दिवंगत पत्रकार जवाहर धोडरे - भाऊ तुझ्या मूर्तीवानी
भाऊ तुझ्या मूर्तीवानी
आज १० एप्रिल २०२१ माझा मोठा भाऊ स्व. जवाहरलाल वासुदेवराव धोडरे यांची जयंती. हा त्याचा नोंद असलेला जन्मदिनांक. पण नेमका जन्मदिनांक ११ जुलै १९८१ असावा. "Life should be great rather than long." असे डॉ. आंबेडकर यांनी म्हटले आहे. याच उक्तीप्रमाणे माझा भाऊ जवाहरलाल याने कार्य केले. मृत्यूसमयी त्याचे वय अवघे ३८ - ३९ वर्षे होते, मात्र त्याच्या कार्याची थोरवी खूप महान व अवर्णनीय आहे.
माझा मार्गदर्शक, वाटाड्या,पाठीवर थाप देऊन पुढे जाण्यास नेहमी प्रेरित करणारा, माझ्यात स्पर्धा परीक्षेचा दीप तेवत ठेवणारा स्फूर्तीचा झरा, साऱ्या परिवाराचा, समाजाचा, खेड्या पाड्यातील जनतेचा, लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना मदत करणारा, हाकेला रात्री बेरात्री धावून जाणारा, त्यांचे प्रश्न सोडविणारा, *निस्वार्थी जवार* आज आपल्यात नाही हे एक वास्तविक पण दुःखद सत्य आहे. लहानपणापासून अत्यंत हुशार, तल्लख बुद्धिमत्तेचा, एकाच साच्यात, हळुवार वा वेगात सारखीच मोत्यासारखी वळणदार अक्षरे काढणारा, पुस्तकातील माहिती वा प्रश्नाचे उत्तर पान क्रमांकासह सांगणारा, वर्तमानपत्रातील संपूर्ण बातम्या पान क्रमांकासह डोक्यात साठवून ठेवणारा जवाहर जर पत्रकारितेच्या क्षेत्रात आला नसता तर खूप मोठा कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नावलौकिक कमविला असता हे निश्चित. पण नियती व नशिबाने त्याला गोरगरीब जनतेच्या समस्यांना वाचा फोडणारा, समस्या मार्गी लावणारा, निर्भीड पत्रकार बनविले.
लहान असतांना कसरगट्टा या आपल्या मूळ गावात आई नसलेल्या व बापाने वाऱ्यावर सोडून दिलेल्या म्हाताऱ्या आजीजवळ राहणाऱ्या समवयीन मनोज दुर्गे याची तब्येत खूप बिघडली असता गावात वर्गणी जमा करून त्याच्या जवळील नातलगांना आधाराला घेऊन चंद्रपूर येथील सरकारी दवाखान्यात दाखल करवून घेऊन उपचार करायला लावण्याची ही घटना म्हणजे लहानपणापासूनच समाजाप्रती असलेले कर्तव्य याची जाणीव होती हे स्पष्ट करून देते. त्यानंतर अश्या अनेक अडचणी त तो समाजसेवा करू लागला. याच गावातील उराडे नामक विद्यार्थ्याला वर्ग १० वी त जनता विद्यालयात पुनरप्रवेश करून दिला. व या कामी त्याला मुल येथील तत्कालीन सामाजिक कार्यकर्ते श्री बाबुराव वरघंटे गुरुजी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनाच गुरू मानून भाऊंनी गरिबांची संघटना मधून समाजकार्य सुरू केले. त्यानंतर कम्युनिस्ट पक्षाचे अमृतकर काका व देशकर काका यासोबत समाजकारण व राजकारण यात प्रवेश केला. त्याचबरोबर श्री बाबुराव वरघंटे गुरुजी यांचे साप्ताहिक निपटारा मधून पत्रकारितेची प्रत्यक्ष सुरुवात केली. व स्वतः आपली एखादी विद्यार्थी संघटना असावी म्हणून जनवादी विद्यार्थी संघटना स्थापन