विश्वं पुष्टं ग्रामे अस्मिन्ननातुरम

लेख.......
विश्वं पुष्टं ग्रामे अस्मिन्ननातुरम !
ग्रामगीतेचा स्फूर्तीझरा रूजविणारे "  १६ वे राज्यस्तरीय  राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन "
गोंदिया जिल्ह्यातील  चुलबंद नदीच्या तिरी वसलेल्या  
राका पळसगाव येथे नुकतेच राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन संपन्न झाले.  चंद्रपूरच्या राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने हे दोन दिवसीय संमेलन राष्ट्रसंताच्या विचारांची रूजवणूक  तसेच प्रचार प्रसारच्या दृष्टीने महत्त्वपुर्ण ठरले.     या संमेलनाचे पुर्वाध्यक्ष  दिवंगत कर्मयोगी लक्ष्मणदादा नारखेडे  यांचे नांव साहित्य  नगरी ला देण्यात आले होते .     नवजीवन विद्यालयात आयोजित या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध आदिवासी कवयित्री तथा राष्ट्रसंत साहित्याच्या अभ्यासक उषाकिरण आत्राम होत्या .  राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य वास्तववादी ,समाजोपयोगी आहे. त्यांनी आपल्या साहित्यातून मानवतेचा नंदादिप घरोघरी चेतविला. ग्रामगीता घरोघरी वाचायला हवी जेणेकरून प्रगतीशील भारताचे स्वप्न साकार होईल , असे प्रतिपादन त्यांनी उदघाटनाप्रसंगी  व्यक्त  येथे  केले. उदघाटन म.रा.साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य लखनसिंह कटरे  यांच्या हस्ते झाले. राज्य पंचायत राज तज्ञ समिती सदस्य चंदू पाटील मारकवार , गडचिरोली श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हा  अध्यक्ष डाॕ .शिवनाथजी कुंभारे , संमेलनाचे प्रेरक  ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , स्वागताध्यक्ष यशवंत दुनेदार , पुण्याचे गोवंश अभ्यासक  पंढरीनाथ चंदनखेडे , ग्रंथमित्र भाऊराव पत्रे , अड्याळ टेकडीचे डाॕ .नवलाजी मुळे,   मधुसुदन दोनोडे , सरपंच रेखाताई चांदेवार ,प्राचार्य पंडीत पुडके  आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती .  स्वागतपर भाषण  यशवंत दुनेदार यांनी केल्यानंतर बंडोपंत बोढेकर यांनी साहित्य संमेलनाची भूमिका मांडून राष्ट्रसंत साहित्य आजच्या जागतिकीकरणाच्या काळात समस्त मानवजातीला दिशादर्शक असल्याचे ते म्हणाले . उदघाटक श्री.कटरे  म्हणाले ,  राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांनी भारताला आर्थीक नितीचा मसूदा दिला. सरकारने ग्रामगीतेचे धोरण  स्विकारल्याशिवाय पर्याय नाही.चंदू पाटील याप्रसंगी म्हणाले , घाणीच्या विळख्यातून गावाला  स्वच्छ करून निर्मळ करायचे असेल तर हातात झाडू आणि डोक्यात राष्ट्रसंताचे विचार गेले पाहिजेत . राष्ट्रसंताच्या साहित्यातून माणूस जोडला गेला पाहिजेत . डाॕ .कुंभारे म्हणाले ,  राष्ट्रसंतानी सामुदायिक ध्यान व प्रार्थना ह्या उपासना सांगितल्या.त्याचा अवलंब प्रत्येकाने करावा . सूत्रसंचालन ॲड.राजेंद्र जेनेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन महेंद्र दोनोडे यांनी केले.


