जागतिक टपाल दिवस

जागतिक टपाल दिवस


सचिन वाकडे, मुल

               जागतिक टपाल दिन हा  दरवर्षी 9 ऑक्टोबरला साजरा केला जातो. इंटरनेटच्या काळात आजही लोकं टपालसेवेचा वापर करतात आणि त्यावरचा विश्वास कायम आहे. एका शहरातून दुसरीकडे टपाल पाठविण्याचं सर्वात सोपं आणि स्वस्त साधन म्हणजे पोस्ट सेवा. फक्त देशातच नाही, तर जगातील कोणत्याही देशात टपाल पाठविण्यासाठी या सेवेचा लाभ घेता येतो.
               बदलत्या काळासोबत जगातील सर्व टपाल सेवांनी त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये आवश्यक बदल केले आहेत. नवीन तंत्रज्ञानासह टपाल सेवांनी स्वताला अधिक जलद केले आहे. डाक, पार्सल, पत्र हे एक्सप्रेसने जाण्याची सेवा सुरु झाली. जवळपास 20 वर्षांपूर्वी या बदलांना सुरुवात झाली, आणि सर्वच स्थरावर तांत्रिक बदल करण्यात आले. आता ऑनलाईन पोस्टल देवाण घेवाणीवरही लोकांचा विश्वास वाढला आहे.
               एक काळ असा होता, जेव्हा लोकं दिवस रात्र पत्रांची वाट पाहत असे. मात्र बदलत्या काळाबरोबरच आणि आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर मोबाईल, सोशल मीडियामुळे क्षणात कोणाशीही संवाद साधता येतो. 20 ते 25 वर्षांपुर्वी पत्र हे अनेकांच्या आयुष्याची लाइफलाइन होते. काहि वर्षांपासून पत्रांचा वापर कमी होत गेला आहे. आज पत्रांची जागा ई.मेल आणि सोशल मीडियाने घेतली आहे. लोकं लांब असले तरीही पत्राद्वारे प्रेम व्यक्त करत असे. मात्र आज लोकं आधुनिक तर होत आहेत, मात्र एकमेंकांपासून लांब जात आहेत.
               स्मार्टफोनच्या काळात पत्र कोण पाठवेल ? हा प्रश्न अनेकांच्या मनात देखील नक्कीच आला असेल. मात्र आजही भारतातील काही ठिकाणी पत्र हेच एकमेंकाशी संपर्क करण्याचे साधन आहे.
               भारतातील टपाल सेवा इंग्रजांनी सुरू केल्यानंतर तिच्या आजवरच्या प्रवासात अनेक आमूलाग्र बदल घडत गेले. आजमितीला भारतीय डाक विभागाची व्याप्ती ही जगामध्ये सगळ्यात मोठं आणि सर्वाधिक पोस्ट ऑफिसेसची संख्या असणारं खातं म्हणून आहे. भारतीय डाक विभाग हा भारत सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत येते.             
               'पिन कोड' क्रमांकाच्या उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे. पोस्टल इंडेक्स नंबर अर्थात 'पिन' हा सहा आकडी क्रमांक आहे. भारतामध्ये ही संकल्पना १५ ऑगस्ट १९७२ मध्ये सुरू करण्यात आली. आजघडीला देशामध्ये नऊ 'पिन' विभाग आहेत. यामध्ये पहिले आठ विभाग हे देशाच्या वेगवेगळ्या भागांसाठी आहेत, तर नववा विभाग हा आर्मी पोस्टल सव्‍‌र्हिससाठी आहे. यामधला पहिला आकडा हा या विभागाला दर्शवीत असतो. पहिले दोन आकडे मिळून सब रीजन किंवा पोस्टाच्या सर्कलचे प्रतिनिधित्व करतात आणि पहिले तीन आकडे एकत्रित जिल्हा वर्गवारीला दर्शवीत असतात. तर शेवटचे तीन आकडे डिलिव्हरी पोस्ट आफिसला दर्शवण्याचं काम करतात. यामध्ये दोन उत्तर, दोन दक्षिण, दोन पश्चिम, दोन पूर्व असं विभागांचं वर्गीकरण आहे. उदाहरणार्थ पहिले दोन आकडे दिल्लीसाठी ११ आहेत, तर महाराष्ट्रासाठी ४० ते ४४ आहेत.
               टपालाच्या तिकिटांच्या व्यावहारिक उपयोगाव्यतिरिक्त, तिकिटे जमविण्याचा छंदही जगभर लोकप्रिय आहे. आधुनिक काळात डाकमुद्राविद्येचे तंत्र खूपच प्रगत झाले आहे. ६ मे १८४० रोजी इंग्लंडमध्ये पहिली तिकीटविक्री सुरू झाली. तेव्हापासूनच साधारणपणे तिकीटसंग्रहालाही चालना मिळाली असे म्हणता येईल.
               आजपर्यंत भारतीय टपाल खात्याने अनेक संत, महामानव, थोरपुरुषांची तिकिटे प्रसिद्ध केली आहेत.
               टपाल खात्याच्या नियमाप्रमाणे जिवंत व्यक्तीवर तिकीट प्रसिद्ध करण्यात येत नाही. परंतु वयाची शंभर वर्षे पूर्ण केल्यास प्रसिद्ध होऊ शकते. हा मान महर्षी धोंडो केशव कर्वे यांना मिळाला. या नियमास अपवाद म्हणून सचिन तेंडुलकर यांची २ तिकिटे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. भविष्यकाळात काही प्रसिद्ध व्यक्तींवर तिकिटे निघतील अशी आशा बाळगण्यात गैर नाही.


आज पोस्ट ऑफिसमध्ये अनेक सुविधा तसेच योजना राबविण्यात येत असून इंटरनेटच्या काळात आजही लोकं टपालसेवेचा वापर करतात आणि त्यावरचा विश्वास कायम आहे.
नरेंद्र सिंह
असि. पोस्ट मास्तर, डाक कार्यालय, मुल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!