सावली तालुका आपत्ती व्यवस्थापनाने जबाबदारी नाकारली - आपत्तीच्या काळात महामंडळाकडून विद्यार्थ्यांचे प्रवास भाडे वसुल

 

सावली (विजय कोरेवार) 

         आपत्तीच्या काळात जनतेला मदत करण्याचे काम प्रशासनाचे असतांना व त्यासाठी तहसीलदार यांचे अध्यक्षतेखाली तालुका आपत्ती व्यवस्थापन असतांना मात्र आपत्तीच्या काळात जबाबदार अधिकाऱ्यांनी जबाबदारी नाकारली तर, जायचे कुठे? असा प्रश्न सावली तालुक्यात चर्चीले जात आहे. सावलीच्या तहसीलदार प्रांजली चिरडे यांनी विद्यार्थ्यांना पोहचविण्याची जबाबदारी आमची नसल्याचे बोलत हात वर केल्याने व परिवहन महामंडळाने प्रवास भाडे वसूल केल्याने प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केल्या जात आहे.

       सद्या राज्यात व चंद्रपूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती सुरु आहे. पुरामुळे मार्ग बंद होत आहेत. सावली - हरंबा हा मार्ग वैगनगा नदी पात्राजवळ असल्याने अनेकदा बंद होत असतो. हरंबा, साखरी, सिर्सी, जिबगाव येथील विद्यार्थी सावली येथे शिक्षण घेत असून 24 जुलै रोजी सकाळ सत्रात मार्ग सुरु असल्याने शाळेत पोहचले. शाळा सुटल्यानंतर हा मार्ग पुरामुळे बंद असल्याची माहिती मिळाली. त्यांनी शाळेच्या शिक्षकांशी संपर्क साधला व माहिती दिली. शिक्षकाने तालुका आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष तथा तहसीलदार प्रांजली चिरडे यांचेकडे आपबीती कथन केली मात्र या प्रकरणाकडे गंभीरतेने न बघता तहसीलदार यांनी आपली जबाबदारी नसल्याचे चक्क मदत करण्यास नकार दिला. त्यानंतर शाळेने परिवहन महामंडळाशी संपर्क केला असता प्रवासाचे भाडे लागतील असे सांगितले. शाळेने विद्यार्थ्यांना जेवण दिले व सर्व विद्यार्थ्यांचे प्रवास भाडे भरल्यानंतर त्यांना व्याहाड बुज. मार्गे गावापर्यंत पोहचविण्यात आले. 

          तहसीलदार हे तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असतांना आपत्तीच्या काळात त्यांनी जबाबदारी नाकारल्याने तालुका प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त होत आहे.

तत्कालीन तहसीलदार पाटील यांची आठवण 

कोविड काळ असो की नैसर्गिक आपत्ती अशावेळी जागरूक राहून सहकार्य करण्याचे काम परीक्षित पाटील हे नेटाने करीत होते. बोट व इतर आपत्ती व्यवस्थापनाच्या काळातील बाबी त्यांनी निर्माण करून ठेवल्याने त्यांची आठवण केल्या जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!