समीक्षा.....खंजरी काव्यसंग्रह

अस्सल झाडीबोलीने साज चढविलेला काव्यसंग्रह - "खंजरी"
- कवी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर
(रसग्रहण - राजेंद्र एन. घोटकर)

ग्रामगीताचार्य श्री. बंडोपंतजी बोढेकर सर म्हणजे चंद्रपूर परिसरातील एक असामान्य असं अष्टपैलू व्यक्तीमत्व. चंद्रपूर जिल्ह्य़ातील पेलोरा ह्या छोट्याशा गावी एका सामान्य कुटुंबात जन्म आणि प्राथमिक शिक्षण घेऊन आज साहित्य क्षेत्रातील त्यांनी गरुडभरारी घेतली आहे. सामाजिक, सांस्कृतिक अशा अनेक क्षेत्रात त्यांचं फार मोठं योगदान आहे. आपला शिक्षकी पेशा निष्ठेने सांभाळत सरांनी गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्याला संपूर्णतः वाहुन घेतलं आहे. गुरुदेव सेवा मंडळाच्या ठिकठिकाणी शाखा उघडणं, त्यांना मार्गदर्शन करणं, विविध चर्चासत्रात भाग घेऊन उद्बोधन करणं अशा अनेक कार्यामध्ये सरांनी स्वतःला पुर्णपणे झोकून दिलं आहे. सरांचा अनेक ठिकाणी विविध पुरस्कार देऊन गौरव झाला आहे. नुकताच त्यांना महाराष्ट्र राज्य सरकारने व्यसनमुक्ती पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.
 राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे राष्ट्रसंत विचार साहित्य कृती संमेलन घेऊन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज निर्मित अ. भा. गुरुदेव सेवा मंडळाच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी ते सतत अहोरात्र धडपडत असतात. नव्हे तर त्यांनी हा वसाच उचलला आहे.  हे त्यांचे कार्य चालू असताना विविध सांस्कृतिक आणि साहित्यिक मंडळाशी त्यांचा संबंध आलेला आहे त्यात झाडीपट्टीतील झाडीबोली साहित्य मंडळाचा विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल. जवाहर नगर भंडारा येथे पार पडलेल्या रौप्यमहोत्सवी झाडीबोली साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष राहिले आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात  विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली ह्या जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी झाडीबोली साहित्य मंडळाच्या शाखा स्थापन करु फार मोठी साहित्य चळवळ उभारली आहे. एवढे करूनही ह्या माणसाला कशाचाच गर्व नाही. प्रत्येकाला मान सन्मान देणे हा त्यांचा स्थायी भाव आहे. आम्हालाही त्यांच्या सावलीनं कार्य करण्याचं भाग्य लाभलं. 
      
          सरांनी एवढ्या व्यस्ततेतही अनेक प्रकारच्या साहित्याची निर्मिती सरांनी केली आहे. त्यापैकी सरांचा 'खंजरी' हा वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या साहित्याच्या चिंतनातून प्रकट झालेला कवितासंग्रह. पुर्वी लोकजागृती करण्यासाठी अनेक संतांनी, विचारवंतांनी विविध माध्यमांचा वापर केलेला आपणांस दिसून येतो. त्याचप्रमाणे वं. राष्ट्रसंतांची खंजरी ही त्यातूनच जन्माला आली. आणि याच खंजरीच्या खड्या बोलावर भारतीयांना जागृत केले. ''झुठी गुलामशाही क्यो डर दिखा रही है..."  " पत्थर सारे बॉंब बनेंगे भक्त बनेगी सेना... "या आणि अशा अनेक विरश्री संचारलेल्या भजनांनी भारतीयांना इंग्रज सत्तेविरुद्ध जागृत करण्याचं काम वं. राष्ट्रसंतांनी केलं. हीज खंजरी पुढे प्रबोधनाचं माध्यम ठरली. आणि हिच प्रेरण घेऊन श्री. बंडोपंतजी बोढेकर सरांनी आपला सुंदर असा" खंजरी" हा प्रबोधनात्मक काव्यसंग्रह प्रकाशित केला. 

