तिरंगा पावसात
🌹 तिरंगा पावसात🌹
समुद्रमंथनी अमृत कसला
तडपत पाण्यासाठी राहिले,
तिरंगाही पावसात एकदा
उत्सव तीन दिवस पाहिले.
विहिर कोरडी हलाहलाची
मिटेना युगायुगाचे त्राण,
जलात फुत्कार वासनेचा
घेऊनि कंठापाशी प्राण.
हुंकार विरले अर्ध्यावरती
जळजळ घशात राहिले,
तिरंगाही पावसात एकदा
उत्सव तीन दिवस पाहिले ---१
दोर काचला ओढू ओढू
घुसळा दाबून रई,
रस संपता आंब्यातला
फेकून द्यावी घुई.
कोंब फुटता लोंब चोरुनी
उदर भुरट्यांचे दाहिले,
तिरंगाही पावसात एकदा
उत्सव तीन दिवस पाहिले --२
नजर आशेची उघड्यावरती
भिरभिर काकडून गेली,
जलधारा की भिजवे अश्रू
काठी आधाराला आली.
चिंब चिंब थरथर अंगी
अचानक वादळ साहिले,
तिरंगाही पावसात एकदा
उत्सव तीन दिवस पाहिले --३
🙏लक्ष्मण खोब्रागडे🙏
जुनासुर्ला, ता. मूल, जि. चंद्रपूर
९८३४९०३५५१



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!