कल्याण निधीतुन डॉक्टरांना मानधन -- शासनाने वाढीव मानधन देण्याची शिक्षक परिषदेची मागणी

कल्याण निधीतुन डॉक्टरांना मानधन
-- शासनाने वाढीव मानधन देण्याची शिक्षक परिषदेची मागणी

चंद्रपूर  प्रतिनिधी

चंद्रपूर जिल्ह्यात कमी मानधनावर काम करण्यास तज्ञ डॉक्टर शासकीय रुग्णालयात सेवा देण्यास असहमती दर्शवित असल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत डॉक्टरांना वाढीव मानधन देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक जिल्हाध्यक्ष मोरेश्वर गौरकार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.
    सद्यस्थितीत मोठ्या शहरात कोविड रुग्णांना तज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध होण्यासाठी दरमहा एक लाख मानधन देण्यात येते. मात्र राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत डॉक्टरांना मासिक साठ हजार इतके मानधन दिले जाते. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात कमी मानधनावर काम करण्यास तज्ञ डॉक्टर शासकीय रुग्णालयात सेवा देण्यास असहमती दर्शवित आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अधिकारी/कर्मचारी व शिक्षक यांनी माहे एप्रिल २०२१ च्या वेतनातून एक दिवसाचे वेतन संकलित करून स्थापित केलेल्या जिल्हा परिषद अधिकारी/कर्मचारी कल्याण निधीतुन प्रती डॉक्टर चाळीस हजार रुपये वाढीव मानधन देऊन नागपूर येथील पाच तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे.
    चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अधिकारी/कर्मचारी व शिक्षक यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक दिवसाचे वेतन देऊन उभारलेल्या कल्याण निधीतून कोविड रुग्णांना तातडीने अत्यावश्यक साहित्य, ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर, औषधे इत्यादी उपलब्ध करण्यात येणार होती. मात्र या निधीतून डॉक्टरांना वाढीव मानधन देण्यात येणार असल्याने रुग्णांना अत्यावश्यक साहित्य उपलब्ध होण्यास निधीची कमतरता भासणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत डॉक्टरांच्या मानधनात एक लाख रुपये वाढ करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पदाधिकारी प्रकाश चुनारकर, विजयालक्ष्मी पुपरेड्डीवार, योगिनी दिघोरे, संजय लांडे, अमोल देठे, अजय बेदरे, सुशांत मुनगंटीवार, संतोष जिरकुंटावार, राजेंद्र पांडे, सुनिल टोंगे, दिनेश टिपले, विकास तुरारे, किशोर मुन, सतीश दुवावार, विनोद बाळेकरमरकर, दिलीप राठोड आदींनी केली आहे.


सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा परिषदेचे कर्मचारी व शिक्षक या महामारीच्या काळात आपल्या एक दिवसाच्या पगारातून डॉक्टरांना वाढीव मानधन देत आहेत. असेच उत्तरदायित्व डॉक्टर आणि शासनाने दाखविल्यास रुग्णांच्या सुविधेसाठी निधीची कमतरता भासणार नाही.
   - मोरेश्वर गौरकार, जिल्हाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक, चंद्रपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!