लेख - स्वयंरोजगारासाठी पथदर्शी शिक्षण
स्वयंरोजगारासाठी पथदर्शी शिक्षण - औ.प्र.संस्थेतील व्यवसाय प्रशिक्षण
......काळ बदलत जातो, निसर्ग शिकवित जातो, मनुष्य सातत्याने शिकत जातो अशी एक आपल्याकडील प्रचलित म्हण आहे. कोरोना प्रकोपाच्या विळख्यात अख्खे जगच आज सापडले आहे. अश्या कठीण परिस्थितीत धीर न सोडता संयमाने जीवनाची नवी पाऊलवाट युवावर्गांनी शोधणे आवश्यक झालेले आहे. *तंत्रज्ञाच्या घरी रिध्दी सिध्दी पाणी भरी* हे अमर वचन केवळ बोलण्याने होत नाही तर कृतीने , जीवनात आचरण केल्यानेच सिध्द होत असते. व्यक्ती उद्योगी बनावा , स्वयंस्फुर्त स्वयंरोजगाराकडे वळावा , तो आणि त्याचा समाज सुखी व्हावा ह्याकरीता व्यवसाय प्रशिक्षण सह्याय्यभूत ठरत आहे.
नागपूर विद्यापीठास ज्यांचे नांव दिलेले आहे ते थोर तत्त्वज्ञ राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज आपल्या ग्रामगीता ग्रंथात व्यवसाय प्रशिक्षणाचे महत्त्व विषद करतांना ते लिहितात ,
" मुलात एखादा तरी असावा गुण !
ज्याने पोट भरेल त्यात निपुण !
नये संसारामाजी अडचण !
कोणत्याही परि !!
जीवनाच्या गरजा संपूर्ण !
निर्वाहाचे एकेक साधन !
संबंधित विषयाचे समग्र ज्ञान !
याचा अंतर्भाव शिक्षणी !!( अ१९/११) " ग्रामसुधारणेचा मुलमंत्रच जणू ह्या व्यवसाय प्रशिक्षणाच्या माध्यमातून साकार होऊ शकतो.
आॕनलाईन प्रवेश प्रक्रिया -
*****************
.....आयटीआय प्रवेश प्रक्रिया कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा केंद्रीयभूत ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असून दिनांक ०१ ऑगस्ट २०२० पासून प्रवेश अर्ज ऑनलाईन स्वरूपात https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध झालेले आहे. आयटीआय संस्था कधी सुरु होतील याबाबत लॉकडाऊनसंदर्भात शासनाच्या नियमास अनुसरुन नंतर माहिती योग्यवेळी जाहीर करण्यात येणार आहे.
प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण अशी किमान शैक्षणिक पात्रता आहे. किमान शैक्षणिक अर्हता किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाची शैक्षणिक अर्हता धारण करणारे १४ वर्षावरील उमेदवार आयटीआय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. प्रवेशासाठी उच्च वयोमर्यादा निर्धारित करण्यात आलेली नाही, जेणेकरुन वयाच्या कोणत्याही टप्प्यावर इच्छूक उमेदवार प्रवेश घेऊ शकतात. यंदा प्रवेश अर्ज व नोंदणी शुल्क भरणे, आयटीआय ची निवड करणे, प्रवेश अर्जात सुधारणा, दुरुस्ती करणे, हरकती नोंदविणे आदी सर्व कामे विद्यार्थ्यांना ऑनलाईन करता येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेशासाठी गर्दी होऊ नये, विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागू नये याकरिता प्रवेश प्रक्रियेच्या सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.
प्रवेशासाठी संस्था आणि उपलब्ध जागा
******************-*******
राज्यात प्रत्येक तालुक्यात किमान एक शासकीय आयटीआय आहे. ३५८ तालुक्यात ४१७ शासकीय आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता ९२हजार ५५६ इतकी आहे. आदिवासी भागात आदिवासींसाठी ६१ संस्था, अनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी ४ उच्चस्तर संस्था, अल्पसंख्याकांसाठी २ स्वतंत्र संस्था व ४३ शासकीय आयटीआयमध्ये स्वतंत्र तुकड्या, महिलांसाठी १५ तर २८ आदिवासी (आश्रमशाळा) आयटीआय अशा संस्थांचा समावेश आहे. याचबरोबर राज्यात ५६९ खाजगी आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता ५३ हजार २७२ आहे. शासकीय आणि खाजगी ९८६ आयटीआय असून त्यांची एकूण प्रवेशक्षमता १ लाख ४५ हजार ८२८ विद्यार्थी इतकी आहे.
प्रादेशिक विभागनिहाय शासकीय व खाजगी संस्थांची संख्या व प्रवेशक्षमता पुढीलप्रमाणे आहे. अमरावती – ९० संस्था आणि १७ हजार ९८४ प्रवेशक्षमता, औरंगाबाद – १३३ संस्था आणि १९ हजार २६४ प्रवेशक्षमता, मुंबई – १०८ संस्था आणि २० हजार १२४ प्रवेशक्षमता, नागपूर – २४१ संस्था आणि २८ हजार १३६ प्रवेशक्षमता, नाशिक– २१८ संस्था आणि २९ हजार ५०० प्रवेशक्षमता, पुणे – १९६ संस्था आणि ३० हजार ८२० प्रवेशक्षमता आहेत. उमेदवारांना आवाहन करण्यात येते की, प्रवेश नियमावली काळजीपूर्वक वाचूनच प्रवेशासाठी अर्ज करावा.
इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारांनी आयटीआयमधून २ वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या २ भाषा विषयांची परिक्षा उत्तीर्ण केल्यास त्या उमेदवारास इयत्ता बारावीची समकक्षता देण्यात येते. तसेच इयत्ता दहावी अनुत्तीर्ण उमेदवारांनी आयटीआयमधून २ वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या २ भाषा विषयांची परिक्षा उत्तीर्ण केल्यास त्या उमेदवारास इयत्ता दहावीची समकक्षता देण्यात येते.
प्रवेश प्रक्रियेबाबत निःशुल्क मार्गदर्शन कक्ष प्रत्येक शासकीय औ.प्र.संस्थेमध्ये सुरू करण्यात आलेला असून इच्छूकांनी शंकेचे निरसन करून घ्यावे .
दहावी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण इच्छूक विद्यार्थ्यांनी निर्धारित वेळेत आयटीआयसाठी अर्ज करावा.
उमेदवाराने एकच अर्ज भरावा. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास त्या उमेदवाराचे सर्व अर्ज रद्द होतील.
प्रवेश फेरीकडे विशेषतः लक्ष द्यावे
*************************
*प्रत्येक प्रवेश फेरीत निवड झालेल्या उमेदवारांना निवडपत्र आॕनलाईन उपलब्ध करून देण्यात येईल. उमेदवारानी निवडपत्राची छापील प्रत घेऊन दिलेल्या वेळापत्रकानुसार दिलेल्या औ.प्र. संस्थेत उपस्थित रहावे . प्रवेश निश्चित करतांना आवश्यक दस्तऐवज संबंधित संस्थेत तपासणीसाठी सादर करावे लागेल. प्रवेशाकरीता आॕनलाईन प्रवेश अर्ज तसेच व्यवसाय, संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य १४ आॕगस्ट पर्यंत सादर करता येईल. प्राथमिक गुणवत्ता यादी दि.१६ आॕगस्टला संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल . पहिल्या प्रवेश फेरीसाठी प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही दि.२१ आॕगस्ट ते २६ आॕगस्ट दरम्यान होईल. दुसरी प्रवेशफेरी ३१ आॕगस्ट ते ३ सप्टेंबर या दरम्यान होईल. तिसरी प्रवेश फेरी ८ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर या दरम्यान होईल . चौथी प्रवेश फेरी १६ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर ह्या दरम्यान होईल. विहीत मुदतीत प्रवेश अर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीत संधी उपलब्ध करून देण्यासाठी आॕनलाईन प्रवेशअर्ज दि. १ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या दरम्यान स्विकारले जातील तसेच २१ सप्टेंबर रोजी समुपदेशन फेरीसाठी एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. सर्व शासकीय औ.प्र.संस्थेत चौथ्या प्रवेश फेरीच्या समाप्तीनंतर शिल्लक राहिलेल्या जागा जिल्हास्तरीय समुपदेशन फेरीद्वारे भरण्यासाठी उपलब्ध राहतील. गुणवत्ता क्रमांकानुसार प्रवेशाच्या जागांचे वाटप दि.२४ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर ह्या दरम्यान होईल. उमेदवाराने त्याचा प्रवेश खात्याचा पासवर्ड कुणासही देऊ नये. आॕनलाईन प्रवेश प्रणाली व्यतिरिक्त प्रवेश घेणाऱ्या उमेदवाराचे प्रवेश ग्राह्य धरण्यात येणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी . प्रवेशफेरी चा स्वतंत्र तक्ता याच लेखात वाचकांना उपलब्ध करून दिलेला आहे. प्रवेशोच्छूक उमेदवारांनी ह्या तक्त्याचे नीट अभ्यास करावा.
*कौशल्य मिळवा देश घडवा*
***-*-***************
आजच्या काळाची मागणी लक्षात घेता कुठल्याही छोट्या मोठ्या कामासाठी कुशल मनुष्यबळ महत्त्वाचे मानले जातात . कारण देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी प्रत्येकाकडे कौशल्य असावे लागते . एकीकडे नोकरीकरीता प्रचंड स्पर्धा , वाढती बेरोजगारी लक्षात घेता अलिकडे युवकांचा ओढा कळत नकळत व्यवसाय प्रशिक्षणाकडे वाढलेला दिसत आहे. इयत्ता दहावी बारावी पर्यंत चे शालेय दिवस संपले की मग सुरू होते प्रत्येकांच्या मनात आपल्या करिअरची चिंता.तरूणांसाठी ही पाऊलवाट नवीन असते .या वाटेवरील अडचणी त्यांना माहित नसतात .चाकोरीच्या पुढे जाऊन जीवनाला कौशल्ययुक्त दिशा देण्यासाठी आय.टी.आय.चे व्यवसाय प्रशिक्षण एक महत्त्वपुर्ण पर्याय ठरला आहे. व्यक्तीचे जीवन स्वावलंबी ,स्वयंपूर्ण करणाऱ्या ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ निर्माण केले जाते.