       श्री. बोढेकर सरांच्या 'खंजरी' ह्या  कवितासंग्रहात अस्सल झाडीबोलीत असलेल्या एकूण ३६ कविता आहेत. ह्या कवितासंग्रहातील सर्व कविता ह्या झाडीबोलीने श्रुंगारलेल्या असल्याने वाचताना एक वेगळीच  आनंदानुभूती मिळते. ह्या संग्रहातील 'खंजरी' हि पहिलीच शिर्षकात्मक कविता. मानवी स्वभावाचे दर्शन घडवून आणते. माणसाचा हावरट, लोभी, स्वार्थी  स्वभाव, मानवी प्रवृत्ती हे पर्यावरणातील इतर सजीवांच्यापेक्षा वेगळं वैशिष्ट्य म्हणता येईल. म्हणून कवी बोढेकरजी म्हणतात _

     "त्या खंजरीलं चमडा होता घोरपडीचा
     मनून कलदार नाई चिकटला 
     अना मानसाचा चमडा खंजरीलं लावला असता तं ????? 
     कलदार खाली पल्ला असता का...? 
     चिकटला असता का नाई...? "

       या जीवसृष्टीमध्ये प्रत्येक जीवजंतू आपलं जीवन जगत असताना त्या मोबदल्यात काही ना काही देतच असतो. तो नष्ट झाल्यावरही कोणत्या ना कोणत्या रुपात उरलेला असतो. मानवमात्राचं मात्र तसं नसतं. तो त्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत जगण्याची इच्छा ठेवून सतत धडपड करीत असतो. आहे त्यापेक्षा अधिक मिळवण्याच्या प्रयत्नात असतो. आणि हे सारं नश्वर आहे हे ज्ञात असुनही तो असाच वागतो हे फार चिंतनातून बोढेकर सरांनी खंजरी ह्या कवितेत मांडलं आहे. 

       आणखी या कवितासंग्रहातील  'बुळवने लोक', 'बरमदेव', 'बिबट्या', 'गाय,' 'महाकवी,' 'टाईमपास,' 'गांदीगीरी,' 'आंदी,' 'सिरी तुकाराम दादा,' 'माजा बाप,' 'ग्राम विकास,' 'जनसाइत्तिक,' 'स्पर्धा,' 'लगन,' 'फायरींग,' 'बालपनी,' 'पेलूर गांव,' 'वाळबईल,' 'घर,' 'देज,' 'पीएचडी,' 'फटाका,' 'मुसका,' 'झाडीतल्या नाटका,' 'अनंदभान' अशा मनोरम अशा  ग्रामीण संस्कृतीशी निगडित कितीतरी सुंदर सुंदर कविता तसेच सामाजिक आशयाच्या कविता ह्या काव्यसंग्रहा आल्या आहेत. 

       गावगाड्यातल्या  सामान्य, साध्यासुध्या माणसांना हुशार लोक कसे बुडवतात, कसे ठगवतात आणि साधा माणूस कोर्टाची पायरी चढायला भितो हे माहीत असते. म्हणून साधी मासं कोर्ट कचेरीच्या भानगडीत पडत नाही. हे सांगताना _

     "कोण करावा कटकट 
     अना कोरटाची पायरी चढावा पूना
     आवबे लड्डू जावबे लड्डू साटी
     आपल्याच खिशालं लागते चूना... "

      "मालं बी त्याचं मनना पटला
      अना उदारीचा पोतीपुरान
      ईरइ नदीत बुडऊन देल्ला.... "

असे संगी असतात हे  अस ग्रामीण जीवनातील नेहमीचे प्रसंग श्री. बोढेकर सरांनी खुबीने 'बुळवने लोक' ह्या कवितेत मांडले आहेत. 
        
      विज्ञान तंत्रज्ञानाच्या बदलत्या युगात मानवाने आपल्या प्रगतीसाठी पर्यावरणाचा  फार मोठा विध्वंस चालविला आहे. जंगले नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे वन्यजीव गावाच्या अवतीभवती तर कधी गावात शिरु लागले आहेत. वाघांसारखे प्राणी नरभक्षी झाले आहेत. या कवितासंग्रहात 'बिबट्या' ही मार्मिक कविता गाय आणि बाबट यांच्यातील संवाद अधोरेखित करणारी ठरते. 
      "गावामंदी बिबट्या वाग दिसताबरोबर
      गाईच्या पायाची आग मस्तकामंदी गेली
       तिचा पारा गरम झाला
       अना लागली मांगं त्याच्या हात धुवून... 
       .... अना मनते कसी 'उबा राय बरा बिबट्या, गोट्या-पाट्या... 
           काल तूच होस ना, गावात आलास माज्या! अना माज्या वासराचा जीव घेतलास... 
     हा बिबट्या पळून जाऊन एका झाडावर बसतो आणि गाईला जे म्हणतो ते खरच वाचण्यासारखं आहे. 
       "तुलं माईत आये...? 
         मालं देस्याचा परानी मनतेत बरा. 
         माजा काइ कमीज्यास्त झाला
         तुज्या मालकाची बरीगत नाई होवाची... 
         अंदर जायेल तो जहलामंदी समजलीस..? 
.......  माज्या संगा सरकार आये
         तुज्यासंग कोन आये..? 
          आये का कोणी....? 
किती चिंतनशील आहे हे संवाद ! 

