शिवसेना, मराठी आणि महाराष्ट्र !
शिवसेना, मराठी आणि महाराष्ट्र !
.....
विजय सिद्धावार
....
महाराष्ट्र (Maharashtra) आणि शिवसेना (Shivsena) हे समिकरण, देशात नवे नाही. मागील पाच—सहा दशकापासून, महाराष्ट्रातील मराठीजनांसाठी लढणारी सशक्त संघटना म्हणून शिवसेनेशिवाय दुसरा पक्ष नसल्यागतच आहे.
आपल्या देशात भाषिक अस्मिता सर्वच प्रांतात आढळते, या अस्मितेच्याच जोरावर प्रादेशीक पक्षाची स्थापना झाल्यांचे दिसून येते, महाराष्ट्र वगळता जवळपास सर्वच राज्यातील प्रादेशीक पक्षानी, आपल्या राज्यात एकहाती सत्ता मिळविली आहे, सत्ता मिळविलेल्या पक्षाचे तुलनेत, सशक्त असणार्या शिवसेनेला मात्र मागील सहा दशकापासून, सत्ता मिळविता आली नाही, अलिकडच्या काळात तर, सत्तेसाठी शिवसेनेला नाना तडजोडी करावे लागत आहे, देशात इतर पक्षांना मिळालेले यश, महाराष्ट्रात शिवसेनेला का मिळू शकले नाही?
शिवसेना आज पक्ष असला तरी, राज्यात शिवसेनेची स्थापना मुळात, मुंबईत होत असलेल्या मराठी (Marathi) कुटूंबियांवरील अन्यायावर ठोस भुमिका घेण्यांसाठी झाली.
प्रबोधनकारांच्या खोलीत बाळासाहेबासह १८ मराठी बांधवांनी शिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ रोजी केली. शिवसेना हि पूर्णता संघटना म्हणूनच स्थापन झाली होती. ‘ठाकरेंच्या मते, 'समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, पण मराठी माणूस दुविधेत आहे. महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार; तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब आहे. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे. असा विचार देत' शिवसेनेचा पहिला मेळावा ऑक्टोबर ३०, इ.स. १९६६ रोजी शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला. ज्यात सुमारे ५ लाख लोकांचा सहभाग होता. या मेळाव्यापासूनच बाळ ठाकरे आणि शिवतीर्थावरील (शिवाजी पार्कवरील) मराठी माणसांची गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली.
मराठी माणसासाठी लढणारी आक्रमक संघटना यापुरतीच शिवसेनेची कार्यकक्षा सीमित होती. स्थापनेनंतर एक महिन्याने झालेल्या बैठकीत उपस्थितांनी शपथ घेतली. या शपथेचा मसुदा पुरंदरे यांनी दिला आहे. आपली मालमत्ता परप्रांतीयांना विकू नये, मराठी ग्राहकांशी विनयाने वागावे, मराठी नोकर नेमावे, मराठी शाळा, संस्थांना मदत करावी, मराठी बांधवांची गृहरचना संस्था काढावी, मराठी सण-समारंभांत भाग घ्यावा, मराठी बांधवांच्या मदतीला धावा याबरोबरच इंग्रजी टायपिंग शिकावे, आळस झटका, उडपी हॉटेलवर बहिष्कार टाकावा, मराठी व्यावसायिकाची उमेद वाढवा, त्याला नामोहरम करू नका, राज्यात कोठेही काम करण्याची मानसिकता जोपासा ही शपथपत्रातील कलमे तेव्हाच्या शिवसेना नेतृत्वाच्या मानसिकतेची साक्ष देतात.
'बजाव पुंगी, हटाव लुंगी' (Bajao Pungi, Hatao Lungi) म्हणत, शिवसैनिकांनी दक्षिणात्य हॉटेल चालविणार्याच्या विरोधात मराठी हुंकार भरला. पुढे शिवसेनेने कामगार क्षेत्रातील कॉम्युनिस्टांची दादागीरी कमी करवून, त्यावेळच्या कॉंग्रेसला मदत केली. मराठी गिरणी कामगारांसाठी शिवसेनेने आंदोलनात्मक भुमिकाही घेतली. एकुणच मुंबई आणि मुंबई परिसरातील मराठी माणसाची संघटना म्हणून शिवसेनेने योग्य भूमिका बजावली. मुंबई आंतरराष्ट्रिय शहर, औद्योगीक शहर, देशाची आर्थिक राजधानी असल्यांने आणि त्याकाळी सर्वाधिक 'क्रेझ' असलेली सिनेसृष्टी मुंबईत असल्यांने देशभरातील लोक आपले नशिब अजमाविण्यांसाठी, रोजगारासाठी मुंबईत स्थावर होण्यांचा प्रयत्न करीत होते. यातूनच हळूहळू परप्रांतीयाच्या गर्दीत मराठी माणसे हरवू लागली, मराठी माणसाच्या मुंबईत मराठी माणसेच उपरी होत असल्यांच्या शिवसेनेच्या भावनीक आणि व्यावहारीक आवाहनाला मुंबईत मराठी माणसांची चांगला प्रतिसाद दिला.
