हितगुज केले नि प्रेमात पडले ...!'

हितगुज केले नि प्रेमात पडले ...!'

  डॉ. स्वप्णा लांडे, अकोला.
          सप्टेंबर २०१९मध्ये मा.संपादकांचा फोन आला.दै.मातृभूमि मध्ये स्तंभलेखन करायचे आहे.मी म्हणाले,लगेच होकार नाही देऊ शकत कारण डेडलाईन मध्ये लिहिणे बहुदा मला जमणार नाही.दर आठवड्याला मला लिहायला सुचेल की नाही सांगता येत नाही.कारण एखादा विषय घेतला अन् बैठक मारुन लिहायला बसले असं मला जमूच शकत नाही,हे मला पूर्णपणे माहित होते.एखाद्या विषयावर ठराविक दिवस चिंतन केल्याशिवाय किंवा निदान त्या गोष्टीचा अनुभव आल्याशिवाय लिहिणे जडच जाते.काही दिवस मधे गेले अन् अचानक जाहीरातच बघायला मिळाली.वेगवेगळ्या शीर्षकाखाली सहा दिवस सहा लेखक लिहिणार त्यातच मी पण एक...बापरे ! आता कसं करायचं?त्यातल्या त्यात एक बरं,माझ्या स्तंभाचे शीर्षक होते 'हितगूज'.चला म्हटले या निमित्ताने मनातले बोलायला मिळणार.हितगूज करायला मिळणार.दि. ४ आक्टोबरला स्तंभ लेखनाला सुरुवात केली.बरोबर एक वर्ष होत आलेय. आजचा लेख धरुन ५१ लेख पूर्ण झाले.सांगताना अतिशय आनंद होतो आहे की,मी जे काही लिहिले त्याला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व होता.पहिल्याच लेखाला अनेक फोन मेसेजेस आलेत.एका प्राध्यापिका असलेल्या मैत्रिणीचा मेसेज आला,"I shared your article to more than 400 people."बाहेरगावी राहणाऱ्या ननंदेने अभिनंदन केले.म्हणाल्या,मला तुमचा लेख एका मैत्रिणीकडून आला.मी म्हटले "लेख लिहिणारी माझी वहिनी आहे"खूप छान वाटले ऐकून.मग असे अनुभव प्रत्येक लेखाच्या वेळी यायला लागले.लेख का पाठवला नाही म्हणून विचारणा व्हायला लागली.काही प्रतिक्रियांचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो.चिमणीच्या दातांनी तोडणे याविषयी मी लिहिले होते,'संवेदनशीलता हरवलेले शब्द ' या लेखात.एका व्यक्तीचा फोन आला.ते म्हणाले,मला लहानपणीची आठवण झाली.माझी बहीण माझ्यापेक्षा लहान असून चिमणीच्या दातांनी तोडून द्यायची मी मात्र एकटाच खाऊन घ्यायचो.एका माणसाला शेतात पेपर सापडला त्यावरचा लेख वाचून त्यांनी फोन केला.म्हणाले,"मॅडम शेतात आलो होतो.तुमचा गाडगे बाबांवरचा लेख वाचला.खूप चांगला वाटला.या मॅडम कधी वेळ काढून आमच्या इकडे.अमुक अमुक बाबाचं मोठ्ठ मंदीर आहे.भंडारा असते दरवर्षी पुऱ्या गावाचा.तेव्हा नक्की ये जा.(सदर लेखाचे नाव- शाळेची पायरी न चढलेला बुद्धिप्रामाण्यवादी!असे आहे.)भाऊंना शब्द दिला जेवायला नक्की येईन.पण वाईट वाटले थोडे,गाडगेबाबा आपण नेमकेपणाने पोहचवू शकलो नाही याचे.एक मित्र म्हणाला "किती पोटतिडकीने लिहितेस तू!"स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायावर लिहिलेल्या लेखावर आलेल्या प्रतिक्रियेत शंकर बाबा पापळकरांच्या आश्रमातील भिंतीवर लिहिलेल्या ओळी मला पाठवण्यात आल्या-
"यहाँ तेरे जिस्मकी पोशाख पुरानी हो जायेगी
जो अधुरी है वह मुकम्मल पुरी कहानी हो जायेगी
ऐ गैर लडकी की तरफ देखनेवाले
तेरी बेटी भी एक दिन सयानी हो जायेगीI"
स्त्रियांवरील अन्यायाला वाचा फोडताना एका वाचक मित्राने पुरुष सुद्धा पीडित असतो असे म्हणून स्वकथन केले आणि 'पुरुषातले आईपण'हा लेख जन्माला आला.'युरेका - अर्थात समाधीवस्था'या लेखातील कमळ आणि भुंगा यांचे दिलेले उदाहरण वाचून आईने मला फोन केला आणि माझे दादा म्हणायचे ती संपूर्ण कविताच ऐकवली.
"उघड दार प्रियकरास आपुल्या.मध्यरात्रीच्या निळ्यात स्वच्छ चांदणे पडे.पांघरूण रश्मी जाल गाढ झोपली फुले.परी निजे न अजून भृंग,मकरंद शोषण्यात गुंग.या दिशाही उजळल्या,चांदण्याही लोपल्या.उघड उघड पाकळीस आपुल्या."
