मूल्यशिक्षण ही काळाची गरज #value #education

मूल्यशिक्षण ही काळाची गरज


आज समाजात अनेक कुप्रथा डोके वर करू पहात आहेत. तरूणाईच्या हाताला काम नसल्यामुळे भ्रष्टाचाराला बळी पडत आहे .दिवसा ढवळ्या चोरीचपाटी होते आहे.
सुशिक्षित वर्ग नोकरीच्या मागे
लागतं आहेत . जे स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रवेश स्पर्धेत टिकू शकत नाहीत, ते गैरमार्गाचा अवलंब करू पाहतात.
जीवन कुठे आहे ?जगण्यातच हरवले आहे.
अनैतिक मार्गाने शाळा-कॉलेज प्रवेश मिळवितात, पैसा देऊन नोकरी मिळवितात. यामुळे हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. जे पात्र उमेदवार आहेत, ते नोकरीत डावलले जातात आणि नालायकांना संधी मिळते. आपली एकूणच व्यवस्था भ्रष्ट झाली आहे. या भ्रष्ट व्यवस्थेत प्रामाणिक लोकांवर अन्याय होतो. भ्रष्ट व्यवस्थेत अन्यायग्रस्तच त्याचाच बळी जातो. तुम्ही जर व्यवस्थेचा भाग बनलात तर तुमच्या केसालाही धक्का लागत नाही. पण, तुम्ही भ्रष्ट व्यवस्थेला स्वीकारले नाही, तर तुम्हाला त्रास दिला जातो. अनेक सिनेमांमधून आपल्याला अशी उदाहरणे पाहायला मिळतात. चित्रपटात अशी उदाहरणे का घातली जातात? कारण, वस्तुस्थितीच अशी आहे. प्रामाणिक माणसांना समाजात स्थान नाही. तुम्ही जेवढे प्रामाणिक तेवढेच व्यवस्थेला बळी पडतात. तुम्ही जेवढे प्रामाणिक तेवढे बेईमानांना नकोसे असतात. ही स्थिती विचारात घेतली तर प्रामाणिक राहणे हा गुन्हाच म्हणावं लागेल.
शहाणपण कुठे आहे?ज्ञानातच हरवले आहे.
एका शाळेत घडलेली घटना अंगावर शहारे आणणारी काळजी वाढविणारीही . गृहपाठ केला नाही म्हणून शिक्षकाने रागावले, या रागावण्याचा राग विद्यार्थ्याला एवढा आला. याच रागातून त्याने शाळा बंद पाडण्याचा फैसला करून टाकला. एखाद्या विद्यार्थ्याला ठार मारले तर शाळाच बंद पडेल, या भावनेने त्याने शाळेच्या स्वच्छतागृहात अन्य एका विद्यार्थ्यावर चाकूने सपासप 30 वार केले आणि त्याला ठार मारले. झाले, पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनावर दोषारोपण सुरू केले, व्यवस्थापन हलगर्जीपणा करीत असल्याचा आरोप केला. पोलिस ठाण्यावरही मोर्चा नेण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविताच खरा प्रकार उघडकीस आला अन सगळेच सुन्न झाले. ईर्ष्येतून एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याची हत्या केली होती. हे प्रकार का घडतात ?आणि ते घडू नयेत यासाठी काय केले पाहिजे? यावर आता गंभीरपणे चिंतन करणे आवश्यक आहे.
     बी .ई. च्या प्रथम वर्षाला शिकणारी लतिका चा झालेला मृत्यू मनाला चटका लावून गेला. तिचा नैसर्गिक मृत्यू नाही झाला. तिने आत्महत्या करून स्वत:ला संपविले. लतिका अतिशय हुशार होती, मनमिळावू होती. सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी होती. तरीही तिला आत्महत्या करावी लागली. तिने आत्महत्या का केली होती? तिचा दोष एकच होता तो म्हणजे जन्मजात हुशारी अन मनाने संवेदनशील. अभ्यासात ती फारच हुशार होती. मैत्रिणींच्या पुढे होती.  