तर मला मंत्रीपद नको..! सुधीर मुनगंटीवार असे का म्हणाले?

 
तर मला मंत्रीपद नको..! सुधीर मुनगंटीवार असे का म्हणाले?

राज्यात महायुतीचे नवे सरकार आले आहे.  हे सरकार अजुनही पुर्णत्वाने अस्तित्वात आले नसले तरी, या मंत्रीमंडळात भाजपाचे जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार नसतील हे आता स्पष्ट झाले आहे.  आपल्या मंत्री पदाच्या काळात अनेक कल्पक योजना आणून, विकास कामे करून, चंद्रपूर जिल्हयाला नवी ओळख देणारे मुनगंटीवार यांना नव्या मंत्री मंडळात स्थान न दिल्यांने, त्यांच्या कार्यकर्त्यात, हितचिंतकात, चंद्रपूर जिल्हयातील विकासप्रेमी जनतेत नाराजी निर्माण करणारी आहे.  सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या कार्यकर्त्याना शांत राहण्याचा सल्ला दिल्यांने, फार मोठा उद्रेक झाला नसला तरी, जिल्हयात सुतक असल्याप्रमाणे वातावरण निर्माण झाले आहे.

सुधीर मुनगंटीवार यांचे मंत्रीपदावरील प्रश्नावर बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मुनगंटीवार यांचेसोबत आपली 'प्रदिर्घ' चर्चा झाल्यांचे माध्यमासमोर सांगीतले. मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी, 'प्रदिर्घ चर्चा झाल्यांचे नाकारून, फडणवीस यांनी केवळ आपले नांव मंत्री पदाच्या यादीत नसल्यांचे आणि पक्ष आपल्याकरीता काही वेगळे विचार करीत असावे' ऐवढेच बोलल्याचे सांगून, अप्रत्यक्ष मुख्यमंत्री फडणवीस यांचे वक्तव्याची हवा काढली आहे.

1995 च्या शिवशाही सरकारमधील एकनाथ खडसे आणि सुधीर मुनगंटीवार हे दोनच मंत्री 2014 मध्ये निवडून आले होते.  जेष्ठतेच्या आधारावर एकनाथ खडसे यांनी प्रयत्न करून पाहीले मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमीत शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांचेवर विश्वास टाकला. या सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवार हे अर्थमंत्री होते.  मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणारे एकनाथ खडसे, 'मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री' असे जाहीररित्या बोलणारी पंकजा मुंडे, भाजपाच्या कोअर कमेटीतील विनोद तावाडे यांचा पत्ता फडणवीस यांनी पध्दतशीरपणे कापल्याची चर्चा तेव्हा माध्यमात चांगलीच रंगली.  सुधीर मुनगंटीवार यांनी 'जुळवून' घेतल्यांने, त्यांना धक्का बसला नसला तरी, 2019 ची विधानसभेची उमेदवारी मात्र अखेरच्या क्षणी, तेही केंद्रिय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी घेतलेल्या कठोर भुमीकेमुळे मिळाली.  यावेळी ते मंत्री म्हणून दुसर्या — तिसर्या स्थानावर असतांनाही 46 व्या क्रमांकावर त्यांचे नांव उमेदवार म्हणून जाहीर केले होते. यावरूनच मुनगंटीवार हे विधीमंडळात कुणाला नको होते, हे स्पष्ट होते.

2024 च्या निवडणूकीतही मुनगंटीवार यांना पक्षाअंतर्गत विरोधाचा सामना करावा लागला. या निवडणूकीतच त्यांचा 'गेम' करण्यांचा प्लॅन भाजपातीलच बड्या नेत्यांनी आखल्याची चर्चा निवडणूकीत चांगलीच रंगली होती.  मुनगंटीवार यांचे विरोधात त्यांचे राज्यातील पक्षाअंतर्गत विरोधकांनी, जिल्हयातील भाजपाच्याच काही नेत्यांच्या माध्यमातून विरोधी उमेदवारांस मोठी रसद पुरविल्यांची खुली चर्चा निवडणूकीत होती.  यामुळेच सुधीर मुनगंटीवार यांना या निवडणूकीत थेट मतदारात जावून आपली प्रचार यंत्रणा राबवावी लागली.  लहान—लहान गावात व्यक्तीगत जावे लागले, अखेरच्या क्षणापर्यंत प्रचार करावा लागला. मुनगंटीवार यांचा नकार असतांनाही, निष्ठावान कार्यकर्त्यास उमेदवारी न देता आयात केलेले किशोर जोरगेवार यांना उमेदवारी देत, मुनगंटीवार यांचे महत्वच कमी करण्यांचाही प्रयत्न करण्यात आला.

सुधीर मुनगंटीवार यांची विधीमंडळातील कारकिर्द 1995 मध्ये चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील आमदार म्हणून सुरूवात झाली.  ते आमदार झालेत आणि शिवशाहीचे सरकार आले.  या शिवसेना—भाजपा सरकारमध्ये तेव्हाचे जेष्ठ नेत्या श्रीमती शोभाताई फडणवीस या अन्न व नागरी पुरवठा मंत्री झाल्यात. त्यावेळी बहुचर्चित 'दाळ घोटाळा' झाल्यांचा आरोप त्यांचेवर करण्यात आला. शिवशाही सरकारच्या अखरेच्या वर्षात मुख्यमंत्री मनोहर जोशी ऐवजी नारायण राणे यांना मुख्यमंत्री करण्यात आले.  त्यावेळी पहिल्यादाच निवडूण आलेले सुधीर मुनगंटीवार यांना राज्यमंत्री करण्याचा भाजपाने निर्णय घेतला. मात्र आपण राज्यमंत्री होणार नाही, करणार असाल तर कॅबीनेट मंत्रीच करा, नाहीतर आमदारच राहील अशी भूमिका मुनगंटीवार यांनी घेेतली.

एकाच जिल्हयात दोन—दोन कॅबीनेट आणि एक राज्यमंत्री (डॉ. रमेश गजबे हे त्यावेळी राज्यमंत्री होते) करणे शक्य नाही, तुम्हाला जर कॅबीनेट मंत्रीपद दिले तर, शोभाताईना मंत्रीमंडळातून काढावे लागेल अशी अडचण पक्षाचे वरिष्ठांनी सुधीर मुनगंटीवार यांचेसमोर मांडली.  मात्र, शोभाताईना मंत्रीमंडळातून वगळून मी कॅबीनेट मंत्री होणार नाही.  शोभाताई मंत्रीमंडळात असेल तरच, मी कॅबीनेट मंत्री म्हणून शपथ घेईल अशी स्पष्ट भुमिका त्यांनी घेतली. पक्षानीही सुधीर मुनगंटीवार यांचेसारखा अभ्यासू, कर्तबगार, निष्ठावान युवक मंत्रीमंडळात असावा अशी भुमिका घेत, श्रीमती शोभाताई फडणवीस यांना रोहयो मंत्री तर सुधीर मुनगंटीवार यांना पर्यटन मंत्री म्हणून जबाबदारी दिली.  चंद्रपूर जिल्हयात त्याचवेळी सर्वाधिक म्हणजे अडिच मंत्रीपदे मिळाली होती.

नव्या सरकारमध्ये श्रीमती शोभाताई फडणवीस यांचे पुतणे देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री आहेत, तर सुधीर मुनगंटीवार यांना मंत्री पदावरून दूर करण्यात देवेंद्र फडणवीस यांचेच षडयंत्र असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!