प्रधानमंत्री किसान योजनेपासून शेतकरी वंचित - मुख्यमंत्री, कृषिमंत्री यांना निवेदन पाठवले

प्रधानमंत्री किसान योजनेपासून शेतकरी वंचित - मुख्यमंत्री, कृषिमंत्री यांना निवेदन पाठवले

सावली (प्रतिनिधी) 
देशात शेतकऱ्यांसाठी फार हिताची म्हणून गाजावाजा सुरू असलेल्या प्रधानमंत्री किसान योजनेत तहसीलदार यांनी या योजनेच्या कामावरच बहिष्कार टाकल्याने अनेक शेतकरी वंचित आहेत. परंतु या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे केंद्र व राज्यशासनाचे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाने लक्ष देऊन प्रश्न सोडवावे याकरीता मुख्यमंत्री, कृषिमंत्री यांना पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार यांचे नेतृत्वात तहसीलदार यांचे मार्फतीने निवेदने पाठविण्यात आले.
      शासनाची शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम टाकणारी म्हणून प्रधानमंत्री किसान योजना सुरू आहे. या योजनेत शेतीच्या रेकॉर्डवर नाव असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना ४ महिन्याला २ हजार रुपये म्हणजे वार्षिक ६ हजार रुपयांची तरतूद आहे. सुरवातीला ज्यांनी या योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज केले त्यांचे खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली. अनेक शेतकऱ्यांचे सामूहिक जमीन असल्याने इतर खातेदारांना लाभ घेता येते हे माहीत नव्हते त्यांनी या योजनेत अर्ज केला नाही. जेव्हा या खातेदारांनी अर्ज केले तेव्हा महसूल विभागाकडे हा काम असल्याने तहसीलदार यांनी या योजनेचे काम करण्यास नकार देत बहिष्कार टाकला. कृषी विभागाकडे ही योजना द्यावी असा पर्याय दिला परंतु यावर काहीच तोडगा शासन स्तरावरून निघाला नसल्याने अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, कृषिमंत्री दादाजी भुसे, जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडे पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार यांचे नेतृत्वात ईश्वर मोहूर्ले, श्रीकांत बहिरवार, अतुल कोडापे, पंकज कागदेलवार, नरेंद्र राचेवार, राजू कंचावार, संजय अलाम, युवराज उईके, पुरुषोत्तम पेंदाम, मंगेश राजूरकर, डीलक्स डोहणे यांनी नायब तहसीलदार सागर कांबळे यांना निवेदन दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!