गांधी पुतळ्यासमोरच दारूच्या जाहिरातीचे फलक
दारू दुकानाची जाहिरात करण्यास शासनाकडून मनाई करण्यात आली आहे असे असतानाही, मूल शहरात मात्र फलक लावून दारूची जाहिरात करण्यात येत असल्याने प्रशासनाच्या कर्तव्य निष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उल्लेखनीय म्हणजे, मूूूूल शहरातील महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोरच दारू दुकानाची जाहिरात करून, दारू दुकानदारांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला, तसेच मूल तालुका प्रशासनाला ठेंगा दाखवित आहे.
मुल येथील तलावाचे काठावर सेवन हिल बार, आणि देशी दारूचे दुकान आहे. हे दुकान चौकापासून कितीतरी आत असताना, या दुकानदारांनी रस्त्यावर अतिक्रमण करून, दारू दुकानाचे जाहिरात करणारे फलक लावले आहे. यामुळे नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे. दारू दुकानाचे फलक केवळ दुकानावरच लावता येतात, मात्र सेवन हिल बार आणि देशी दारू दुकानदार दारूची जाहिरात करण्याकरिता थेट गांधी पुतळ्यासमोर, फलक कसे काय लावले? असा प्रश्न आता निर्माण होत आहे. ज्या ठिकाणी हे फलक लावले आहे तो नगरपरिषदेचा रस्ता आहे, या रस्त्यावरील हे फलक अतिक्रमण या सदरातच मोडत आहे, हे उल्लेखनीय आहे.
नुकतीच काँग्रेसने गांधी चौकात गौरव पदयात्रा काढली होती. चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा दारूचे दुकान सुरू करणारे माजी मंत्री विजय वडेट्टीवार या सभेत बोलताना गांधीजीच्या त्यागावर भरभरून बोलले, मात्र गांधींच्या पुतळ्यासमोरच गांधी विचाराची हत्या करणारे दारूचे फलक विजय वडेट्टीवारांना दिसले नाही काय? असाही प्रश्न आता निर्माण झालेला आहे. मूूल शहरात इतर ठिकाणीही आतल्या भागात दारूचे दुकाने आहे, मात्र कोणीही दारू दुकानाची रस्त्यावर जाहिरात करण्याची हिम्मत केली नाही, या पार्श्वभूमीवर, कायदा आणि नियम तोडण्याकरिता, सेवन हिल बार, देशी दुकानदारांला कुणाचे पाठबळ आहे? असा प्रश्न विचारला जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!