शास. आय.टी.आय.च्या प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू विद्यार्थी वर्गात प्रचंड उत्साह
शास. आय.टी.आय.च्या प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू विद्यार्थी वर्गात प्रचंड उत्साह
गडचिरोली (प्रतिनिधी) -
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रवेश घेण्यासाठी १७ जून पासूनच प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. संकेतस्थळावर प्रवेश पध्दती, नियमावली उपलब्ध करून देण्यात आली आहे. इयत्ता १० वी च्या गुणपत्रिकेतील गुणांच्या आधारे केंद्रीय ऑनलाईन प्रणाली व्दारे प्रवेश देण्यात येणार आहे. या प्रक्रियेत सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश अर्ज स्वीकृती केंद्र असतील. अर्ज स्वीकृती केंद्रात उमेदवारांना ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे, पडताळणी ,स्विकृती ,निश्चिती करता येईल. प्रवेश अर्जात प्रायमरी मोबाईल नंबर नोंदविणे अनिवार्य आहे.अर्जात प्राथमिक माहिती भरल्यानंतर उमेदवाराचे प्रवेश खाते आणि त्याचा नोंदणी क्रमांक हाच यूजर आयडी म्हणून तयार होईल. अर्ज शुल्क राखीव प्रवर्गासाठी १०० रु. आहे तर खुल्या प्रवर्गासाठी रू. १५० आहे . प्रवेश अर्जातील माहितीच्या दाव्याच्या पृष्टयर्थ आवश्यक मुळ/ कागदपत्रांच्या छायांकीत प्रतीचा संच सोबत असावा. प्रवेशासाठी आवश्यक दस्तावेज यादी प्रवेश संकेतस्थळावर डाउनलोड या मथळ्याखाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. निश्चित केलेल्या प्रवेश अर्जाचाच सर्व प्रवेश फेरी करता विचार करण्यात येईल. प्रत्येक प्रवेश फेरीत निवड झालेल्या उमेदवारांना ऑनलाइन निवड पत्र उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी उमेदवारांनी प्रवेशासाठी दिलेल्या वेळापत्रकानुसार उपस्थित रहावे. दि. २२ जून पासून अर्ज स्वीकृती केंद्रात प्रवेश अर्ज निश्चित करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शासकीय व मान्यताप्राप्त व्यवसाय अभ्यासक्रमाच्या तुकड्यांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे तरी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी https://admission.dvet.gov.in, www.dvet.gov.in या संकेतस्थळांना अवश्य भेट द्यावी.
युवकास आवश्यक असलेले पायाभूत व्यवसाय प्रशिक्षण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये दिल्यानंतर औद्योगिक आस्थापनेत वापरण्यात येणारी यंत्रसामुग्री व तंत्र यांचे ज्ञान व कौशल्य प्राप्त करुन सर्व दृष्टीने पूर्ण कुशल बनावा यासाठी शिकाऊ उमेदवारी योजना अस्तित्वात आलेली आहे. शिकाऊ उमेदवारांना केंद्र शासनाने मंजूर केलेल्या दरानुसार प्रशिक्षण कालावधीमध्ये विद्यावेतन मिळते.
राज्यातील शासकीय औ.प्र. संस्थांतील प्रशिक्षण सुविधांचा दर्जावाढ करणे, प्रशिक्षणार्थ्यांना अल्पमुदतीचे प्रशिक्षण देणे, On the Job Training, रोजगाराच्या संधी, निदेशक प्रशिक्षण कार्यक्रम, अद्ययावत यंत्रसामुग्री व उपकरणे उपलब्ध करुन देणे, इतर आवश्यक सोईसुविधा उपलब्ध करुन देणे यासारख्या बाबी प्रथम प्राधान्याने राबविण्यात येत आहेत.
औ.प्र.संस्थांमधील प्रशिक्षण पूर्ण केल्यावर उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्गात थेट प्रवेश दिला जातो. प्रशिक्षणार्थ्यांसाठी शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण योजना, रोजगार, स्वयंरोजगार व उच्च शिक्षणाच्या संध्या उपलब्ध झाल्या आहेत.
औ.प्र.संस्थांमधील शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाईन पद्धत राबविण्यात येत आहे. सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करुन निर्धारित प्रवेश नियमावली व पध्दतीनुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
प्रवेशासंबंधी नियम, आवश्यक दस्तऐवजांची माहिती व प्रवेश कार्यपध्दती या बाबत विस्तुत माहिती समाविष्ट असलेली माहिती पुस्तिका प्रवेश संकेतस्थळ https://admission.dvet.gov.in वर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तरी या कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ जास्तीत जास्त युवकांनी घ्यावा ,असे गडचिरोली शास.औ.प्र.संस्थेचे प्राचार्य संतोष सांळुके यांनी कळविलेले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!