सातबारा दुरुस्तीची वाट बघत तानाबाईचा मृत्यू ... मृतकाला हजर राहण्यासाठी तहसीलदारांची नोटीस..

सातबारा दुरुस्तीची वाट बघत तानाबाईचा मृत्यू ...
मृतकाला हजर राहण्यासाठी तहसीलदारांची नोटीस..
सावली तहसीलमध्ये दिरंगाईमुळे अनेक प्रकरणे प्रलंबित..


सावली (विजय कोरेवार) - 
संगणक प्रणालीमध्ये शेतीच्या रेकॉर्डवर तानाबाई ऐवजी ताराबाई ही चूक प्रशासनाने केली. ही चूक दुरुस्तीसाठी तानाबाईने अर्ज केल्यानंतर 10 महिन्यांनी तहसीलदारांनी नोटीस पाठवली मात्र त्यावेळेस तानाबाई नोटीस घेण्यासाठी समोर येऊ शकली नाही कारण तिचा मृत्यू झाला होता. ही शेतकरी मृतक महिला हिरापूर येथील तानाबाई कोडापे असून सावली तहसीलमधील प्रकार आहे. या प्रकाराने "सरकारी काम, मरेपर्यंत थांब" ही दिरंगाईची प्रचिती आली.
           संगणक प्रणाली किंवा नजरचुकीमुळे शेतीच्या रेकॉर्डला अनेकदा चुका होतात. त्या चुका निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रशासनातील सेवकांनी तातडीने दुरुस्ती करायला हव्या. पण सामान्य लोकांसोबत, शेतकऱ्यांसोबत देणे-घेणे नसल्याचा हाव अनेक कर्मचाऱ्यांच्या वागण्यातून दिसते त्यामुळे पेन्शनसाठी पुकारलेल्या संपात लोकांनी सहकार्य केला नसल्याचा अनुभव नुकताच आला आहे. हिरापूर येथे तानाबाई वासुदेव कोडापे हिची शेती असून मुळ नाव तानाबाई असतांना संगणक सातबारा, नमुना 8 या महसूल दस्तऐवजात ताराबाई झाले. ही चूक लक्षात आल्यानन्तर तानाबाई हिने 5 मे 2022 ला नावात दुरुस्तीचा अर्ज केला. मात्र काहीच कार्यवाही न झाल्याने पुन्हा दुसऱ्यांदा 17 जानेवारी 2023 ला अर्ज केला. शासनाच्या कृषी विभागाकडून सदर महिलेला नेटशेड मंजूर झाले परंतु चुकीचे नाव असल्याने लाभही घेता आला नाही. रेकॉर्ड दुरुस्तीची वाट बघतच तानाबाईचा 2 मार्च 2023 ला मृत्यू झाला. मात्र तहसीलदार साहेबांनी तब्बल 10 महिन्यांनी 17 मार्च 2023 ला सुनावणी करीता तानाबाई कोडापे हिला नोटीस पाठवून हजर राहण्यास सांगितले व हजर न राहिल्यास एकतर्फी प्रकरण निकाली काढणार असल्याचे कळविले. यावरून सावली तालुका प्रशासन किती गांभीर्याने काम करीत आहे हे लक्षात येते. 
      असेच नाव दुरुस्तीचे प्रकरण वंदना जिगरवार यांनीही दाखल करून 8 महिन्याचा कालावधी होऊनही, सदर प्रकरणे हाताळणारे कर्मचारीची बदली होऊनही काहीच कार्यवाही झालेली नसल्याने असे अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याची माहीती येत आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!