केली. व सर्व घटकांत समाज कार्य सुरू केले. मात्र या सर्व समाजकारणात आपले घरदार, शिक्षण याकडे दुर्लक्ष होत गेले व आयुष्य एका वेगळ्याच वाटेला लागले, जी वाट खूप खडतर, कठीण, काट्या गोट्यांची, खाच खळग्यांची होती. सर्व नातलग नि ओळखीच्या जाणकार लोकांनी मनपरिवर्तन करून पाहिले पण सर्व व्यर्थ झाले. व याच क्षेत्रात करियर करायचे म्हणून दै. महाविदर्भ, नवराष्ट्र, लोकमत, चंद्रधुन, पुण्यनगरी या सह सकाळ* या नावाजलेल्या दैनिकात तालुका प्रतिनिधी म्हणून लेखन करू लागला. दै. लोकमत मधून काम करीत असतानाच त्याचे बी. ए. चे शिक्षण आटोपले. पत्रकारिता च्या क्षेत्रात करियर करण्याच्या उद्देशाने त्याने या क्षेत्रातील मानाची बी. जे. ची पदवी प्राप्त केली. तो इथवरच न थांबता पुढे गेला. पत्रकारिता क्षेत्रातील मास्टर डिग्री त्याने प्राप्त केली. मास कम्युनिकेशन ची पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत मिळविली. म्हणजेच या क्षेत्रात करियर करता येईल एवढे सारे त्याने मिळविले. पण प्रकृती व परिस्थिती यामुळे त्याची झेप थांबली. किंबहुना कॉम्प्युटर चे पुरेसे शिक्षण व ज्ञान नसल्याने त्याला उपसंपादक पदावर जाता आले नाही. तालुका सोडून जिल्हा ठिकाणी जाण्यास त्याचे मन तयार होईना. त्यामुळे संधी सोडून द्याव्या लागल्या. श्रमिक एल्गार च्या माध्यमातून त्याने पारोमिता ताई गोस्वामी व विजयभाऊ सिध्दावार च्या सोबतीने तालुक्यात शेतकरी सोसायटी स्थापन केली. त्यातून त्याने शेतकरी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला.
आपले सद्याचे जि. प. सदस्य राहुलभाऊ यांचा विवाह सोहळा चंद्रपूर येथे होता. आम्ही या विवाह सोहळ्यास सर्व नातलग परिवार उपस्थित होतो. हा खूप आनंदी क्षण होता. पण देवाडा येथील दिवाकर राऊत या मित्राची प्रकृती अचानक बिघडली नि ही बातमी जशी त्याला मिळाली तसा तो मंडपातून दिसेनासा झाला. त्याला नागपूर मेडिकल मध्ये भरती केलं. सर्व शर्थीचे प्रयत्न केले पण शेवटी त्याचे प्रेतच घेऊन तो तिसऱ्या - चौथ्या दिवशी परतला. गावात येऊन त्याचे अंत्यसंस्कार गावकरी व नातलग यांच्या साहाय्याने आटोपले. अश्या तर्हेने तो नातलग, मित्र इतर जनता यांच्या सेवेचा जणू विडाच उचलू लागला. सर्व स्तरावर जमेल ती मदत केली. माझा मेहुणा एकदा अपघाताने आजारी पडला असता किमान १० दिवस त्याची शुश्रुषा केली. माझ्या परिवारात कुणाचेही सुख दुःख याशी तो नेहमीच जोडला गेला होता. तसाच तो समाजाचेही सुखदुःख यांशी जोडला गेला होता. पाणीपुरवठा योजना, तसेच अनेक शासकीय योजना यांतील सत्य परिस्थिती त्याने दाखवून दिली व गोरगरीब जनतेला, उपेक्षित लोकांना साथ दिली. पत्रकारिता क्षेत्रांतही नाव केले व अनेक पुरस्कार ही मिळविले. कुष्टांतेय अधिकार मंच च्या माध्यमातून कुष्ठरुग्ण असलेल्यांच्या समस्या सोडविल्या.
