सायकल स्नेही मंडळाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सायकल स्नेही पुरस्कार सायकल स्नेही मंडळाचे जनजागृतीपर कार्य कौतुकास्पद - डॉ. देवाजी तोफा

सायकल स्नेही मंडळाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सायकल स्नेही पुरस्कार 
सायकल स्नेही मंडळाचे जनजागृतीपर कार्य कौतुकास्पद - डॉ. देवाजी तोफा 

गडचिरोली (प्रतिनिधी) -
     अ.भा.श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या मुख्य शाखेत छोटेखानी स्वरूपात सायकल स्नेही मंडळाचा चौथा वर्धापन दिवस संपन्न झाला.  कार्यक्रमाचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. देवाजी तोफा होते. प्रमुख अतिथी म्हणून  डॉ. शिवनाथ कुंभारे, मंडळाचे मुख्य प्रेरक  ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, पंडित पुडके, अरविंद पाटील वासेकर, विजय खरवडे,   प्राचार्य भाऊ पत्रे,   प्रा. भास्कर नरूले, दलितमित्र नानाजी वाढई  प्रामुख्याने उपस्थित होते.
   प्रास्ताविक कार्याध्यक्ष प्रा.‌विलास पारखी यांनी करून सायकल मंडळाच्या आजवरच्या विविध उपक्रमावर प्रकाश टाकला.   सायकल स्नेही मंडळाचे वतीने देण्यात येणाऱ्या वार्षिक सायकल स्नेही पुरस्कार बाबत उपस्थितांना माहिती देत बंडोपंत बोढेकर म्हणाले की, सायकल चालवा, निरोगी रहा आणि पर्यावरण वाचवा ही त्रिसूत्री प्रत्येकांनी आपल्या जीवनात अंगीकारल्यास  अनेक समस्या सहज दूर होऊ शकतात.‌ सायकल ही मानवाची मित्र आहे असून सायकल स्नेही हे सच्चे भूमीपूत्र आहे. या अभियानात सर्वांनी उत्स्फूर्त सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.   याप्रसंगी सायकल स्नेही पुरस्कार  सिआरपीएफ असिस्टंट कमांडंट डॉ. चेतन शेलोटकर आणि विलास निबोंरकर यांना देऊन सन्मानित करण्यात आले.  सूत्रसंचालन पंडित पुडके यांनी केले. आभार उपेंद्र रोहणकर यांनी मानले.   कार्यक्रमास सायकल  प्रेमी  बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
   सायकल स्नेही मंडळाचा वार्षिक वर्धापन दिवस दरवर्षी  घेण्यात येतो. यंदा देण्यात आलेले वार्षिक सायकल स्नेही पुरस्काराचे मानकरी ठरलेले विलास निबोंरकर  हे सेवानिवृत्त शिक्षक असून गेल्या अनेक वर्षापासून ते  सायकलनेच दैनंदिन कामे करतात.  तसेच ते अंधश्रद्धा निर्मूलन, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन , निराधार लोकांसाठी मदत निधी संकलन कार्यात सहभागी असतात.
     डॉ. चेतन शेलोटकर हे सध्या  सिआरपीएफ मध्ये असिस्टंट कमांडंट पदावर कार्यरत आहे.
आझादी का अमृत महोत्सव  निमित्त काढण्यात आलेल्या 'राष्ट्रीय एकता दिवस' सिआरपीएफ सायकल रॅलीचे नेतृत्व असिस्टंट कमांडण्ट डॉ. चेतन शेलोटकर यांनी केले होते. 'गडचिरोली महाराष्ट्र ते स्टॅच्यु आॅफ युनिटी केवडिया गुजरात' हा ११०० किलोमीटरचा पल्ला १२ दिवसांत त्यांच्या सायकल टीमने गाठला.  राष्ट्रीय एकता दिवस परेडमध्ये देशाच्या विविध भागांतून आलेल्या सुरक्षाबलांच्या जवानांच्या सायकल टीमचा सहभाग घेतला होता, हे विशेष.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!