     त्याप्रमाणेच या कवितासंग्रहातील 'गाय'  ही कविता अस्वस्थ करून सोडणारी आहे. ह्यातील काही अंश.... 
      " वाग या देस्याचा परानी आये 
      अना वागीन त्याची माहारानी..." 
       गोम्या एकदम दचकला 

"भारत कास्तकाराईचा देस, 
हो ना वं मा...? 
खेतीसाटी तं गो माता बईल देते ना.. 
वाग तं दिसरं परानी खाते 
गावातलं मानसा मारते
कास्तकाराच्या या देस्यामंदी देस्याचा परानी
गाय पाईजे होती का नाई...? 
येती तं उलटा स्यापला आये.. "

  गोम्याच्या ह्या प्रश्नाने त्याची आई पुरती गांगरून जाते. ति गोंधळून जाते आणि ती म्हणते ते अतिशय कष्टप्रद असच आहे. ती गोम्याला म्हणते... 
    
 "या देस्यात कसाईलं काई कमी नाई
  ते गाईलं करतील बकरी अना 
  बहिणीलं मनतील काईबाई... 
  येती सर्वच चालते उलटा-पुलटा
  पतीव्रतेच्या गऱ्यात धोंडा 
   न पेळे खाई कुलटा..."  

  "गाय आमच्या देस्याची माय
   मरणाऱ्यायले पाजते दुद
   अना तीलं मारुन खातेत
  येतचे मसन्या उद... "

   "देस्याचा परानी ठरवाचा 
   तुज्या माज्या हातात नसं गोम्या !!! 
   हा तुजा ना माजा काम नोये
  जा, सरकारलच इचारना
  माजा कायले डोक्सा खातेस....!!!" 

   भोळ्याभाबड्या मायचं हे गोम्याला दिलेलं उत्तर मनाला चटका देऊन जातं. 

       'गांदीगिरी' आणि 'आंदी' ही प्रत्येकाला आश्वस्त करणारी कविता यात आहे. 

"महात्मा गांदी सप्पाईलं पायजे
कावून का तो सपापाईच्या खिशामंदी रायते. 
गांदीलं तं सप्पच मानते
पर त्याईलं कोनीच मानत नाई
जानत नाई पुसत नाई
वक्ता आली का आमीच
सिकवतून गांदीलं गांदीगिरी... 

अशीच काहीशी आज आपल्या देशातील स्थिती पाहावयास मिळत आहे. प्रत्येक राजकीय पार्ट्या सुद्धा आपल्या स्वार्थासाठी  गांधीजींच्या नावावर राजकारण करताना आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोच. 
कवी श्री. बोढेकर सर पुढे विदारक सत्य मांडतात _

"नोटावानी फाटून गेला सप्पा देस
रायला आता सायबी डरेस
अना फक्त दावतेत आपलीस टेस..." 

गांधीजींची ती प्रतिकात्मक तीन माकडं हल्ली कोठेच पाहायला मिळत नाही. 