प्रथम वर्षात तिने सगळ्या मैत्रिणींना मागे टाकत आघाडी घेतली होती. बस्स, मैत्रिणींमध्ये तिच्याप्रति ‘ज्वेलसी’ निर्माण झाली. तिच्या हुशारीचा तिच्याच मैत्रिणी द्वेष करायला लागल्या. त्यातून त्यांनी सगळ्यांनी मिळून तिचा काटा काढण्याचे ठरविले. वसतिगृहात राहणार्यात तिच्या मैत्रिणींनी तिच्यावर अनेकदा खोटे आरोप केलेत. तिने आमच्या नोटस चोरल्या आहेत, असाही आरोप मैत्रिणींनीच केला अन्  याचा लतिकाला फार मानसिक त्रास झाला. कारण ती अतिशय संवेदनशील मनाची होती. तिला हे आरोप सहन झाले नाहीत. मानसिकदृष्ट्या ती अतिशय खचली होती. अशा खचलेल्या मानसिक अवस्थेत ती घरी आली होती. कारण, परीक्षा संपल्यामुळे सुट्या लागल्या होत्या. घरी आल्यानंतर तिने याची माहिती वडिलांना दिली होती. आता पुन्हा मी तिथे शिकायला जाणार नाही, असे तिने बोलून दाखविल्याने वडिलांनीही तिची समजूत काढली. तिच्या मैत्रिणींनाही वडिलांनी दूरध्वनी करून समजून सांगितले. पण, लतिकाच्या मनाची तयारी होत नव्हती. वडिलांनी जर पुन्हा जायला सांगितले तर आपल्याला जावेच लागेल अन पुन्हा मैत्रिणींचा जाच सहन करावा लागेल, या भीतीने तिला झोप लागत नव्हती. अखेर एक दिवस तिने या सगळ्यांवर तोडगा काढतांना स्वत:लाच संपविण्याचा निर्णय घेतला. तिने आत्महत्या केली. कॉलेजमधील मैत्रिणींनी केलेल्या रँगिगमुळे एका हुशार मुलीचा नाहक मृत्यू झाला. देश एका हुशार भावी महिला ईजिनिअरला मुकला होता.अशा घटणा का घडतात?मूल्य शिक्षणावर भर दिला जात नसल्याने आणि घरी आईवडिलांकडून अवास्तव अपेक्षा केल्या जात असल्याने. विद्यार्थ्यांच्या मनावर त्याचा परिणाम होतो. हा परिणाम नकारात्मक असतो. आपल्या आईवडिलांच्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकत नाही, मग आपल्या मित्रमैत्रिणींना तरी त्या का पूर्ण करू द्यायच्या, असा नकारात्मक विचार विद्यार्थ्यांकडून केला जातो. विद्यार्थी-विद्यार्थिनींपेक्षा त्यांच्या पालकांनाच मुलांच्या गुणांबद्दल जास्त आकर्षण असते. 
     इतरांबद्दल जेव्हा मनात मत्सराची भावना निर्माण होते आणि त्या भावनेतून जेव्हा त्रास दिला जातो, तेव्हा तो प्रकार अनैतिक अन अनावश्यक मानला पाहिजे. आपल्याला पुढे जायचे आहे म्हणून आपल्या वर्गातील हुशार अन संवेदनशील मनाच्या मुलींना त्रास द्यायचा, त्यांना हैराण करायचे, वेगवेगळ्या माध्यमातून भावनात्मक छळ करायचा, अतिशय गलिच्छ आरोप करून त्यांची प्रतिमा मलीन करायची अन सरतेशेवटी त्यांना शाळा-कॉलेज सोडण्यास वा आत्महत्या करण्यास बाध्य करायचे, असले कृत्य हा नैतिक मूल्यांच्या आणि संस्कारांच्या अभावाचाच परिणाम म्हटला पाहिजे.
             यावर मूल्य शिक्षण हाच एक चांगला आणि प्रभावी उपाय ठरू शकतो. मुलामुलींप्रमाणेच विद्यार्थ्यांच्या पालकांचे प्रशिक्षण आणि प्रबोधन करणेही आता आवश्यक झाले आहे. इतरांची रेषा पुसण्यात आपली ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा, इतरांचा द्वेष करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा आपली रेषा त्यांच्यापेक्षा मोठी करण्याचा प्रयत्न केला तर ते जास्त उत्तम!नैतिक मुल्याची जपणूक करणे आजच्या काळाची आवश्यकता आहे.
मुल्यशिक्षणाने होतो मनाचा विकास
जीवनी असावा नवचैतन्याचा ध्यास

महेन्द्र सोनेवाने
शास्त्रीवार्ड गोंदिया
 संपर्क (9420516306 )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!