माजी सैनिकाशी अपमानास्पद वागणूक
माजी सैनिकाला कॅबिन मधून शिव्याची लाखोली वाहणाऱ्या वरोरा उपविभागीय अधिकारी शिंदे यांच्यावर कठोर कारवाई करावी - माजी सैनिकाच्या पत्नीची पत्रकर परिषदेमध्ये मागणी
तालुका - प्रतिनिधी ( आलेख रट्टे )
वरोरा : - आपल्या सेवा कारकिर्दीत सातत्याने वादग्रस्त ठरलेले उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी माजी सैनिकाने त्यांच्या एका घरगुती प्रकरणात न्याय करण्याची विनंती केली होती परंतु त्यांचे कुठलेही म्हणणे ऐकून न घेता आपल्या कॅबिन मधूनच शिव्यांची लाखोली वाहिली व त्यांना अपमानास्पद वागणूक देऊन " गेट आउट " म्हणत केबिनच्या बाहेर जाण्याची तंबी देऊन भेट नाकारली. अशा बेजबाबदार उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांचेवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी सैनिकांची पत्नी हर्षदा सागर कोहळे यांनी बाबुलाल फूड प्लाजा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.पत्रकार परिषदेत हर्षदा कोहळे यांनी सांगितले की, ती एक माजी सैनिकाची ( सागर कोहळे) पत्नी असून त्यांच्या लग्नाला १२ वर्षे झाली आहेत व त्यांना अनुक्रमे १० व ५ वर्षाची दोन मुले आहेत. पती सागर कोहळे हे कर्तव्यावर असताना आईला एकटेपण जाणवत असल्याने तिचा सांभाळ करण्यासाठी ती आईकडेच (माहेरी) राहत होती. तिचे वडील श्रीधर निमजे हे आयटीआय मध्ये नौकरीला होते आणि प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले. आपल्या सेवा काळात ते अधिकाधिक आईला सोडून घराबाहेरच राहिले. विविध स्त्रियांच्या संपर्कात असल्याने त्यांच्या विभागात व गावात बाई भुलव्या म्हणून ते नेहमी चर्चेत होते. त्या पुढे म्हणाल्या की, वरोरा नगर परिषद हद्दीतील कमला नेहरू प्रभागातील मालमत्ता क्रमांक ४८० ही त्यांच्या आईच्या माहेरची मालमत्ता असून आजोबांच्या ( श्रावण पुरणदास ठोलदास ) मृत्युनंतर आईच एकटी तिची वारसान होती. आईच्या लग्नानंतर पती श्रीधर पांडूरंग निमजे हे कधीच आईशी एकनिष्ठ राहिले नाही. हि सल नेहमी तिला टोचत होती. पण ती भारतीय नारी होती. अशाही परिस्थितीत तिने आम्हाला योग्य शिक्षण व संस्कार दिले. दोन्ही मुलीचे लग्न केले. मी तिच्या जवळच राहावे असे तिला नेहमी वाटत असे म्हणूनच माझ्या पतीचे सेवानिवृत्त नंतर गावात इतरत्र राहण्यापेक्षा याच घराच्या वर मजला बांधून राहण्याची गळ तिने घातली. आईला आधार म्हणून पतीच्या सेवानिवृत्ती नंतर त्यांना मिळालेल्या पैशातून घर बांधले व वास्तू करून राहत होतो. यावेळी वडिलही सोबत होते. परंतु आईच्या मृत्यूनंतर माझे वडिलांनी आईची तेरवी केली नाही, उलट ही मालमत्ता आपल्या नावे करून आईचं वर्ष श्राद्ध होण्यापूर्वीच दुसरे लग्न करून मोकळे झाले. आईला बाबा़च्या चारित्र्याबाबत पूर्वकल्पना होती त्यामुळे त्यांनी मृत्युपूर्वी काही गोष्टी मला सांगितल्या होत्या. त्यामुळे आम्हाला भनकही न लागू देता ९ जानेवारी २०२२ ला ६१ व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्न करून घरी आले. येणाऱ्या वडिलांनाला खडेबोल सुनावून विरोध केला. त्यांच्या या कृत्यामुळे माझ्या मुलांवर विपरीत परिणाम होणार सोबतच परिसरातील लोक टोमणा मारून जगणं कठीण करतील. वडिलांना या वयात लग्नाची आवश्यकताही नसताना त्यांनी ते केल्याने त्यांना खडेबोल सुनावले तुम्ही वडिल आहात या घरात राहू शकता नवीन बाईला आई म्हणून मी या घरात राहू देणार नाही. असे सांगितले असता त्यांनी थेट वरोरा पोलीस स्टेशन गाठून माझ्या व पतीच्या विरोधात तक्रार नोंदवली. यासंदर्भात आम्हाला पाचारण करण्यात आल्याऩंतर आम्हीही आपली प्रतिक्रिया व तक्रार नोंदवली. तदनंतर जवळपास एका आठवड्यानंतर बल्लारपूर येथील तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांच्या आमिषाला बळी पडून माझे वडील श्रीधर निमजे यांनी जेष्ठ नागरिक कायदा अन्वये सुभाष शिंदे अध्यक्ष पदस्थ अधिकारी जेष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण तथा उपविभागीय दंडाधिकारी उपविभागीय, वरोरा यांचे न्यायालयात अर्ज दाखल केला.