संगणक परीचालकांचे पंचायत समिती जिवती समोर धरणे आंदोलन

संगणक परीचालकांचे पंचायत समिती जिवती समोर धरणे आंदोलन


पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )


पळसगाव : - राज्यातील सर्व संगणक परीचालकाना महाराष्ट्र आय.टी. महामंडळात सामावून घेण्यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी काल दिनांक 28 ऑगष्ट 2019 ला सकाळी 10:00 ते 6:00 वाजे पर्यंत राज्यातील सर्व पंचायत समितीसमोर  एकाच दिवशी राज्यातील सर्व संगणक परीचालकांनी एकदिवसीय धरणे आंदोलन केले. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना, तालुका जिवती च्या  वतीने दिपक भारत साबने,तालुकाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना,जिवती यांच्या नेतृत्वात पंचायत समिती जिवती च्या समोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
         महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून 2011 पासून संग्राम व सध्या आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पात राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर संगणक परिचालक डिजिटल महाराष्ट्राचे काम करत आहेत. पण याच  संगणक परीचालकांना 1-1 वर्ष मानधन मिळत नाही. एवढेच नव्हे तर  आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने आपले  सरकार प्रकल्पाला निधी देण्यास ग्रामपंचायती सुद्धा विरोध करत आहेत. तसेच मागील 4 वर्षात राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता सुद्धा झालेली नाही. परिणामी संगणक परीचालकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. संगणक परिचालक हे पद निश्चित करून महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून नियुक्ती करणे या एकाच मागणीसाठी हिवाळी अधिवेशनादरम्यान मुंबई येथे आझाद मैदानावर 27 ते 30 नोव्हेंबर 2018 दरम्यान सलग 4 दिवस रात्रंदिवस राज्यातील संगणक परीचालकांनी आंदोलन केले होते. त्यामुळे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी 10 दिवसात बैठक घेऊन महाराष्ट्र आय. टी. महामंडळाकडून नियुक्ती देण्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते, परंतु अद्याप पर्यंत 8 महिने झाले तरी शासन स्तरावर वरून कुठलीही सकारात्मक हालचाल न झाल्याने संगणक परीचालकांनी अधिकच आक्रमक होऊन 19 आगस्ट 2019पासून  बेमुदत आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे.
        एकदिवसीय धरणे आंदोलनामध्ये दिपक साबने,तालुकाध्यक्ष, सलाम सय्यद अब्दुल हमीद, तालुकासचिव, विठ्ठल चव्हाण,उपाध्यक्ष व  जिवती तालुक्यातील सर्व ग्रामपंचयतीचे संगणक परिचालक सहभागी होते. मिसाळ सर गटविकास अधिकारी पंचायत समिती जिवती यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या 99 व्या जयंती निमित्त राजुरा विधानसभेचे आमदार संजय धोटे उपस्थित होते त्यांना पण निवेदन देण्यात आले. जो पर्यंत आय. टी. महामंडळात जो पर्यंत संगणक परीचालकाना सामावून घेणार नाहीत तो पर्यंत कामबंद चालूच राहणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष दिपक साबने व तालुकासचिव सय्यद सलाम यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!