निसर्ग समृद्ध रामबाग मध्ये गट्टू पेवर ब्लॉक आणि सिमेंटच्या रस्त्यांचा विकास हवा कशाला?

निसर्ग समृद्ध रामबाग मध्ये गट्टू पेवर ब्लॉक आणि सिमेंटच्या रस्त्यांचा विकास हवा कशाला?
- योगेश पचारे


चंद्रपुरातील रामबाग वन वसाहत हे विविध वारसा वृक्षांनी समृद्ध असा परिसर आहे. हल्लीच्या काळात अर्बन फॉरेस्ट म्हणता येईल असा हा रामबागचा परिसर आहे. या रामबाग परिसरात ताडोबा बफर व ताडोबा कोअर चे मुख्यालय तसेच वन कर्मचाऱ्यांच्या  व अधिकाऱ्यांच्या वसाहती आहे. रामबाग परिसराचा वापर अनेक नागरिक सकाळच्या प्रभात भ्रमणासाठी येतात. राम बागेत फिरणाऱ्याला एखाद्या घनदाट जंगलात फिरल्याचा आनंद मिळतो. एकंदरीतच रामबाग हे अति प्रदूषित व अतिउष्ण चंद्रपुरात प्राणवायू चे मोठे भांडार आहे.
परंतु बदलत्या काळात रामबागेत सुद्धा अनेक विकास कामे सुरू आहे. राम बागेतली कच्चे रस्ते हे सिमेंटचे व काँक्रीटचे तसेच पेवर ब्लॉक (गट्टू )द्वारे तयार करण्यात येत आहे. त्यामुळे जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत जिरण्याऐवजी या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावरून वाहून जाण्याची अधिक शक्यता आहे. राम बागेत कुठलीही जड वाहतूक होत नाही त्यामुळे साधे डांबरी रस्ते हेच रामबाग परिसरात निसर्गाचा समतोल साधण्यास पुरेशी आहे असे असताना सुद्धा सिमेंट काँक्रीट व पेवर ब्लॉक च्या रस्त्यांचा आग्रह कशासाठी होत आहे हे कळायला मार्ग नाही. सिमेंट काँक्रीटचे रस्ते हे पर्यावरण पूरक तर नाहीच परंतु या रस्त्यांमुळे शहरातील अनेक भागात पाणी साचण्याचे प्रमाण वाढले आहे .त्यामुळे नागपूर सारख्या शहरात सुद्धा मोठा पूर आलेला गेल्या काही दिवसात आपण बघितले आहे.
राम बागेला ऐतिहासिक वारसा आहे. या ठिकाणी गोंड राजा राम शहा यांची समाधी होती. पुढे ब्रिटिश काळात रामबाग वन विभागाचे कार्यालय म्हणून ओळखली जाऊ लागली. राजा राम शहाच्या समाधी जवळ वन अधिकाऱ्यांच्या बंगल्याची बांधकामे सुरू आहे या वनाधिकाऱ्यांच्या बंगल्याच्या बांधकामासाठी या परिसरात असलेले अनेक वारसा वृक्ष कडूलिंब ही शेकडो वर्ष जुने वृक्ष तोडल्या जाऊ शकते याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच यास राजाराम शहाच्या समाधीचे सौंदर्यकरण केल्यास एका चांगल्या पर्यटन स्थळाची चंद्रपुरात भर सुद्धा पडू शकते मात्र तसं न करता केवळ विकासाच्या नावाखाली सिमेंट काँक्रीटचे रस्ते व मोठमोठाली बांधकामे केली जात आहे याचा मोठा फटका नजीकच्या भविष्यात रामबागेतील निसर्ग संपन्न वनराईला बसू शकतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!