या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना श्रीधर निमजे यांनी वरोरा पोलीस स्टेशन मध्ये आमच्या विरोधात चोरीची खोटी तक्रार नोंदवली. त्यामध्ये दबावाखाली आमच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यावर आम्ही जामिन मिळविला. त्यातच २७/०५ /२०२२ ला उपविभागीय दंडाधिकारी यांनी श्रीधर पांडूरंग निमजे विरुद्ध हर्षदा सागर कोहळे, सागर गणपतराव कोहळे प्रकरणात अर्जदाराच्या म्हणण्यानुसार आदेश पारित केला व सदर आदेशाविरुद्ध अपिल करावयाची असल्यास आदेशाच्या दिनांकापासून ६० दिवसाचे आत जिल्हा दंडाधिकारी, चंद्रपूर यांना अपिल दाखल करता येईल, असे आदेश पारित केला. याबाबत आम्हाला पूर्व कल्पना नव्हती व पत्र मिळाले नाही. अन्यांकडूंन माहिती मिळाल्यानंतर जवळपास महिनाभरानंतर हे आदेश उपविभागीय कार्यालयात जाऊन घेतले. ते घेतल्यानंतर अपिल साठी आमच्याकडे भरपूर वेळ आहे असे गृहित धरून आम्ही गावाबाहेर आलोत. नेमकी हिच संधी साधून २९ /०६/२०२२ रोजी उपविभागीय अधिकारी वरोरा यांनी वरोरा पोलीस निरीक्षक यांना पोलीस बंदोबस्तात घर श्रीधर निमजे यांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. पोलिस निरीक्षक व टीम ने आम्ही बाहेर गावी असल्याची संधी साधत आमच्या घराचे कुलूप फोडून श्रीधर निमजे यांच्या ताब्यात देऊन आम्हाला बेघर केले. यावर नागपूर हायकोर्टात आम्ही दाद मागितली. त्यात मुंबई न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगनादेश दिला. त्याची प्रत उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आली. तदनंतर ही आम्हाला न्याय नाकारला. या संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यालयात भेट घेण्याची परवानगी मागितली असता माझ्या पतीचे नाव ऐकून उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे भडकले व त्यांनी उपस्थितांसमोर माजी सैनिक असलेल्या माझ्या पतीला अपमानास्पद वागणूक देऊन लज्जित केले.वास्तविक पाहता आपल्या देशाच्या बहुमोल स्वातंत्र्याचे प्राणपणाने रक्षण करणारा व कोणत्याही अडचणीची पर्वा न करून आपली कर्तव्य चोखपणे बजावणारा देशाचा बहादूर सैनिक हा आपल्या सर्वांचा आदराचा आणि अभिमानाचा विषय आहे, पण अहंकाराने मस्त उपविभागीय अधिकारी यांनी आपल्या अधिकाराचा सूडबुद्धीने वापर करून माजी सैनिक व परिवाराला संशयाच्या कठड्यात उभे केले करून त्यांना अपवमानास्पद वागणूक दिली. आपल्या प्रदत्त अधिकाऱ्याचा दुरूपयोग करून माजी सैनिक व त्याच्या परिवाराला शारीरिक व मानसिक छळाचीची वागणूक देणाऱ्या उपविभागीय अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी, व त्यांच्या एकूण निर्णयाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी माजी सैनिक सागर कोहळे. सुरेश बोभाटे, वैभव नाईक, ऋषी मडावी, रुबेश्वर कुत्तरमारे, प्रकाश चिकटे आदी उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी माजी सैनिकांची जाहीर माफी मागावी - माजी सैनिक संघटना, वरोरा
जेव्हा जेव्हा देशावर कठीण प्रसंग येतो तेव्हा तेव्हा या कठीण प्रसंगातून सैन्य दलाने बाहेर काढले आहे आणि म्हणूनच माजी सैनिक अथवा त्यांच्या कुटुबियांचा मान राखला गेला पाहिजे. देशाच्या सुरक्षिततेसाठी प्राणपणाला लावून लढणाऱ्या माजी सैनिकांचा अपमान होणे निंदनीय बाब आहे. उपविभागीय अधिकारी यांनी बेकायदेशीर आदेश पारित केला असल्याचे कळते त्यामुळे अशा अधिकारयावर कडक कारवाई करावी नाही तर उपविभागीय कार्यालयासमोर धरणे लावून बसू, असा निर्वाणीचा इशारा माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकारी सदस्यांनी दिला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!