1990 च्या जागतीकीकरणानंतर, (Globalisation) जग सर्वांसाठी खुले झाले, रोजगारासाठी, शिक्षणासाठी स्थलांतरण वाढले. त्यात मराठी माणूसही होता. परदेशात जावून करियर करणार्या मराठी माणसात मुंबईतील रहीवासीही होते. यानंतर, अर्थातच मराठी मुद्दा मागे पडू लागला. राजकीय पक्ष म्हणून शिवसेनेला मर्यादीत यश मिळू लागले तरी, मराठीचा मुद्दयापलिकडे जावून, वेगळी राजकीय विचारधारा ते तयार करू शकले नाहीत.
शिवसेनेने मराठी मुद्यावरून, मुंबई व परिसरात जम बसविला असला तरी, उर्वरित महाराष्ट्रात 'मराठी' हा मुद्दा नसल्यांने, या भागात शिवसेना वाढीला मर्यादा आली. मात्र राम मंदिराच्या मुद्दयावरून, शिवसेनेने मराठी सोबतच हिंदुत्वाचा मुद्दा घेतला. पुढे दलित—हिंदू (Dalit-Hindu) अशा वादातही हिंदूची ठोस बाजू घेवून शिवसेना उभी झाली आणि मराठी अस्मितेसाठी सुरू झालेल्या शिवसेनेला पुढे बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा डोस देऊन मराठी अस्मितेच्या परिघाबाहेर नेले. मुंबईबाहेर, मुख्यत: मराठवाडा, विदर्भात 'हिंदुत्वा'चा आधार आणि दलित विरोधी भूमिका घेतल्यानेच शिवसेनेला शिवसैनिक मिळालेत.
मराठी माणसांचे हित जोपासण्याची शपथ घेणाऱ्या बाळासाहेबांना नंतर राजकीय खेळीही खेळाव्या लागल्या.
महाराष्ट्र हा, विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई अशा विभिन्न सामाजीक परिस्थिती, संस्कृती, भाषा आणि इतिहास असलेला एक राज्य असल्यांने, एकच मुद्दा सगळीकडे सारख्याच ताकदीने पुढे नेता येत नाही. मुंबई वगळता राज्यात इतर कुठेही मराठी विरूध्द इतर असा भाषिक वाद नव्हता मात्र शिवसेना राजकीय दृष्टया मराठी मुद्दयाभोवतीच फिरत राहील्यांने, मुंबई पलिकडे सर्वसमावेशक यश मिळणे कठीण होते, आणि आहे. त्यामुळेच, देशात इतर राज्यातील प्रादेशीक पक्षाला स्वबळावर एकहाती सत्ता घेता आली ती, शिवसेनेला मात्र अजूनपर्यंत मिळालेली नाही. शिवसेनेची जी राजकीय वाटचाल, यश चालू आहे, त्यातही ती चार पक्षात नंबर एकवर येईल याची खात्री देता येत नाही. 1995 वगळता, मागील 25 वर्षात राज्यातील सत्तेसाठी आवश्यक संख्याबळाचे अर्धेही आमदार निवडून आले नाहीत.
भाषेच्या मुद्याला मर्यादा आहेत, हे शिवसेना महाराष्ट्रभर वाढू शकली नाही, यातून स्पष्ट झाले आहे. शिवेसेनेनेही हे वेळोवेळी 'अमराठी' नेत्यांना राज्यसभेत पाठवून, राजकीय सत्ता मिळवायची असल्यांस, मराठीच्या पुढे जावे लागेल हे अप्रत्यक्ष मान्य केले आहे.
मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला. २०१७ चे महापालिका निवडणूकीत (Mumbai Municipal Election) जवळपास शिवसेने ऐवढेच (शिवसेना ८४, भाजपा८२) नगरसेवक निवडूण आणीत भाजपाने या बालेकिल्यात घुसखोरी केली आहे. शिवसेनेपेक्षा अधिकचा एक आमदारही मुंबईत भाजपाने निवडूण आणीत मुंबईत आपण नंबर 1 वर असल्यांचेच दाखवून दिले आहे. निर्णायक संख्येने असलेले गुजराती मतदार, देशातील विविध भागातून आलेले आणि मुंबईत वसलेले परप्रांतीयांची वाढलेली संख्या यामुळे, शिवसेनेचा हमखास असलेला मराठी मतदार कमी होत चालला आहे, त्याचाच राजकीय फटका मुंबईत कधीकाळी एकहाती सत्ता घेणार्या शिवसेनेला बसण्याचीच शक्यता आहे. महाराष्ट्रातील शिवसेना ही 'मुंबईजीवी' आहे. रावणाचा प्राण ज्याप्रमाणे त्याचे बेंबीत होते, तसाच काहीसा प्रकार शिवसेनेचा मुंबई मनपात आहे. ही मनपा हातातून गेल्यास, शिवसेनेच्या ग्रहणाला सुरूवात होवू शकतो. म्हणजे आत्ताची महाविकास आघाडीची सरकार आणि त्यामध्ये मुख्यमंत्रिपद मिळविण्यात शिवसेनेला आलेले यश हे आजवरचे शिवसेनाच्या वाटचालीतील परमोच्च बिंदू ठरेल. भाजपाने मुंबईतील शिवसेनेकडून सत्ता मिळविण्यांत यश मिळविल्यास, राज्याच्या राजकारणातील एका राजकीय पक्षाच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे.
🔸▶️ विजय सिद्धावार ◀️🔸
📞९४२२९१०१६७



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!