कार - दुचाकी अपघातात गंभीर जखमी असलेल्या दुचाकी चालकावर गुन्हा दाखल - कारचालकास मोकाट सोडण्याचा सावली पोलिसांचा प्रताप


अपघातात पाय गमावलेला नितेश 

सावली - सावलीवरून खेडीला दुचाकीने येणाऱ्या युवकांवर कारने जबर धडक दिल्याने दुचाकीचालक गंभीर जखमी झाले. मात्र सावली पोलिसांनी कार चालकावर कारवाई करण्याचे सोडुन गंभीर जखमी असलेल्या दुचाकी चालकावर गुन्हा दाखल केल्याने सावली पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण होत आहे.

      30 ऑक्टोबर 2024 रोजी रात्रौ 9 वाजताचे दरम्यान नितेश येनुगवार व बंडू म्यानावार हे सावली वरून खेडीला आपल्या दुचाकीने जात होते. त्यावेळेस बोरकर यांचे गोडाऊन जवळ मागून येणारी गणेश सुधाकर बोम्मावार चालवत असलेल्या कारने दुचाकीस जबरदस्त धडक दिली. त्यात दुचाकी चालक नितेशच्या पायाला, डोळ्याला तर मागे बसलेल्या बंडूच्या पायाला गंभीर जखम झाली. भरधाव वेगाने असलेल्या कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून रोडच्या कडेला कार गेली. दुचाकीवर असलेल्या दोन्ही जखमीना सावली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दोन्ही जखमीवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी चंद्रपूरला रेफर केले. मात्र त्या दरम्यान कारचालकाला दवाखान्यात भरती करण्याची गरज पडली नाही. नितेश येनुगवार याला इतकी दुखापत झाली की त्याचा डावा पाय कापावा लागला. दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीवर दोनदा शस्त्रक्रिया करावी लागली असून अजूनही उपचार सुरु आहे.

       सावली पोलिसांनी घटनेच्या रात्री कारचालक गणेश बोमावार याची फिर्याद घेऊन दुचाकी चालकावर भा.न्या.स. 281, 125(अ), 125(ब), मो. वा. अ.184,122,177 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वाहनाच्या अपघातात मोठ्या वाहन चालकावर गुन्हा दाखल होतो मात्र सदर प्रकरणात सावली पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप पुलूरवार यांनी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल केल्याने कायद्याचे जानकार आश्चर्य व्यक्त करीत आहेत. सदर प्रकरणात पोलिसांनी केलेल्या कारवाईवर संशय व्यक्त केल्या जात असून दुचाकी चालकावर गुन्हा दाखल तसा कार चालकावर का दाखल केला नाही? कार चालक अती भरधाव वेगाने गाडी चालवत असल्याने कार नियंत्रणात आली नाही यावरून कार चालक आरोपी नाही का? पोलिसांनी दुचाकी रस्त्याचे मधोमध चालवीत असल्याने आरोपी बनविले तर रस्त्याचे मधोमध जाणाऱ्यास कुचलण्याचा अधिकार कारचालकास दिला आहे का? अपघाताचेवेळी कारचालक दारूच्या नशेत असल्याचे अनेकांचे म्हणणे असतांना पोलिसांच्या लक्षात आले नाही का? असे अनेक प्रश्न पोलिसांचे तपासावर निर्माण होत आहे. कारचालक हा सरकारी नोकरीवर असल्याने त्याला या प्रकरणातून वाचविण्यासाठी "चोर सोडून सन्यासाला फासी" देण्याचा प्रकार घडल्याचे दिसून येत आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!