मानवी संस्कृतीतील सूर्याचे स्थान
लेख
सौ.विद्या मंगळगीरीवार
तुळशीमातेला पाणी घालता घालता सूर्याचा प्रखरपणा जाणवला आणि लक्षात आलं की रथसप्तमी अगदी जवळ आली आहे. मग माहेर आठवलं. माहेरचे अंगण, अंगणातील तुळस, तुळशीपाशी आईने रांगोळीने काढलेला रथ, रथाचे सात घोडे आणि त्यावर आरूढ झालेले नारायण बाप्पा. त्याच्या जवळच गौऱ्यांवर सुगड्यात ( मडक्यात) दुधामध्ये शिजवलेला पांढरा गोड भात.कधी तो भात शिजतो, कधी आई देवाला नैवेद्य दाखवते आणि आम्ही तो प्रसाद केव्हा ग्रहण करतो असं व्हायचं.
खरंच, आपली भारतीय संस्कृती किती महान आहे. निसर्गातील प्रत्येक घटकाविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करत असतो.त्यातच ' सूर्यदेव ' आहे. वेदामध्ये सूर्यनारायण सहा पाकळ्या असलेल्या कमळावर बीजाक्षरयुक्त सात घोड्यांच्या रथावर बसलेले आहेत. त्याला सुवर्णासारख्या चार भुजा आहेत. त्यांच्या दोन हातात कमलपुष्प आहे. तिसरा हात अभयमुद्रासाठी वर आहे. आणि चौथा हात वरप्रदायक आहे असं वर्णन आहे. सूर्याला या सृष्टीचा आत्मा म्हंटले आहे. सूर्यामुळेच ही चराचर सृष्टी निर्माण झाली. सूर्य हाच या संसाराचा पोषणकर्ता आहे. सगळी महाभूते - पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश सूर्यापासूनच उत्पन्न झाली आहेत.
सूर्याला रवि, भानू, अर्क अशी बरीच नावे आहेत. सूर्यप्रकाशाची ओढ सर्व सजीव प्राणीमात्राला असते. अन्नधान्य तयार होण्यासाठी पाण्याची जेवढी गरज असते त्याहून जास्त गरज सूर्यप्रकाशाची असते. आरोग्याच्या दृष्टीने सूर्याचे महत्व खूप आहे. उगवता सूर्य आणि मावळता सूर्य आपल्या किरणांनी कृमींचा नाश करतो आणि शरीराचा निस्तेजपणाही सूर्यप्रकाशामुळे कमी होतो. सूर्याचा संबंध आपल्या शरीरातील चेतसंस्थेच्या व हाडांच्या आरोग्याशी देखील असतो. आपल्या शरीराला आवश्यक असणारं ' ड' जीवनसत्व आपल्याला सूर्यापासून प्राप्त होतं. त्वचेचे रोग ( चर्मरोग) सूर्यप्रकाशामुळे बरे होतात.
आज विज्ञानाने सूर्यप्रकशावर चालणारी अनेक उपकरणे निर्माण केली आहेत - दिवे, पंखे, कूकर इत्यादि. आपण भारतीय लोक खूप नशीबवान ! आपल्याला सूर्यप्रकाश विनासायास आणि मुबलक मिळतो. ज्या देशात सूर्यप्रकाश नाही, त्या देशातील लोक सूर्यप्रकाश मिळावा म्हणून आतुरलेली असतात. सूर्यप्रकाश नसेल तर नैराश्य येते. असा हा सूर्यनारायण अंधार दूर करणारा आणि पापनशक आहे. पूर्वी कृतज्ञता म्हणून लोक सूर्याला सूर्योदयाच्या आणि सूर्यास्ताच्या वेळी अर्घ्य देत असत. परंतु , आता वेळ आणि काळानुसार हे शक्य नाही. तरीही, कमीतकमी दहा ते पंधरा मिनिटे सूर्याची कोवळी किरणे अंगावर घेऊन कृतज्ञता म्हणून त्याला नमन करणे एवढे आपण नक्कीच करू शकतो. महर्षी व्यास म्हणतात, "जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल रंग असलेल्या, कश्यप ऋषींचा पुत्र असलेल्या, तेजस्वी, अंधाराचा शत्रू आणि
पापनाशक असलेल्या सूर्याला मी प्रणाम करतो."
आदित्याय विद्महे सहस्र किरणाय धीमहि l
तन्न: सूर्य: प्रचोदयात ll


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!