छ. शिवाजी महाराज व बाळशास्त्री जांभेकर यांची संयुक्त जयंती साजरी

तालुका - प्रतिनिधी ( आलेख रट्टे )

वरोरा : - ओशनिक बहुउद्देशीय संस्था व आनंदवन मित्र मंडळ, वरोरा यांचे संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज व दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची संयुक्त जयंती श्रीनगर सिटी, बोर्डा येथील ओशनिक बहुउद्देशीय संस्थेच्या  कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली.
 समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार शाम ठेंगडी होते. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सचिव शाहीद अख्तर, माजी सचिव प्रवीण गंधारे, सेवानिवृत्त प्राचार्य बळवंतराव शेलवटकर, आनंदवन मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ प्रवीण मुधोळकर, ओशनिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा पत्रकार राजेंद्र मर्दाने इ प्रामुख्याने उपस्थित होते.
    आपल्या अध्यक्षीय भाषणात ठेंगडी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात उतरविले. महाराजांना मोठी दूरदृष्टी होती. जिद्दीने, चातुर्याने आणि बुद्धी वापरून शिवाजी महाराजांनी समस्यांवर मात करून प्रचंड यश संपादन केले. त्याच्या कार्यास तोड नाही. बाळशास्त्री जांभेकर यांच्या बद्दल बोलताना ते म्हणाले की, ६ जानेवारी १८३२ रोजी बाळशास्त्री जांभेकरांनी ' दर्पण ' हे वृत्तपत्र सुरू करुन मराठीतील आद्य संपादक होण्याचा बहुमान मिळवला. आज पत्रकारिता एक व्यवसाय बनला आहे अशी खंत त्यानी व्यक्त केली. काळानुसार पत्रकारितेचे स्वरुप बदलले असून पत्रकारितेचे ते दिवस पुन्हा येणार नाही, असेही त्यांनी प्रतिपादन केले.
   डॉ.  मुधोळकर म्हणाले की, शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर  महाराजांचे विविध खात्यांचे नियोजन करणारे अष्टप्रधान मंडळ हे व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण आहे. शिवाजी महाराज व बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्यात साम्य असून स्वराज्य निर्मितीत एकाने तलवारीने तर  समाजसुधारनेत दुसऱ्याने लेखनीने परिवर्तन घडवून आणले.
    राजेंद्र मर्दाने म्हणाले की, रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला.  त्यांनी धर्म, जाती पातीच्या भिंती तोडून सर्वांना सन्मान दिला. आचार्य  बाळशास्त्री जांभेकर यांचा बद्दल अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले की, त्याचा जन्म २० फेब्रुवारी १८१२ रोजी पोंभूर्ले( ता.देवगड, जि. - सिंधुदुर्ग ) येथे झाला.बाळशास्त्री जांभेकर हे मराठीतील पहिले वृत्तपत्राचे संस्थापक तर होतेच सोबत ते मराठीतील पहिले मासिक ' दिग्दर्शक ' चे संस्थापक संपादक देखील होते. भारतातील पहिले प्राध्यापक होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. बाळशास्त्री जांभेकर एक थोर व्यक्तिमत्त्व तसेच ज्ञानाच्या विविध क्षेत्रात संचार करणारे  तपस्वी होते. त्याचे महान कार्य पुढील कित्येक पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शन ठरत आहे.
सुरूवातीला शाम ठेंगडी, बी.आर. शेलवटकर व प्रमुख मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज व आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले व दीप प्रज्वलन केले.कार्यक्रमात पत्रकार सादिक थैम, सामाजिक कार्यकर्ते  बंडूभाऊ देऊळकर, राहुल देवडे, ओंकेश्वर टिपले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  शरद नन्नावरे,  संजय गांधी, तुषार मर्दाने इ. नी परिश्रम घेतले.२० फेब्रुवारी या तारखेला विदर्भात बहुदा प्रथमताच बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आल्याची चर्चा होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन प्रा.विशाल जुमडे यांनी केले.आभार राहुल देवडे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!