------ - - - - - - - - - - - -
याप्रसंगी ग्रामस्तरावर कार्य करणाऱ्या निवडलेल्या मंडळीस
राज्यस्तरीय सेवा पुरस्काराचे वितरण करण्यात आले.चैतन्य युवा पुरस्कार पवन पाथोडे , ताराचंद कापगते ,मोहनदास मेश्राम ,सौ.मंगला आखरे, सुधाकर कुर्वे , शुभम तुंडूलवार यांना प्रदान करण्यात आले तर  विशेष पुरस्काराअंतर्गत  राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज साहित्य विचारकृती पुरस्कार डाॕ .शिवनाथजी कुंभारे यांना , संत गाडगेबाबा प्रबोधन पुरस्कार सप्तखंजेरीवादक  उदयपाल वणीकर  यांना ,  सेवा पुरस्कार संजिव पोडे यांना, श्रीगुरूदेव कृषी सेवा पुरस्कार  चोपराम कापगते सिंदीपार यांना, भारतरत्न डाॕ . आंबेडकर विचार प्रचार पुरस्कार सौ.प्रमिला अलोणे यांना  , संत मंजुळामाता महिला सेविका पुरस्कार सौ.मुक्ताबाई हत्तीमारे  यांना , श्रीगुरूदेव भजन गायन पुरस्कार  सुकराम बनकर सितेपार यांना  , साने गुरुजी  लोकशिक्षक पुरस्कार  सुरज सयाम  गुरूजी यांना  ,नामदेव लोंढे स्मृती उत्कृष्ट नाट्य कलावंत चंदू पाथोडे सौदंड यांना  ,श्रीगुरूदेव श्रमश्री पुरस्कार  अनिल डोंगरे यांना  ,सावित्रीबाई फुले आदर्श विद्यार्थीनी  पुरस्कार  कु.कोमल बोरकर, कु.सानिया शेख यांना  ,कर्मयोगी श्रीतुकारामदादा गीताचार्य साहित्य पुरस्कार राहूल सिंधू पालतिया यांना , दिवं. प्रमोद दशमुखे स्मृती तंत्रशिक्षक पुरस्कार नारायण सहारे यांना, राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज मातृपितृ सेवा पुरस्कार भुमारेड्डी येल्टीवार यांना , महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार  संदीप कटकुरवार यांना  , पर्यावरण सेवा पुरस्कार  देवराव कोंडेकर यांना  , श्रीगुरूदेव सेवा पुरस्कार  सौ.कल्याणी दरेकर इत्यादींना प्रदान  करण्यात आला.
-- - -- - - - - - - - - - - - - - - - - -
क्षणचित्रे - १. राका गावातून राष्ट्रसंत साहित्यदिंडी काढण्यात आली होती .ग्रामगीता , संविधान ,तुकारामगाथा आदी ग्रंथ दिंडीत ठेवण्यात आले होते .२. साहित्यदिंडीत शालेय विद्यार्थी , भजन मंडळी , बँड पथक , गावातील  महिला वर्ग सहभागी झाले होते . गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले होते . ३. संमेलनात एकूण सात  पुस्तकांचे प्रकाशन झाले. सौ.प्रभा चौथाले (माझी माय ) , केवलचंद  शहारे (पिटारा ) , डोमा महाराज( उंबराचे फुल ) , बंडोपंत बोढेकर (हरिश्चंद्राची फँक्टरी ), अरूण  झगडकर ( आपली माणसं आपले शब्द ), विलास दशमुखे ( साहित्य विशेषांक) इत्यादींचा समावेश त्यात होता. ४. संमेलनाची शिस्त व शांतता वाखाणण्याजोगी होती . संमेलनात पुर्वाध्यक्ष लक्ष्मणदादा नारखेडे व  आदिवासी साहित्यिक सुन्हेर ताराम  यांना श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली.
- - - - - - - - - - - -
उदयपाल ची सप्तखंजेरी राका परिसरात दुमदुमली .
संमेलनाच्या सांयकाळच्या सत्रात सामुदायिक प्रार्थना झाल्यानंतर सप्तखंजेरीवादक वणीच्या   उदयपाल ने  अक्षरशः उपस्थित श्रोतेवर्गांना मोहित केले. ते म्हणाले , वैज्ञानिक दृष्टिकोन जीवनात अंगिकारा, आयुष्य समाधानाने जगा. मानवी जीवन उत्तमपणे जगायचे असेल तर प्रत्येकाने उत्तम शिक्षण घेतले पाहिजेत . राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज , वैराग्यमुर्ती गाडगेबाबा या परिवर्तनवादी संतांनी सांगितलेला    वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी उतरवला पाहिजे , असे रोकठोक  प्रतिपादन त्यांनी   येथे केले.
    याप्रसंगी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , स्वागताध्यक्ष यशवंत दुनेदार , श्रीकांत धोटे,  ॲड.जेनेकर , डाॕ .मुळे,  मधुसुदन दोनोडे  मंडळाचे सर्व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते .  सप्तखंजेरीचे लिलया वादन करीत उदयपाल म्हणाले , दुर्व्यसने दूर ठेवा ,ग्रामगीता ग्रंथाचे वाचन करा.चिंतन करा. कृती करा त्यातच प्रत्येकाचे कल्याण आहे.  जातीभेद हा समाजाला लागलेला कलंक आहे. मानव सारे एक आहे ,ही भावना समाजात रूजवा.
