७० हजार द्या, अंगणवाडी सेविकेची पदोन्नती घ्या.. @ सावली तालुक्यात एका दाम्पत्याकडून पदाची ऑफर.. महिला बाल विकास विभाग अनभिज्ञ!
सावली - तुमच्या अंगणवाडी केंद्रातील सेविका निवृत्त होत आहेत. तुम्ही मदतनीस असल्याने त्या जागेवर पदोन्नती पाहिजे असल्यास ७० हजार रुपये व कागदपत्र जमा करा असा आदेशच देण्याचे काम सावली तालुक्यातील एका दाम्पत्याकडून होत असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. सदर दाम्पत्यामध्ये महिला ही एका अंगणवाडी केंद्राची सेविका असल्याने यात महिला बाल विकास विभागाचा हात तर नाही ना? अशी शंकाही वर्तविल्या जात आहे.
बालक, गर्भवती महिला, स्तनदा माता, युवती, महिलांसाठी विशेष संपर्कात राहून काम करणारी व्यक्ती म्हणून अंगणवाडी सेविका पदाकडे बघितल्या जाते. बालपणापासून स्वछतेचे व शिक्षणाचे धडे देणे, मुलांना व मातांना पौष्टिक आहार देण्यासोबतच आरोग्यविषयक जनजागृती करण्याचे अंगणवाडी सेविका व मदतनीसचे असते. अंगणवाडी केंद्रात मदतनीस व सेविका हे दोन पदे मानधन तत्वावर असतात. ज्यावेळेस सेविकेचे पद रिक्त होते तेव्हा शैक्षणिक पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या मदतनीसला सेविका पदावर पदोन्नती बढती देण्याचा परिपत्रक आहे.
सावली तालुक्यात एप्रिल महिन्याचे शेवटी पेंढरी क्र २, पिरंजी माल, करोली, निमगाव क्र. १ व क्र. २, विरखल, मंगरमेंढा या ७ अंगणवाडी केंद्रातील सेविका सेवानिवृत्त होत आहेत त्यामुळे त्या जागा रिक्त होणार आहेत. ही संधी साधून एक दाम्पत्य ज्या अंगणवाडीत सेविका पद रिक्त होणार आहे त्या मदतनीससोबत संपर्क साधत ७० हजार रुपये द्या पदोन्नती मिळवा अशी ऑफर देत असल्याचे कॉल रेकॉर्डिंग आमचे प्रतिनिधीचे हाती लागले आहे. "मागील भरतीत मदतनीसला दीड लाख तर सेविकासाठी तीन लाख रुपये डोनेशन द्यावे लागले. तुम्हाला तर फार कमी पैशात नोकरीं मिळत आहे. तीन चार महिन्याचा पगारच जात आहे पण कायमची नोकरी मिळत आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका" असाही आग्रह करतांना दिसत आहे. ऑफर देणाऱ्या पती - पत्नी दाम्पत्यामध्ये पत्नी ही एका केंद्राची अंगणवाडी सेविका असल्याचे कळते. यावरून हे दाम्पत्य महिला बाल विकास विभागाचे हस्तक तर नसतील अशीही चर्चा आहे. याबाबत विभागाचे अधिकारीशी चर्चा केली असता याबाबत आम्हाला काहीच माहिती नसल्याचे सांगितले.
सद्या कोणत्याही अंगणवाडी केंद्रात सेविकेचे पद रिक्त नाही. रिक्त झाल्यानंतरही शासनाचे आदेश आल्यानंतरच भरती प्रक्रिया राबविल्या जाते. त्यामुळे भरती, पदोन्नती साठी कोणी भुलथापा देत आर्थिक फसवणूक करीत असतील तर त्यास बळी पडू नये.
अलंकार मरस्कोले
प्रभारी प्रकल्प अधिकारी
महिला बाल कल्याण विभाग सावली
अंगणवाडी केंद्रात सेविका पद रिक्त झाल्यास शासकीय परिपत्रकानुसार मदतनीसला प्राधान्य दिल्या जाते. त्यामुळे प्रलोभन देऊन कोणी आर्थिक फसवणूक करीत असल्यास त्यास बळी पडू नये. कोणासोबतही आर्थिक व्यवहार करू नये.विजय कोरेवारमाजी सभापती पं. स. सावली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!