मात्र हे सर्व समाजकार्य करीत असतानाच २००९ ला त्याला मूत्रविकार जडला नि शेवटपर्यंत तो त्याची पाठ सोडलाच नाही. हा त्रास वारंवार डोके वर करू लागला. दोन तीन दा operation करावे लागले.... सावंगी मेघे येथेही त्याचे उपचार सुरू झाले. तरी यश न मिळाल्याने त्याच्या मनात नकारात्मकता जागा धरू लागली.मागील 2 वर्षे तो सतत दवाखान्यात दाखल होऊ लागला, मूत्ररोख निर्माण होऊन त्याला खूप ताप यायचा पूर्ण शरीरातून घाम सांडायचा. शेवटच्या दिवसांत सहचारिणी च्या तब्येतीने डोके वर उचलले तेव्हा तर तो खूपच त्रस्त झाला. मनातून खचू लागला. तब्येतीकडे दुर्लक्ष करू लागला. व यातच दाढेजवळ गाठ असल्याचे लक्षात आले. नि त्याचे सगळीकडचे लक्ष उडाले. ती गाठ कॅन्सर ची असल्याचे निदान झाले व नागपूर ला भाऊंचे उपचार सुरू केले नि अवघ्या पंधरा - वीस दिवसांत तो आम्हाला सोडून निघून गेला. उपचार सुरू केल्यावर चार पाच दिवसांतच त्याच्या तोंडात त्रास होऊ लागला. दिवाळी झाल्यावर दुसऱ्या दिवशी खीर खाली तेच त्याचे शेवटचे जेवण...... त्यानंतर गळा एवढा बंद झाला की पाणी व श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. दि. १७ नोव्हेंबर मंगळवारला पोंभुर्णा येथे तो सर्वांना भेटला पण नियतीने हीच शेवटची भेट ठरविली. १८ तारखेला त्याची प्रकृती जास्तच बिघडली. पुन्हा नागपूर येथे माझे मामा त्याला घेऊन गेले. गुरुवारी रात्रौ ते तिथून आले. शुक्रवार व शनिवार चंद्रपूर येथे दोन दिवस इंजेक्शन दिले गेले. त्यानंतर आरामाची आवश्यकता असल्याने शनिवारी दि . २१ नोव्हेंबर ला संध्याकाळी आम्ही त्याला घरी आणले. व हीच रात्र काळरात्र ठरेल असे वाटत नसतांना काळाने रात्रौ २ वाजता (२२ नोव्हेंबर २०२०) चे दरम्यान घाला घातला.
आई - दादा यांचेशी बोलत असतानाच पाणी पिण्यासाठी ग्लासाला हात लावणार एवढ्यात ग्लास हातून निसटला, एक सौम्य झटका आला नि भाऊ चा श्वास कायमचा थांबला. त्याच क्षणी माझ्या वडिलांच्या सर्व प्रयत्नांचा नियतीने पराभव केला. सर्वांच्या डोळ्यात अश्रूंची वाट मोकळी करून दिली. एका प्रेमळ व्यक्तीला सारा परिवार, समाज, पत्रकार संघ कायमचा मुकला.
आज माझ्या भाऊ चा वाढदिवस (जयंती). त्याची आठवण सदैव येत राहील. त्याचे नाव, कार्य सदैव लक्षात राहावे म्हणून त्याचे नावे पोंभुर्णा येथे एक वर्तमानपत्र वाचन स्टँड निर्माण करायची ईच्छा असून त्याचे प्रथम स्मृतिदिन पर्यंत ते पूर्णत्वास नेण्यासाठी पत्रकार व इतर मित्रमंडळी यांचे सहकार्याची अपेक्षा आहे.
जवाहरभाऊ च्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
भाऊंच्या आठवणीत सदा शोकाकुल (योगेश.)



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!