  वणीचे  सप्तखंजेरीवादक उदयपाल हे युवा प्रबोधनकार असून राष्ट्रसंताच्या ग्रामसुधारणावादी  विचारांची पताका सर्वदूर पोहचविण्याचे उत्तम कार्य करीत असल्याचे , याप्रसंगी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर म्हणाले . प्रास्तविक शाखाप्रमुख  यशवंत दुनेदार  यांनी केले तर सूत्रसंचालन नितीन बेंदवार  यांनी केले तर आभार उमेश चांदेवार यांनी मानले. कार्यक्रमाकरीता  राका  वासिय जनतेनी मोठी गर्दी केलेली होती . राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय " संत गाडगेबाबा प्रबोधनपर "  पुरस्कार  झाल्याबद्दल उदयपाल यांना प्रदान करण्यात आला.

दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात मी अनुभवलेली ग्रामगीतेची एक ओवी या  परिसंवादात सादर केला श्रीगुरूदेव सेवकांनी कार्यआढावा...... मी अनुभवलेली एक ओवी हा या संमेलनाचा महत्त्वाचा गाभा असून
ग्रामसुधारणेसाठी  कार्य करणाऱ्या  मंडळीसाठी राष्ट्रसंताची  ग्रामगीता ग्रंथ दिशादर्शक असल्याचे मत प्रा.डाॕ . प्रभाकर लोंढे ( गोंदिया)यांनी राका येथे व्यक्त केले. महाराष्ट्रातील विविध भागात कार्य करणाऱ्या श्रीगुरूदेव सेवकांनी आपला कार्यअहवाल  सादर केला. सौ.मंगला आखरे  (चंद्रपूर ) यांनी ते करीत असलेल्या   महिलाउत्थानाच्या कार्याची माहिती दिली तर पवन पाथोडे (  गांधीटोला )या युवकांनी गावात पुर्वी चालणारी बक-याची  बळीप्रथा कशी बंद केली यावर प्रकाश टाकला. गुलाबचंद खोब्रागडे  (बालाघाट म.प्र.) व  तीखे गुरूजी (घोटी ) यांनी ते घेत असलेल्या उन्हाळी बाल सुसंस्कार शिबीराची माहिती दिली. नामदेव पिज्दूरकर (मुल ) ,  दिवाकर मंडरे ( गोंडपिपरी ) यांनी आपल्या भागात ते घेत असलेल्या ग्रामगीता जीवन विकास परीक्षेचा आढावा घेतला. अर्जुन पायपरे , चंपत कावडकर  (चिंचोली ) , शंकर  पिंपळकर (निंबाळा ) इत्यादिनी  आपल्या गावात  स्वेच्छेने  होत असलेल्या स्वच्छता अभियानाची माहिती विषद केली. शैलेश कावळे ( रामपूर ), नानाजी देवाळकर (अंतरगाव ) यांनी आपण राबवित  असलेल्या ग्रामसुधारणावादी कार्याची माहिती उपस्थित प्रतिनिधीनां दिली. या परिसंवादात एकूण २०  कार्यसेवकांनी आपले संकल्पपूर्ती  पुष्प अर्पण केले.  याप्रसंगी विचारपिठावर  प्रफुल जोगी( वरोरा ), सतिश लोंढे  राजेंद्र आखरे , आण्याजी ढवस, राजेंद्र घोटकर ( घुग्घुस ), सौ. लोंढे , संदीप  कटकुरवार ( ब्रम्हपुरी ) , तिमाजी कोरे ( कोकणा ) आदी मान्यवरांची उपस्थिती होती .
