जादूटोणा केल्याच्या संशयावरून एका निष्पाप वृद्धाची हत्या; व्यापक प्रबोधनाची गरज
-हरिभाऊ पाथोडे
समाजात कोणीही कोणावर जादूटोणा करू शकत नाही. मंत्राने भाजला पापडही मोडता येत नाही. हे आव्हान स्वीकारणाऱ्यास अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे २५लाख रुपयांचे बक्षीस दिल्या जाणार आहे. परंतु आजपर्यंत कुणीही हे आव्हान स्वीकारलेले नाही. फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या, पोलिस स्टेशन सिंदेवाही अतंर्गत येत असलेल्या मेंढा(माल) या छोट्याशा गावात शेजारचा इसम जादूटोणा करतो; त्यामुळे आमची मुले बिमार पडतात; या संशयावरून रात्री झोपेत असलेल्या एका ६०वर्षीय वृद्धाची हत्या होणे ही लाजिरवाणी बाब आहे. महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा असताना अजुनही अशा घटना घडत आहेत. त्यामुळे समाजात व्यापक प्रबोधनाची गरज असल्याचे मत अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी व्यक्त केले. त्यांनी सहप्रयोग जादूटोणा विरोधी कायदा समजावून सांगितला.
या प्रसंगी पोलिस स्टेशन सिंदेवाहीचे पोलिस निरीक्षक योगेश घारे यांनी कोणत्याही गावात अंधश्रद्धेमुळे कोणाचाही बळी जाऊ नये. समाजाने चिकित्सक वृत्ती बाळगण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाला मेंढा ,(माल) येथील सरपंच श्रद्धा गुरनुले, उपसरपंच सुनिता बोरकर, म. गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वामण कोकोडे, अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सहसचिव अनिल लोनबले, सिंदेवाही तालुका सचिव मोरेश्वर गौरकार, अध्यक्ष अंबादास मेश्राम, महिला संघटिका राजश्री वसाके ह्या प्रामुख्याने उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सिंदेवाही तालुका संघटक डेकेश्वर पर्वते यांनी केले. संचालन तथा आभारप्रदर्शन भिमराव खोब्रागडे यांनी केले. या प्रबोधन कार्यक्रमाला गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!