एकवर्षीय अभ्यासक्रम डिझेल इंजिन मेकँनिक,ट्रँक्टर मेकँनिक ,वेल्डर ,पत्रे कारागीर ,प्लास्टिक प्रोसेसिंग आपरेटर ,मेकँनिक ॲटो इले.ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स ,इंटेरीयर डेकोरेशन ॲन्ड डिझायनिंग ,काँम्पुटर आँपरेटर ॲन्ड प्रोग्रामिंग असिस्टंट, तर फक्त मुलींकरीता सुईंग टेक्नालाँजी ,बेसिक कास्माटोलाँजी ,ड्रेस मेकिंग ,फँशन टेक्नालाँजी उपलब्ध आहे तर दोन वर्षीय अभ्यासक्रम विजतंत्री ,तारतंत्री ,फिटर,कातारी,यंत्र कारागीर, यंत्र कारागीर घर्षक,मेकँनिक वातानुकूलीकरण व प्रशितन,मेकँनिक इलेक्ट्रॉनिक्स ,मेकँनिक मोटार व्हेईकल,ड्राफ्टस्मन सिव्हिल आदी अनेक व्यवसाय प्रवेश घेण्यासाठी उपलब्ध आहे. व्यवसाय संबंधी सर्व माहिती आॕनलाईन उपलब्ध आहे.आदिवासी जिल्ह्यात आदीवासी उमेदवाराकरिता ७५ टक्के जागा राखीव असून प्रवेशाकरीता लागणारे विविध प्रमाणपत्र कुठले आहे याची यादी वेबसाईटवर दिलेली आहे.जे प्रमाणपत्र आवश्यक आहे ते नसेल तर तात्काळ काढणे गरजेचे आहे.मुलींकरीता प्रत्येक व्यवसायात ३० टक्के जागा राखीव असून प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पध्दतीने शासनाच्या नियमाप्रमाणे होईल.गरजू व इच्छूकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतल्यास शासकीय तथा अशासकीय आस्थापनांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होतात.अनेक खाजगी कंपन्या ,फँक्टरीज मध्ये आय .टी.आय.प्रमाणपत्र धारकांना विशेष मागणी आहे.केवळ एक /दोन वर्षात रोजगार देणारे हे प्रशिक्षण अभ्यासक्रम गरजू ,होतकरू विद्यार्थ्यांकरीता खरोखर वरदान ठरणारे आहे. महाराष्ट्रात ७९ एकूण व्यवसायात अभियांत्रिकी गटात एक वर्षीय २४ व्यवसाय आणि दोन वर्षीय ३१ व्यवसाय तर बिगर अभियांत्रिकी गटात एक वर्षीय २३ व्यवसाय आणि दोन वर्षीय १ व्यवसाय असून या आॕनलाईन प्रवेश पध्दतीमुळे वेळ , पैसा, मनुष्यबळ याची बचत झालेली असून संपुर्ण कामात पारदर्शकपणाही आला आहे.
समारोप
******
मित्रांनो आय.टी.आय. प्रवेश प्रक्रीयेला सुरुवात झाली आहे. प्रवेशाच्या काळात चौकशीसाठी येणार्या मुलांना आय,टी.आय मध्ये काय शिकायचे असते हे जाणून घ्यायचे असते. शिकविले जाणार्या ट्रेडबध्दल अनेकांना काही माहीत नसते. आय.टीआय मध्ये शिकविले जाणारे ट्रेड, ट्रेडचा प्रशिक्षण कालावधी , शिकविले जाणारे विषय , परिक्षेचे स्वरुप , ट्रेडपूर्ण केल्यावर पुढे काय ? जाॅब लागतो का? कुठे? अश्या अनेक प्रश्नांचे निरसन करण्यासाठी प्रत्येक संस्थेत मार्गदर्शन कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. तसेच www.itiadmissioninmarathi.in वरही बरीचशी माहीती उपलब्ध करून दिलेली आहे. त्यात व्यवसाय तांत्रिक शिक्षणाचे महत्त्व, आय.टी.आयचे स्वरुप आणि ट्रेडच्या अभ्यासक्रमानुसार काय शिकविले जाते याबाबतीतची माहीती समाविष्ट आहे . प्रवेश घेणाऱ्या मुलांना ट्रेड निवडताना या माहितीचा नक्कीच फयदा होईल. चला तर मग ! सकारात्मक दृष्टीने आपण कौशल्ययुक्त प्रशिक्षणानी जीवनाला नवी दिशा देऊ या.
. ✍.....बंडोपंत बोढेकर ,
शास.औद्योगिक प्रशिक्षण संस्था
गडचिरोली (महाराष्ट्र )
9975321682/brb.rastra@gmail.com




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!