   गावागावासी जागविणारी ग्रामगीता या दुसऱ्या  वैचारिक परिसंवादाचे अध्यक्ष अहेरीचे  कवी श्रीकांत धोटे  होते . सहभागी वक्ते पुणे येथील गोवंश तथा निसर्ग शेतीचे  अभ्यासक पंढरीनाथ चंदनखेडे , देवरी येथील  प्राचार्य धनराज हुकरे , बल्लारपूर येथील प्रा. श्रावण बानासुरे सहभागी झालेले होते . या परिसंवादात सहभागी सर्व वक्त्यांनी विषयानुरूप मांडणी करत ग्रामगीतेची उपयोगीता आजच्या जागतिकीकरणाच्या काळात कशी आहे ,हे उपस्थितांना  वेगवेगळे उदाहरणे देत पटवून दिले. सूत्रसंचालन संजय चांदेवार यांनी केले तर विलास चाकाटे यांनी आभार मानले. श्रीगुरूदेव सेवा मंडळाच्या तत्त्वज्ञानाचे अनुषंगाने सकाळी सामुदायिक ध्यानपाठ झाल्यानंतर निसर्गोपचार तज्ज्ञ डाॕ .नवलाजी मुळे यांनी योग शास्त्राची माहिती देत  उत्तम मानवी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या  निसर्गोपचार टिप्स दिल्यात . संमेलन स्थळी महाराष्ट्र नशाबंदी मंडळातर्फे  गांधीवादी कार्यकर्ते  संदीप कटकुरवार यांनी  व्यसनमुक्ती संदर्भात चित्रप्रदर्शनी लावली होती . त्या प्रदर्शनीचे  अवलोकन  शालेय विद्यार्थी , पालकवर्गानी  केले.संमेलनाच्या निमित्ताने साहित्य विक्रीचे स्टाल मोठ्या प्रमाणात लावले होते . सामुहीक   राष्ट्रवंदना गायनाने  आणि सहभोजनाने संमेलनाची सांगता झाली.
संमेलनाचा समारोप.....
चार ठराव पारित , उत्कृष्ट  संत साहित्यावरील पुरस्काराला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असे नांव द्यावे ....
१६ व्या राज्यस्तरीय  राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचा समारोप प्रसंगी संमेलनाध्यक्ष उषाकिरण आत्राम , ज्येष्ठ साहित्यिक तथा  संशोधन महर्षी  डाॕ .हरिश्चंद्र बोरकर , उद्योगपती नवलजी अग्रवाल , समाजसेवी रमेश खंडेलवाल  , ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर ,प्रेमलाल पारधी , आदर्श शिक्षक रतिराम  शिवणकर  , संमेलन समितीचे  सरचिटणिस  ॲड. राजेंद्र जेनेकर ,उपसरपंच वसंत उपरीकर , स्वागताध्यक्ष यशवंत दुनेदार , कार्याध्यक्ष मधुसुदन दोनोडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती . याप्रसंगी डाॕ .हरिश्चंद्र बोरकर म्हणाले , पृथ्वीचा स्वर्ग व्हावा , ही राष्ट्रसंताची इच्छा होती म्हणून त्यांनी सांगितलेल्या विचारानुसार आचरण करावे लागेल . संमेलनाचे प्रेरक बंडोपंत बोढेकर म्हणाले , गर्द  झाडीपट्टीत झालेले हे संमेलन राष्ट्रसंताच्या स्मृती जागवत  नवी उर्जा प्रदान करणारे ठरले आहे. संमेलनास सहकार्य श्रीकांत प्रतापवार , महेश सावलानी , नामदेव गेडकर , महेंद्र दोनोडे , गुलाबचंद खोब्रागडे, प्रा.बानासुरे ,प्रा.संदीपान जोगी ,डाॕ .मारगाये, विलास चाकाटे   आदी दहा मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. ठरावाचे वाचन ॲड. जेनेकर यांनी केले.आभार प्रदर्शन मधुसुदन दोनोडे यांनी केले.
-- - - - - - - - - - - - - - - - -
सर्वानुमते पारित  झालेले ठराव ...१. शासनाने उत्कृष्ट संत साहित्यावरील ग्रंथासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य पुरस्कार सुरू करावा .
२. शासनाने ग्रामगीतेचे प्रकाशन झालेल्या तुमसर नगरीत राष्ट्रसंत साहित्य संशोधन व अभ्यास केंद्र स्थापन करण्यात यावे.
३. अध्यासनातील   विद्यार्थ्याची वानवा दूर व्हावा याकरिता  प्रत्येक महाविद्यालयातून किमान दोन विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पाठविण्याची सक्ती विद्यापीठानी करावी .४ . शासनाचा मंगेश पाडगावकर  भाषा संवर्धक पुरस्कार मिळाल्याबद्दल डाॕ . बोरकर यांचा गौरव करीत आहे.
एकदंरीत गर्द झाडीपट्टीत संपन्न झालेले राष्ट्रसंताचे  मानवतावादी परिवर्तनवादी विचारधन जनमानसात रूजविण्यासाठी तसेच स्फूर्तीदायी   ठरले आहे. जय गुरूदेव !!.......
    **** बंडोपंत बोढेकर ,ग्रामगीताचार्य मु.पो.गडचिरोली (महाराष्ट्र )

३ टिप्पण्या:

झिंदाबाद!