   गांधीजींबाबत उलट सुलट बोलणाऱ्यांना कवी श्री. बोढेकर सर 'आंदी' मध्ये  म्हणतात_

"मी लोकायलं सांगतो
'अरे, तुमी गादीबाबालं
असा काई बाई बोला नोको
दुसऱ्यायच्या कुच्यानिंदा करना
बरोबर नोये
तुमी रावुन पाहा ना
उगळं-बोळकं दाहाक दिवस तरी...
रावुन पाहा ना पंच्यावर 
हाती काडी धरुनस्यानी
टक्कल करुन पाहा ना
तंबू च्याटी बनवाना
देस्यासाठी जेलची हवा खाहाना... 
मंग बोलाना गांदीवर... "

  " दुसऱ्यालं दोस देना सोपा आये भाउ
    गांदीसारका रावुन त पायना
    मंग दिसल तुमचा दिमाक 
    गांदी समजते का रे तुमालं...? 
    उमजते का गांदी..? 
    ते तं आये सप्प्या दुनयेची 
    आंदी......! 
अतिशय चिंतन करायला लावणारी ही कविता आहे. 
      मानवतेचे महान पुजारी युगप्रवर्तक वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या सोबत त्यांच्या सावलीप्रमाणे सोबत राहिलेले गुरुदेव सेवा मंडळाचे निष्ठावान सहकारी ग्रामगुरु श्री. तुकाराम दादा गीताचार्य यांच्या जीवनावरील सुंदर आणि उत्कट भावना जागृत करणारी 'सिरी तुकाराम दादा' ही कविता आध्यात्मिक आणि सामाजिक स्तरातील एक सुंदर अशा साहित्याचा नमुनाच म्हणावी लागेल. वंदनीय राष्ट्रसंत लिखित 'ग्रामगीता' प्रणित ग्रामराज्य ह्या देशात निर्माण व्हायला हवे ह्यासाठी त्यांनी आपली हयात घातली. अशाच सुंदर आशयाची ही कविता एक एक शब्द वाचून  मनाला स्पर्शून जाते. 
     कामातच राम शोधणारी 'ईचार' ही अभंग स्वरुपाची रचना जुने पारंपरिक खेळ, आणि आधुनिक काळातील मनोरंजनाच्या साधनांची रेलचेल ह्याची सांगड घालून पुर्वीचं जीवन व हल्लीचं आराम हरामी जीवन ह्या बाबींचं उत्तम वर्णन ह्या अभंगरुपी रचनेत सरांनी सुंदर मांडलं आहे. त्याचबरोबर आर्थिक,  सामाजिक, कौटुंबिक आणि  सांस्कृतिक, शेतीविषयक, शैक्षणिक अशा विविध स्तरावर सरांचं निरीक्षण विविध पैलू उलगडून दाखवणारं आहे. अशा आशयघन कविता त्यांच्या 'खंजरी' ह्या कवितासंग्रहात आलेल्या आहेत. ह्यातील सर्व कवितांना झाडीबोलीची सुंदर अशी किनार लाभल्यामुळे ह्या कविता पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटतात. हे तेवढच सत्य आहे. 
      आनंदात, आत्मरुपात, परमानंदात, न्हाऊनी निघालेली शेवटची कविता 'अनंदभान' रोमरोमात आनंद देऊन जाते. 

 पायलू तुमालं
देव दर्शन झाला
अना सप्पाई समजला 
तुमच्यापायी.... 

जिंदगीना देलन दान
हिर्दयामंदी आली जान
बोलीमंदी रमला मन
तुमच्यापायी.... 

जगन्याचा हा आरसा
मनाचा हा कानोसा 
घावावर हाच दवा
तुमच्यापायी.... 

दर्सनालं आसूसलू
तुमच्यासंगा उमललू
तुमच्यासाठी गयवरलू
तुमच्यापायी.... 

सप्पा आनंद आनंद 
भेटला आता बरमानंद 
झाला आता मन दंग
भरला आता अंतरंग 
अनंदभान.... अनंदभान.... 

    कसलाही गर्व नाही की अभिमानाची छाया नाही... सारं काही निर्लेप.... आत्मस्वरुपात दंग करणारी ही अप्रतिम अशी कविता खऱ्या अर्थाने जीवनगाणे शिकवून जाते. 

     असा सुंदर झाडीबोली असलेला 'खंजरी' हा काव्यसंग्रह वाचून मन पुलकित झालं. सरांचा हा काव्यसंग्रह म्हणजे झाडीबोलीचा अनमोल ठेवा आहे. सर असंच उत्तमोत्तम,  सकस, साहित्य आपल्या हातून निर्माण होत राहो यांसह पुढील काव्यप्रवासास आणि काव्यसंग्रहासाठी आपणांस आभाळभर हार्दिक शुभेच्छा..... 
 
                    आपलाच सस्नेहांकीत 
                राजेंद्र एन. घोटकर, घुग्घूस 
              संवाद - ९५२७५०७५७६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!