मौशीखांब येथे झाडीबोली साहित्य मंडळाच्या शाखेचे उद्घाटन
मौशीखांब येथे झाडीबोली साहित्य मंडळाच्या शाखेचे उद्घाटन
मौशीखांब (प्रतिनिधी):
रामायण कालीन रावण पूत्र मेघनाथ यांचे महाराष्ट्रातील एकमेव मंदीर असलेल्या तसेच सांस्कृतिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या मौशीखांब गावातील कै. निलकंठराव समर्थ सार्वजनिक वाचनालयात झाडीबोली साहित्य मंडळाच्या शाखेचे उद्घाटन समाजसेवी व्यक्तीमत्व प्राचार्य पंडीत पुडके यांच्या हस्ते झाले. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दूल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. अध्यक्षस्थानी रौप्य महोत्सवी झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. ज्येष्ठ कवयित्री सौ.कुसूमताई अलाम, शिवकवी ईश्वर मते, वाचनालयाचे ग्रंथपाल पांडुरंगजी समर्थ, झाडीबोलीचे जिल्हासचिव कमलेश झाडे, लालाजी कुकडकार, राजेंद्र भुरसे, पाललाल सिडाम, सोनटक्के गुरूजी आदींची प्रमुख उपस्थिती होती .प्रास्तविक पांडुरंग समर्थ यांनी केले. उद्घाटक पंडीत पुडके याप्रसंगी म्हणाले, साहित्य माणसाच्या उपयोगाचे असले पाहिजे, जेणेकरून चांगल्या विचारांचा समाज घडला पाहिजे. शिवकवी ईश्वर मते म्हणाले, स्वतःला व्यक्त होण्यासाठी कविता प्रभावी माध्यम आहे. अस्मिता जीवंत ठेवण्यासाठी बोली चळवळ वाढली पाहिजे. कुसूमताई अलाम यांनी मराठी भाषेचे सौंदर्य बोलीवर अवलंबून आहे. त्याकरिता बोली जीवंत राहिल्या पाहिजेत. कार्यक्रमाध्यक्ष बंडोपंत बोढेकर म्हणाले, साहित्य समाजजीवनाचा आरसा आहे. अबोल समाज बोलका करण्याचे कार्य ह्या झाडीबोली चळवळीने केले आहे. मौशीखांब शाखेची स्थापना केल्याबद्दल निमंत्रक पांडुरंग समर्थ यांचा शाल व ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.सूत्रसंचालन कमलेश झाडे यांनी केले तर आभार राजेंद्र भुरसे यांनी केले. उपस्थित विद्यार्थी मंडळीनी व अतिथीनी काव्यवाचन केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!