मर्दानी झाशीवाली
मर्दानी झाशीवाली
"नको विसरा इतिहास आमचा
एक झाॅकी दाखवते मी
भारताची माती कशी आहे
तुम्हाला आज सांगते मी."
मराठ्यांचे शेवटचे पेशवे दुसरे बाजीराव. बाजीरावांना नानासाहेब आणि रावसाहेब हे त्यांचे दोन मुलगे आणि या दोन मुलांच्या बरोबर एक चिमखडी पोर खेळत असे. दिसायला ही मुलगी गोरीपान होती तरतरीत आणि सरळ नाक टपोरे आणि पाणीदार डोळे, तेजस्वी मुख् मंडळ आणि वेताच्या छडी सारखा लवलवणारा बांधा, त्यामुळे या मुलीकडे कोणाचेही लक्ष चटकन वेधले जाई. त्यातच तिच्या बोलण्याची ऐट आणि कुठल्याही मर्दानी खेळातील तिचे प्राविण्य यामुळे तर पाहणाऱ्यांचे देहभान हरपून जाई आणि जो तो म्हणे,"वा रे छबिली!".
त्याच्याकडून आदर्श घ्यावा असे बरेच पराक्रमी वीर हिंदुस्थानातील अठराशे सत्तावन च्या स्वातंत्र्य सम्ररात चमकले. त्या सर्वांमध्ये असामान्य पराक्रम गाजवणाऱ्या, पाठविला झोळीत बाळाला घेऊन, घोड्यावर स्वार अशा झाशीच्या राणी लक्ष्मीबाई.
दुसर्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांचे व्यवस्थापक मोरोपंत तांबे व भागीरथीबाई या दाम्पत्याच्या पोटी कार्तिक वद्य 14शके1757 म्हणजे इंग्रजी कालगणनेनुसार 19 नोव्हेंबर 1835ला लक्ष्मीबाई यांचा जन्म झाला. मोरोपंतांनी तिचे नाव "मनुताई "ठेवले. मनुताई रूपाने देखणी व हुशार होती. मनुताई तीन चार वर्षाची असतानाच मातेचे छत्र नाहीसे झाले. ती पुढे ब्रह्मावर्त येथे दुसर्या बाजीराव पेशव्यांच्या आश्रयास गेली.
ब्रह्मावर्ता येथील वाड्यात राजपुत्रांच्या बरोबर तलवार, घोडदोडी चे शिक्षण, बंदुक चालवणे, दांडपट्टा इत्यादी शिक्षण म्हणून घेत होती. त्यांच्यासोबत राहून मनू ताईने युद्धकलेचे शिक्षण घेऊन त्यातील पेच आत्मसात केले. मोडी अक्षर ओळख आणि लेखन वाचन मनुताई ने त्यांच्या समवेत शिकून घेतले. वयाच्या सातव्या वर्षी 18 42 साली मनुताई यांचा विवाह झाशी संस्थानाचे अधिपती गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. मोरोपंत तांबे यांच्या मनुताई विवाहित होऊन झाशीची राणी म्हणून संबोधल्या जाऊ लागल्या. विवाहानंतर त्यांचे नाव "लक्ष्मीबाई "असे ठेवण्यात आले.
धर्म सेवा आणि पती सेवा यामध्येच लक्ष्मीबाईचा सारा वेळ जात असे. काही वर्षानंतर त्यांना एक मुलगा झाला. पण तीन-चार महिन्याचा असतानाच तो देवाघरी गेला. यानंतर राणीच्या दुर्दैव यास प्रारंभ झाला. काही दिवसांनी श्रीमंत गंगाधरराव नवजवराने आजारी पडले. आणि त्यामधून आपण जगत नाही हे पाहिल्यावर त्यांनी आपल्या मांडीवर दत्तक मुलगा घेण्याचे ठरविले. त्यावेळेच्या पोलिटिकल एजंटच्या समक्ष महाराज गंगाधरराव यांनी आनंदराव या मुलास दत्तक घेतले आणि त्याचे नाव दामोदर राव ठेवले.21 नोव्हेंबर 1853 रोजी गंगाधर रावांवर काळाने झडप घातली. झाशी दुःख सागरात बुडून गेली. वयाच्या अठराव्या वर्षी राणी लक्ष्मीबाई यांच्यावर वैधव्याची कुऱ्हाड कोसळली.
7 मार्च 1854 रोजी इंग्रजांनी दत्तक वारस नामंजूर करून झाशीचे संस्थान खालसा केले. इंग्रज अधिकारी मेजर एलिस लक्ष्मीबाईंना भेटायला आला त्याने झाशी संस्थान संपुष्टात आणले गेले याची राजघोषणा करताच राणी म्हणाल्या" मै अपनी झांसी नही दुंगी"!
अठराशे सत्तावन मधील जानेवारीत सुरू झालेल्या स्वातंत्र्य युद्धाने 10 मे रोजी मीरत येथे ही पेट घेतला. राणी बंड वाल्यांना सामील झाली असा विपरीत ग्रह इंग्रजांनी करून घेतला. आणि जनरल हयू रोजने एके दिवशी झाशीस वेढा दिला. हे युद्धाचे आव्हान राणीने स्वीकारले आणि झाशी लढवू लागली. पेशव्यांची मदत तिला मिळाली नाही. आठ दिवस पर्यंत बेसुमार गोळागोळी झाली. सारे झाशी शहर आगीने धडाधड पेटले.बुरुज ढासळले. आत्महत्येचा विचार तिच्या मनात आला. पण एका वयोवृद्ध सेवकाने तिला या बेतापासून परावृत्त केले. लाडक्या झाशीला अखेरचे पाहून राणीने आपला मुलगा पाठीशी बांधला आणि इंग्रजांच्या कचाट्यातून निसटली.
सतत 24 तास घोड्यावरची रपेट करून एकशे दोन मैल अंतर कापून राणी काल्पीस जाऊन पोहोचल्या. सर ह्यू रोजने कालपीवर हल्ला चढवला. व कालपी आपल्या ताब्यात घेतली. इंग्रजांशी लढता लढता त्या रक्तबंबाळ झाल्या. विश्वासू नोकरांनी जवळच्या एका बैरागी बाबांच्या मठात नेऊन तिच्यावर उपचार केले पण काहीही उपयोग झाला नाही. आपल्या शरीराला शत्रूचा स्पर्श होऊ नये म्हणून जवळच असलेल्या गवताच्या गंजी च्या शैययेवर राणी पहुडली. दामोदर चा प्रतिपाळ करण्याविषयी जवळ असलेल्या विश्वासू लोकांना सांगून राणीचा आत्मा अनंतात दिनांक 18 जून इसवी सन1 858 रोजी विलीन झाला. गवताच्या गंजी वर पडलेल्या राणीच्या देहाला अग्निने आत्मसात केले. शौर्य ,धैर्य ,तेज, पराक्रम ,चातुर्य त्या तेजात मिसळले." खूब लडी
मर्दानी वो तो झाशीवाली राणी थी!".
सौ. भारती दिनेश तिडके
रामनगर गोंदिया
8007664039.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!