कर्मयोगी श्रीतुकारामदादा गीताचार्य पुण्यतिथी संपन्न

सोशल मिडीयाच्या माध्यमातून कर्मयोगी श्रीतुकारामदादा गीताचार्य यांची पुण्यतिथी संपन्न

चंद्रपूर (प्रतिनिधी ) -

राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समितीच्या वतीने कर्मयोगी श्रीतुकारामदादा गीताचार्य यांची पुण्यतिथी सोशल मिडीयाच्या माध्यमातून
साजरी करण्यात आली. फेसबुक पेज आणि व्हॕटसॲप समुहाच्या साह्याने दोन दिवस चाललेल्या प्रबोधनपर कार्यक्रमात झाडीबोली साहित्य मंडळाचे डाॕ. हरिश्चंद्र बोरकर , ज्येष्ठ समाजसेवी व्यक्तीमत्व रविंद्र भुसारी , गडचिरोली श्रीगुरूदेव सेवामंडळाचे जिल्हाध्यक्ष डाॕ. शिवनाथ कुंभारे , ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , ज्येष्ठ लेखक सुरेंद्र बुराडे ,  साहित्य परिषदेचे    ॲड. राजेंद्र जेनेकर आदींनी विचार मांडले.  गीताचार्य श्रीतुकारामदादा यांनी लोकसंघटन करून  ग्रामसुधारणेच्या कार्याला रचनात्मक वळण दिले. आध्यात्मिक क्षेत्रात त्यांचा मोठा अधिकार होता, असे प्रतिपादन रविंद्र भुसारी यांनी व्यक्त केले तर डाॕ. कुंभारे म्हणाले की,  राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांच्या पावन प्रेरणेने श्रीतुकारामदादा गीताचार्य यांनी आपले उभे आयुष्य ग्रामगीतेच्या प्रचारार्थ घालविले. ग्रामसभेच्या सक्षमीकरणासाठी दिलेले योगदान ऐतिहासिक असल्याचे ते म्हणाले . राष्ट्रसंताच्या आशीर्वादाने ग्रामगीतेनुरूप   दादांनी तयार केलेला भूवैकुंठ  प्रयोग प्रत्येकांला स्वावलंबी जीवन जगण्याचा मंत्र देणारा आहे. अंधश्रध्दा निर्मुलन आणि व्यसनमुक्ती कार्यातही त्यांनी दिलेले योगदान मोठे असल्याचे मत बंडोपंत बोढेकर यांनी मांडले.  कोरोना प्रकोप सुरू असल्याने शासनाच्या सुचनांचे योग्य पालन करून सोशल मिडीयाच्या माध्यमातून गीताचार्य श्रीतुकारामदादा यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.  सामुदायिक  ध्यानपाठ  व  प्रार्थना विषयावर डाॕ. कुंभारे यांनी विचार व्यक्त केले. समारोपीय कीर्तनाचा कार्यक्रम नागपूरच्या सुप्रसिद्ध खंजरी कीर्तनकार  मोहनदास चोरे यांनी सादर केला. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!