अस्वलाच्या हल्ल्यात लोहारा येथील शेतकरी गंभीर जखमी
प्रतिनिधी : नेरी ( चिमूर )
चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळच असलेल्या बोथली लोहारा मार्गावरील नाल्याजवळील शेतशिवारात दि. १५ ऑक्टो. ला पहाटे ६.३० च्या सुमारास एका मादी अस्वलाने शेताकडे जात असलेल्या शेतकऱ्यावर हल्ला केला. शेतकऱ्याच्या समयसुचकतेने सुदैवाने जीवितहानी टळली मात्र शेतकरी गंभीर जखमी झाला असून, नेरी येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करून, पुढील उपचारासाठी त्यांना चिमूर येथील उपजिल्हारुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सदर असे की, लोहारा येथील शेतकरी संभाजी वारलू डांगे वय ७० वर्षे हे दि. १५ ऑक्टोबर ला पहाटे ६.३० वाजता शेतात गेले असता नाला ओलांडुन एक मादी अस्वल आपल्या दोन पिल्ले सह शेतात आली त्याच वेळी शेताची पाहणी करत असताना डांगे यांना ती अस्वल दिसलीच नाही. परंतु, अस्वलाने शेतकरी डांगे यांना पाहताच त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. यात डांगे खाली कोसळले. अस्वलाने परत हल्ला चढवून पायाचा जोरदार चावा घेतला. हातात काठी असल्याने समयसुचकतेने काठीने अस्वलाला हाकलून लावले. मात्र, या हल्ल्यात डांगे यांना गंभीर दुखापत झाली.
पहाटे फिरायला येणाऱ्या युवकांना ही बाब लक्षात येताच, डांगे यांना नेरी येथील रुग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे नेरी वनपरिक्षेत्र चे क्षेत्रसहायक अधिकारी रासेकर यांनी डांगे यांची भेट घेतली व आरोग्याची विचारपूस केली यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचार सुरू आहे. सदर घटनेने शेतकरी वर्गात दहशत निर्माण झाली असून अस्वलाचे बंदोबस्त करावा आणि जखमी शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्ग व गावकरी यांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!