५ मे २०२५ रोजी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी प्रसिध्द केलेल्या जाहीर नोटीत देखील नगर परिषदेत कोणत्याही जागा न निघाल्याचे घोषित करण्यात आले.

यानंतर तक्रारदार साईश्वर पुलगमवार यांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊन न्याय मागितला आहे. पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन मुल यांच्याकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 🔍 घटनाक्रम टप्याटप्याने:

फेब्रुवारी २०२५:

नगर परिषद, मुल येथील बाबू पदासाठी जागा भरती होणार असल्याचे सांगून राजेश पुद्दटवार यांनी साईश्वर पुलगमवार यांचे भाऊजी दिगंबर डुग्गेवार यांच्याशी संपर्क साधला.

मार्च २०२५:

साईश्वर पुलगमवार आणि त्यांचे भाऊजी राजेश पुद्दटवार यांची भेट घेण्यासाठी नगर परिषद, मुल येथे गेले.

पुद्दटवार यांच्यासोबत प्रशांत उर्फ नाना आक्केवार हा दुसरा व्यक्तीही उपस्थित होता. दोघांनी मिळून शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले.

१० ते १२ लाखांची रक्कम लागेल असे सांगून टप्प्याटप्याने पैसे घेतले जातील, असे आरोपींनी सांगितले.

प्रशांत आक्केवार याचा Google Pay नंबर देऊन तिथे पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले.

💸 फसवणुकीचा आर्थिक तपशील:

दि. २०/०२/२०२५ – ₹२,५०,०००/- रोख, क्रिडा संकुलजवळ प्रशांत आक्केवार यास दिले.

दि. २१/०२/२०२५ – ₹५०,०००/- रोख, नगर परिषदजवळ प्रशांत आक्केवार यास दिले.

दि. ०४/०३/२०२५ ते २६/०४/२०२५ – ₹१,५०,०००/- प्रशांतच्या Google Pay वर ट्रान्सफर.

दि. ०६/०३/२०२५ – ₹३,००,०००/- रोख, नगर परिषद कार्यालयात राजेश पुद्दटवार यास दिले.

दि. ०७/०३/२०२५ – ₹३,००,०००/- रोख, बाजार समिती समोर प्रशांत आक्केवार यास दिले.

🔸 एकूण फसवणूक रक्कम: ₹१०,५०,०००/-

⚠️ संशयाची सुरूवात:

नोकरीसंबंधी कोणतीही अधिकृत भरती प्रक्रिया सुरु नसल्याची माहिती साईश्वरने मित्रांमार्फत घेतली.

आरोपीकडून वारंवार उडवाउडवीची उत्तरे येत असल्यामुळे शंका वाढली.

दि. ०५/०५/२०२५ – नगर परिषद, मुल यांनी प्रेस नोटद्वारे स्पष्टीकरण दिले की, कोणत्याही बाबूच्या जागा निघालेल्या नाहीत.

📝 पोलीस तक्रार व मागणी:

साईश्वर पुलगमवार यांनी दि. १०/०६/२०२५ रोजी पोलीस स्टेशन, मुल येथे तक्रार दाखल केली.

राजेश पुद्दटवार व प्रशांत आक्केवार यांच्याविरोधात संगनमत करून फसवणूक केल्याचा आरोप.

कायदेशीर कारवाईची मागणी.

मूल नगर परिषदेचा भरती घोटाळा मागील काही महिण्यापासून चांगलाच चर्चेत आला होता.  मात्र तक्रार दिल्यास, आपले पैसे परत मिळणार नाही अशी धमकी राजेश—नाना ने दिल्यांने पोलिसांत तक्रार झाली नव्हती.  आता यांनी तक्रार दाखल केल्यामुळे पोलिस आरोपीच्या विरोधात गुन्हे दाखल करतील अशी अपेक्षा होती. मात्र तक्रारीनंतर 24 तास उलटूनही, मूल पोलिसांनी या तक्रारीवर कोणतीही कारवाई केलेली नाही.  बनावट जाहीरात तयार करून, ती समाज माध्यमात फिरविणे, नौकरीचे अमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणे हे गंभीर गुन्हे असतांनाही, पोलिसांनी मात्र अजुनपर्यंत गुन्हे दाखल केले नाही.  या संदर्भात आमचे प्रतिनिधीने ठाणेदार वंजारी यांचेशी संपर्क साधला असता, त्यांनी तक्रार मिळाल्यांचे मान्य केले व सायंकाळ पर्यंत मुख्याधिकारी यांचेशी प्रकरण आणखी समजावून घेवून गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करणार असल्यांचे सांगीतले.  

या प्रकरणात राजेश—नाना जोडीने अनेक युवकांकडून करोडो रूपये वसुल केले असून, या दोघांसोबत आणखी कोण बडे आसामी आहेत याची चौकशी होणे आवश्यक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!