आधारभूत धान खरेदी नोंदणीस मुदतवाढीची मागणी - नोंदणी केंद्र गर्दीने फुलले

सावली येथील नोंदणी केंद्रावर 30 डिसेंबर 2024 ला नोंदणीसाठी उसळलेली शेतकऱ्यांची गर्दी - (छाया - कमलेश गेडाम सावली)

सावली (विजय कोरेवार) - आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान उत्पादक शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे मात्र शेतकऱ्यांची संख्या जास्त असतांना नोंदणी केंद्राची कमी संख्या, लिंक फेलची अडचण यामुळे अजूनही अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित आहेत. त्यामुळे नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

        शासनाने रब्बी हंगामातील धान खरेदी नोंदणीसाठी नोव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत मुदत दिली होती. परंतु खरेदी केंद्राने नोंदणीवर बहिष्कार टाकल्याने नोव्हेंबर महिन्यात एकही नोंदणी झाली नाही. डिसेंबर मध्ये ऑनलाईन नोंदणीला सुरवात झाली मात्र कालावधी कमी असल्याने शेतकऱ्यांना नोंदणी करता आली नाही. त्यामुळे शासनाने 31 डिसेंबर पर्यंत नोंदणी मुदत वाढवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेक्टरी 20 हजार रुपये बोनस जाहीर केल्याने नोंदणीसाठी शेतकरी गर्दी करू लागले. नोंदणी केंद्राची संख्या कमी असल्याने 4-5 दिवस रांगेत राहिल्यावर नोंदणी होत असे. त्यातच लिंक फेलची अडचण येऊ लागली. शेवटचे दोन दिवस असतानाही शेकडो शेतकरी रांगेत आहेत, अर्जाचे गट्टे केंद्रात जमा केले आहेत,  बोनसपासून वंचित राहणार ही भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे शेतकरी बोनसपासून वंचित राहू नये म्हणून नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!