साहित्यिकांनी शिक्षणाची वाताहत जनसामान्यापर्यंत पोहचवावी : लक्ष्मण खोब्रगडे बहुजनाचे शिक्षण संपवण्याचे राजकीय षडयंत्र
साहित्यिकांनी शिक्षणाची वाताहत जनसामान्यापर्यंत पोहचवावी : लक्ष्मण खोब्रगडे
शिक्षण मानवी जीवनाच्या उत्थानात कळीचा मुद्दा असून मूलभूत गरज ठरलेली असताना शासनस्तरावरून बुद्धिभेदाच्या तंत्राने बहुजनांत अपप्रचार करून बहुजनांचे शिक्षण संपवण्याचे पातक केले जात आहे .
स्वयंसेवी संस्थांना हाताशी घेऊन शाळांची चालवलेली बदनामी क्लेशकारक असून शिक्षकांनी राबवलेल्या उपक्रमाचे श्रेय एनजिओ ना देऊन शिक्षणव्यवस्थेवर उठवलेले प्रश्न खाजगीकरणाचे समर्थन करणारे आहेत . यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या भविष्यातील शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे .
शिक्षकांच्या वेतनाच्या नावाखाली शाळा बंद करण्याचा विचार लोकांत पसरवून ग्रामीण भागातील शिक्षण संपवण्याचा छुपा अजेंडा राबवून शासन बेरोजगारीचा भस्मासुर उभा करून बहुजनांची आर्थिक कुचंबणा करीत आपली राजकीय पोळी शेकून घेण्यासाठी वाटेल त्या स्तरावर निर्णय घेत आहे .
अशा बिकट आणि अटीतटीच्या परिस्थितीत साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून निर्भीडपणे शासनाच्या अन्यायकारक धोरणावर व्यक्त होऊन शिक्षणाच्या वाताहतीला कारणीभूत वास्तव जनसामान्यापर्यंत पोहचवले पाहिजे , असे मत कवी व लेखक लक्ष्मण खोब्रागडे यांनी व्यक्त केले . झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूरच्या साहित्यप्रवाहाची दिशा ठरवणाऱ्या महत्वपूर्ण सभेत लक्ष्मण खोब्रागडे यांनी मांडलेला ठराव बहुमताने मान्य करण्यात आला .
यावेळी चंद्रपूर शाखेचे जिल्हाध्यक्ष अरुण झगडकर , ज्येष्ठ साहित्यिक रामकृष्ण चनकापुरे , डॉ. चंद्रकांत लेनगुरे , प्रशांत भंडारे , संजीव बोरकर , पंडित लोंढे , सुरेश डांगे , प्रा. विनायक धानोरकर , सुनील पोटे , संतोष मेश्राम उपस्थित होते .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!