                    माझ्या सर्व लेखांच्या मध्यभागी माणूस आहे आणि हे माणूसपण प्रदान करणाऱ्या संविधानाप्रती सन्मानाची आणि संविनाधानकर्त्या विषयी कृतज्ञतेची भावना ठायी ठायी आहे.माझे माणसावर,त्याच्यातील मानवतेवर निरातिशय प्रेम आहे.म्हणून माझे लेखन फक्त माणसावरच,माणसासाठीच असावं असं वाटतं.हे लेखन माणसांना जोडणारं असावं असंही वाटतं.त्यासाठी म्हणावेसे वाटते,"भंगू दे काठिण्य माझे,आम्ल जाऊ दे मनीचे.येऊ दे वाणीत माझ्या सूर तुझ्या आवडीचे."लेख लिहिताना असंही व्हायचं कधी कधी,शेवटच्या दिवसापर्यंत सुचायचे नाही.अगदी वेळेवर सुचायचे.मग घाईत लिहून मा.संपादक यांचेकडे लेख पाठवून द्यायचे.दोन-तीन वेळा तर असेही झाले की,गुरुवारच्या दुपारपर्यंत लेख पाठवला नाही.शुक्रवारी लेख येणार तर निदान गुरुवारच्या दुपारपर्यंत तरी जायला हवा.मग काय मा.संपादकांचा फोन लेख पाठवला नाही अजून?अन् माझे उत्तर बापरे !आज गुरुवार आहे का?माफ करा हं!एक- दोन तासात लिहून पाठवते.दोन वेळा तर असे झाले नेमका लेख गुरुवारपर्यंत लिहिला नाही.अन् वेळेवर लिहिलेला लेख पोस्ट होण्याऐवजी चुकून डिलिट झाला.मी काय लिहिले ते माझेच मला आठवत नाही.या दोन्ही वेळेला परत लेख लिहिताना फारच धडधड झाली.(कारण डेडलाईन !)चूक माझीच ना!करणार काय टेक्नॉलॉजीच्या बाबतीत फारच बोंब!
                   पण या अशा चुकांमुळे माझा स्वतःवरचा विश्वास वाढला.फार काही खूप मोठे चिंतन माझ्या लेखांमध्ये नक्कीच नाही. लोकांना का आवडते हे पण कळत नव्हते. तेव्हा वाचकांनीच हा गुंता सोडवला.मॅडम अगदी आमच्या मनातले लिहिता तुम्ही!दोन तीन लेखांमध्ये कोरोना आल्यामुळे एका मित्राने तर विनंतीवजा धमकी पण दिली.खबरदार !यानंतर कोरोना बद्दल लिहिशील तर! अनेक लेखांवर विस्तृत आणि छान छान प्रतिक्रिया आल्यात वाचकांकडून ... मोठया पदावर असलेल्या लोकांनी तर कौतुक केलेच पण,अगदी सर्वसामान्य वाटणाऱ्या,अशिक्षित असणाऱ्या वाचकांनी देखील खूप अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया दिल्या.काहींनी अपेक्षाही व्यक्त केल्या.त्यामुळे थोडी जबाबदारीही वाढली.अनोळखी लोकांशी खूप आत्मियतेचे नाते जुळले.लोक अनेकदा म्हणतात,कौतुक लोक हातचे राखूनच करतात.पण मला मात्र या बाबतीत अगदी उलट अनुभव आला.सासर,माहेर,मित्र,मैत्रिणी सर्वांनी अगदी भरभरून कौतुक केले.सर्वांचे प्रेम,मार्गदर्शन मिळाले.काहींनी विषय सुचवून त्यावर लिहिण्याचा प्रेमळ आग्रह करून लिहिण्यास बाध्य केले.लेखन विविधांगी आहे म्हणूनही शाबासकी मिळाली.महात्मा जोतीराव फुले, सावित्रीआई फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महात्म्यांबद्दल लिहितानाच सर्वसामान्य माणसाच्या जगण्याशी निगडीत सुख-दुःख,अंधश्रद्धा, खुळचट कल्पना यांवरही ताशेरे ओढण्याचा प्रयत्न केला.वैज्ञानिक दृष्टिकोन,महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायदा, शब्दांचे महत्त्व,माणसाला घडविणारी - बिघडवणारी सामाजिक परिस्थिती,त्यानुसार बदलणारे संदर्भ यांवर देखील प्रकाशझोत टाकला.ज्यांनी दिलेल्या अनुभवांनी मी समृद्ध झाले,ते सर्वजण माझ्या लेखाचे विषय आहेत.
             अरे!महत्त्वाचे तर लिहायचेच राहिले. कोण,कुणाच्या प्रेमात पडले हे ऐकायला छानच वाटतं ना आपल्याला!माणसाने एकदा तरी प्रेमात पडावंच.प्रेमात पडलेली व्यक्ती खूप सुंदर दिसते,छान वागते.तर मित्रांनो मी प्रेमात पडले.वाचकांनी माझे केलेले कौतुक याला कारणीभूत आहे.हया वर्षभरात वाचकांनी भरभरून प्रेम दिले,खूप कौतुक केले.मी संवेदनशील असल्याची पावती दिली.त्यामुळे म्हणावेसे वाटते,' हितगुज केले नि नव्याने प्रेमात पडले- स्वतःच्याच!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!