मेंढपाळांचा खडतर जीवन प्रवास ..
मेंढपाळांचा खडतर जीवन प्रवास ..
मेंढपाळ मेंढ्या चारण्यासाठी तीनही ऋतुत बाहेर राहतो. उन्हाळा ऋतुत रख -रखत्या उन्हात इतर लोकं पंखा, कुलरची हवा घेत असतांना मात्र मेंढपाळ मेंढ्या चारत कधीकधी झाडाच्या खाली, पालात राहून उन्हाचा बचाव करत असतो. पाणी जवळपास नसल्याने कित्येकदिवस घामाच्या धारात अंघोळीविनाही असतो. हिवाळ्यात इतर लोक ऊबदार कापडाचे पांघरून घेत थंडीपासून बचाव करीत असतांना मात्र मेंढपाळ आभाळाखाली उघड्यावर राहून थंडी झेलत असतो. पावसाळ्यात इतर लोक घरात आसरा घेत असतांना मात्र मेंढपाळ विजेच्या गडगडाटात, मुसळधार पाऊस, गारा अंगावर झेलत काळोखात रात्र काढत असतो. वाघ, बिबट, अस्वल, विषारी साप असे हिंस्त्र पशु यांची तमा न बाळगता जीवावर उदार होऊन पोटाची खळगी भरण्यासाठी हे काबाळकष्ट चाललेले असतात. अनेक मेंढपाळ कुटुंब बायका पोरांसह बाहेर असतात. पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही, बाहेर डासांच्या सहवासात राहिल्याने अनेकदा डेंग्यू, मलेरिया, टायपाईड आशा जीवघेणा आजाराचे बळी पडले आहेत. नुकताच एका मेंढपाळ महिलेला मलेरिया तापाने ग्रासले व उपचार वेळेवर न मिळाल्याने जीव गमवावा लागला. वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी, जखमी झालेले आहेत, एक मुलगा बिबटच्या हल्यात ठार झाला, एक मुलगा सर्पदंशाने दगावला, एक मुलगा तर आई कपडे धूत असतांना नजर नसल्याने विहिरीत पडून मरण पावला. अशा बिकट परिस्थितीत जीवन जगताना मात्र वनविभाग, पोलीस विभाग, चोरटे यांना मात्र मेंढ्यासारखे धन दिसल्याने यांचेकडूनही पैशाची अपेक्षा ठेवतात.
आता अगोदरसारखे पडीक जागा नसल्याने, जंगलात हिंस्त्र प्राण्यांचा संचार असल्याने चराईचा प्रश्न निर्माण झालेला आहे. उन्हाळ्यात शेतकरी खतासाठी शेतात मेंढ्या बसवितात मात्र शेतीचा हंगाम सुरु झाल्यापासून निघेपर्यंत फार अडचणीचा काळ असतो. शहराजवळ पडीक जागेवर, रिकाम्या लेआऊट जागेवर गर्दी करत कसेतरी मेंढ्या पाळत असतात. लहान लहान मूल घेऊन मेंढपाळांची भटकती सुरू असते. अनेकदा शेतकऱ्यांकडून, वनधिकाऱ्यांकडून मार खावा लागतो. काही भागात महिला, मुले सुद्धा असतात. मुलांना चागले शिक्षण मिळत नाही. विविध प्रकारचे सण आनंदाने साजरे करता येत नाहीत, राहण्यासाठी घर नाही- दार नाही, अशा परिस्थितीत जीवन जगताना मानवी जीवनाचाही विसर पडतो.
अनेकदा पुरात मेंढ्या वाहून जातात, बिमारीने मरतात, रोड अपघातात मरतात पण शासन दरबारी नोंद नसल्याने काहीच आर्थिक मदत मिळत नाही. तरीही कोणतीही कुरकुर नाही मात्र मेंढ्या चराईसाठी शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी एवढीच शासनाकडे माफक अपेक्षा असते. एकंदरीत मेंढपाळाचा जीवन प्रवास अतिशय खडतर आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!