नवीन वर्षाचे स्वागत करताना...
पत्रकाराच्या लेखणीतून - विनायक रेकलवार
नवीन वर्षाचे स्वागत करताना...
आपण सर्वांनी एक जानेवारीला नवीन वर्षाचे स्वागत केले. स्वागत करताना होश होता,पण जोश नव्हता. किंवा, तो आपण दाखविला नाही. त्याबददल तुमचे स्वागतच आहे. त्याचे कारणही कोरोना संक्रमण हेच आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. नवीन वर्षांचे स्वागत करताना जूने वर्षाचे उणे दुणे सुदधा विचारत घेणे भाग आहे. जुन्या 2020 या वर्षाने आपल्याला लॉकडाऊनची परिस्थिती दिली. आत्ता अनलॉक सुरू असले, तरी आरोग्य सांभाळा ,स्वतःला जपा असेच नवीन वर्षात म्हणावे लागेल. प्रत्येकालाच आपआपली चिंता असते. पशु पक्षी यांना आपल्या पिल्यांची काळजी वाटत असते. साधी मुंगी असली तरी जिवाच्या आकांताने ती सैरावैरा पळतेच. तसेच आपणही कोरोनाच्या काळात सैरावैरा झाल्या सारखे आहोत. अजूनही पाहिजे तसी सुधारणा परिस्थितीत झालेली नाही. कोरोना नवा रूप दाखवित आहे.त्यामुळे नव्या वर्षात ‘‘दो गज दुरी - मॉस जरूरी‘‘ हे कायम लक्षात ठेवलेच पाहिजे. परिस्थिती हळूहळू निवाळताना दिसत असताना सर्वत्र गर्दीचे लोंढे वाढत चालले आहे. कोरोना नाही ही गैरसमजूत मनातून काढून टाकणे योग्य राहील. संक्रमणाची बाधा कधी, कुठे आणि कशी होईल याबाबत विचार करूनच अंगावर काटा येतो. जुन्या वर्षातील कोरोनाचा धडा नवीन वर्षातील अभ्यासक्रमात बदललेला नाही.हे लक्षात असू दया. त्यामुळे उजळणी करायला विसरू नका. नवीन वर्षाचे स्वागत करताना प्रत्येक दिवस आपल्यासाठी नवीनच आहे. हे ध्यानात घेतले पाहिजे. अर्थातच प्रत्येक नवीन दिवस आपल्या साठी नवीन वर्षा सारखाच ठरणार आहे. दुनियेतील नवी पहाट आणि सुर्योदय आपल्यासाठी दुग्धशर्करा योगच म्हणायचा . घरटयातून बाहेर पडलेला पिल्लू घरटयात परत येई पर्यंत पाखरू वाट पाहत असते. तसेच आपले आहे. कामाच्या निमित्ताने बाहेर पडलेला लेकरू केव्हा घरी परत येते ती आपली वाट कोणीतरी बघतच असते. ‘नका करू घाई ,वाट बघते घरी आई‘ हे वळणदार रस्त्यावर लिहलेले वाक्य मला यानिमित्ताने आठवते. उदयाच्या स्वप्नातील भविष्याचा विचार करा.सकारात्मकता बाळगा आणि सुखरूप बाहेर पडा व सुखरूप घरी या. हे नवीन वर्षात आपण शिकले पाहिजे. कारण, की जुन्या वर्षात लॉकडाउन असतानाही ब-याच घटना मनाला चटका लावून गेलेल्या आहेत. वाहतुकीचा कांडमारा नसतानाही रस्त्यांवर अपघात घडले आणि वाट बघणा-यांच्या आप्तांच्या डोळयात पाणी संचारले.निजलेला देह पाहून हंबरडा फोडला गेला. जाणारा निघून गेला. मात्र ,वाट बघणारा गत स्मृतीत हरवला. असं नवीन वर्षात होऊ नये. कोणीतरी माझा आहे. ही जाणीव असू दया, हे नवीन वर्षात आत्मसात केले पाहिजे. शाळा बंद पण शिक्षण सुरू हे जुन्या वर्षाचा पायंडा नवीन वर्षातही सुरूच आहे. परंतु त्याला काही मर्यादा आहे. गरीबा घरची मुले शिकणार कशी. ऑनलाईन जगतात मूले ऑफलाईन झाली. कव्हरेजचा प्रश्न निर्माण झाला. नेट रिचार्ज मारायला पैसे कुठून आणायचे हा ग्रामीण भागातील प्रश्न नवीन वर्षात कायमच आहे. विदयार्थी म्हणतात, गुरूजी रोगाने धान गेले, उत्पन्न कमी झाले ,हातात पैसा नाही.त्यामुळे नेटपॅक कूठून मारू. नववी ते बारावीचे वर्ग सोशल डिस्टसिंगचे पालन करून भरविल्या जात आहे. दहावी ,बारावीची बोर्डाची परीक्षा आहे. अडचणी तर खूप आहे.परंतू त्यावर मात करीत नवीन वर्षात ही परीक्षा दयायची तर आहेच. विदयार्थी मित्रांनो तुम्हीच उदयाचे भविष्य आहात. जुन्या वर्षात विदयार्थ्यांचे खूप मोठे नुकसान झाले.ते भरून काढण्यासारखे तर नाहीच आहे. नर्सरी विदयार्थ्यांपासून तर मोठयातल्या मोठया इयत्ते पर्यंतच्या विदयार्थ्यांचा दीड वर्षाच्या काळात बुदयांक तर घसरला, परंतु गुणवत्ता सुदधा घसरली. त्यामुळे आता जूने सोडा आणि नवीन वर्षात मन लावून अभ्यासाचा संकल्प करा आणि बोर्डाच्या परिक्षेत भरभरून यश मिळवा. आता नवीन वर्षात काय करता येईल याचा विचार करायला हवा. जुन्या वर्षातील सामाजिक,सांस्कृतिक,औदयोगिक,प्राकृतिक घटकातील हाणी खूप मोठी झाली. कोरोना काळातील इतर प्रश्नही खुप निर्माण झालेत. ब-याच प्रश्नांना वेगवेगळया वाटा सापडल्या. घराच्या ओढीने पायी चालणा-यांवर या काळात चांगलेच आघात झालेत. असे विविध दुःख विसरून चालणार कसे.परंतु या दुःखांना मोठया मनाने बाजूला ठेवावेच लागेल. गत काळातील स्मृतींना उजाळा देताना नव्या काळात पुन्हा अशी परिस्थिती उदभवल्यास आधीच काय करता येईल याचा विचार करणे गरजेचे ठरेल. कोरोनाच्या काळात सर्वांचीच चांगलीच वाट लागली. त्यातून अजूनही आपण सावरले गेलो नसलो, तरी नवीन वर्षात नवीन संकल्पानिशी नवं नवं करायला काय हरकत आहे. म्हणूनच, केशवसुतांची तुतारी कविता आठवते, ‘‘
‘‘जुने जाऊ दया मरणालागुनी
जाळुनी किंवा पुरूनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध ! ऐका पुढल्या हाका
खांदयास चला खांदा भिडवूनी. ‘‘
जुन्या वर्षातील कोरोना योद्ध्यांना नवीन वर्षात नवीन शुभेच्छांसह सलाम करू या. अनलॉक असले तरी कोरोना विषाणूच्या संक्रमणाला दूर सारण्यासाठी, कोरोनाला हरविण्यासाठी असलेले सर्व नियम पाळू या. या माझ्या लेखांर्तगत विचारांसह नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना मंगलमय आरोग्य दायी हार्दिक शुभेच्छा!


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!