कुंडलिनी जागृती एक थोतांड

कुंडलिनी जागृती एक थोतांड

            'सहज योग'या पुस्तकानुसार माणसाच्या माकड हाडामध्ये शुद्ध  इच्छा शक्तीची स्थापना झालेली असते, या शुद्ध इच्छाशक्तीला *कुंडलिनी शक्ती म्हटल्या गेले आहे. ही शक्ती सहज योगाच्या माध्यमातून जागृत करता येते, असा दावा केल्या जातो, त्यालाच *कुंडलिनी जागृती* म्हटले आहे.
        मित्रांनो! आपल्याला माहीत आहे की, वैद्यकशास्त्रानुसार मानवी मेंदू हा डोक्याच्या कवटीमध्ये सुरक्षित असतो. हा मेंदू माणसाच्या सर्व क्रियांचे नियंत्रण करीत असतो. मनात निर्माण होणाऱ्या भावना, इच्छा यांचेदेखील आपला मेंदू नियंत्रण करीत असतो, हे विज्ञानाने सहप्रमाण सिद्ध केले आहे. मग माणसाच्या माकड हाडामध्ये शुद्ध इच्छाशक्तीची स्थापना झालेली आहे,असे सांगणे म्हणजे  हास्यास्पद नव्हे काय?
          मित्रांनो! आजपर्यंत कोणालाही आत्म-साक्षात्कार झालेला नाही. साक्षात्कार झाल्यासारखे वाटणे हे मेंदूला झालेले भ्रम असतात, हे देखील विज्ञानाने सिद्ध केले आहे. तरी देखील कुंडलिनी  जागृतीने  आत्मसाक्षात्कार होतो असे  समाजाला सांगणे,  यासाठी त्यांना प्रवृत्त करणे म्हणजे त्यांना फसविणे नव्हे काय?
           'सहजयोग' म्हणजे साधना किंवा ध्यानधारणा, ही श्रीदेवीच्या फोटो पुढे बसून केली काय, किंवा फोटो नसताना केली काय,दोन्हीचे  सारखेच फायदे होतात. ध्यानधारणा म्हणजे मन एकाग्र करणे, हे करीत असताना मेंदूला सकारात्मक सूचना दिल्यास आपल्या काही व्याधी बऱ्या होण्यास मदत होते, याचे श्रेय श्रीदेवीला देण्याची काहीही  गरज नसते. आपणच त्यांना मोठे करीत असतो. सहजयोगाच्या नावाखाली आत्मा,परमात्मा, बाहेरील शक्ती अशा अनेक अवैज्ञानिक बाबी समाजापुढे मांडणे हे चुकीचे नाही काय?
        *'सहजयोग'* या पुस्तकानुसार  मानवी शरीरात  मूलाधार चक्र,   स्वाधिष्ठान चक्र, नाभी चक्र,  हृदय चक्र, विशुद्धी चक्र,  आज्ञाचक्र, सहस्त्रार चक्र अशी सात केंद्रे असतात. या पुस्तकानुसार मानवी शरीरात तीन प्रकारच्या नाड्या असतात. एक सुषुन्मा नाडी, दुसरी इडा नाडी, तिसरी पिंगला नाडी, असे भाग  शरीर शास्त्रात कुठेच अभ्यासाला मिळत नाहीत. मग आपण अशा अवैज्ञानिक बाबींवर का म्हणून श्रद्धा ठेवायची? या बाबींची आपण चिकित्सा केलीच पाहिजे.अशा प्रकारचे अविज्ञान पसरविणाऱ्या व्यक्तींना आपण थांबविले पाहिजे. कारण  त्यामुळे समाजाचा वेळ आणि पैसा तर जातोच, पण मानवी मेंदू हा गुलाम बनत जातो, हे वेगळे सांगायला नको.
          आपण कोणत्या मार्गाने जावे, काय स्वीकारावे? हा ज्याचा- त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे, पण भारतीय संविधानाच्या कलम 51-ज  नुसार  समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, चिकित्सक वृत्तीचा प्रचार-प्रसार करणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे. म्हणून ज्यांना-ज्यांना विज्ञान कळले आहे, त्यांनी असल्या बाबींची चिकित्सा करून या थोतांडाला वेळीच आळा घालणे गरजेचे आहे.
         एखादा व्यक्ती किती शिकला आहे, त्यापेक्षा तो काय विचार करतो, त्याला महत्व दिले पाहिजे. विज्ञानाने नेहमीच सत्य स्वीकारले आहे. एखादी वैद्यकीय शिक्षण घेतलेली व्यक्ती मानवी शरीरात चक्ररुपी केंद्रे असल्याचे सांगत असेल,  कुंडलिनी जागृतीने  आत्मसाक्षात्कार होत असल्याचा  दावा करीत असेल, त्यांचे भक्तगण फोटोतून किंवा कुंकवातून चैतन्य लहरी निघत असल्याचे सांगत असतील, तर असल्या बाबींची चिकित्सा झालीच पाहिजे. 

*अनिल लोनबले*
 सिंदेवाही, जि. चंद्रपूर 
मो. 9404111968

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!