खरीप हंगामाचे नियोजन गांभिर्यपूर्वक करा - पालकमंत्री सुधिर मुनगंटीवारचे निर्देश

खरीप हंगामाचे नियोजन गांभिर्यपूर्वक करा 
- पालकमंत्री सुधिर मुनगंटीवारचे निर्देश
खरीप हंगाम 2016-17 चे नियोजन गांभिर्यपूर्वक करण्याचे निर्देश चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी कृषी विभागाला दिले. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन येथे आज खरीप हंगाम आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, आमदार शोभाताई फडणवीस, आ.नानाजी  शामकुळे, आ .सुरेश धानोरकर, आ. संजय धोटे, जिल्हाधिकारी डॉ.दिपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व जि.प.उपाध्यक्ष कल्पना बोरकर  उपस्थित होते.
या बैठकीत पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी कृषी संबंधी विविध योजना व खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा घेतला. सन 2016-17 मध्ये खरीप हंगामाकरीता 4 लाख 60 हजार 100 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये भात 1 लाख 72 हजार, सोयाबिन 80 हजार, कापूस 1 लाख 55 हजार व तुर 45 हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे.  जिल्हयास विविध पिकाकरीता एकूण 86 हजार 382 क्विंटल बियाणाची आवश्यकता आहे. खरीप हंगामाकरीता 1 लाख 13 हजार 900 मॅट्रीक टन रासायनिक खताचे आंवटन असून जिल्हयास 2611 मेट्रीक टन खत प्राप्त झाले असून 200 मेट्रीक टन खताची विक्री झालेली आहे. 28146 मेट्रीक टन रासायनिक खत शिल्लक आहे.
पेरणीचे नियोजन, बॅंकनिहाय कर्ज वाटप, कर्ज पुर्नगठन, राष्ट्रीय कृषी पिक विमा योजना, मागेल त्याला शेततळे, प्रलंबित जोडण्या, बियाणाची उपलब्धता, खते किटकनाशके आदि विषयाचा या बैठकीत आढावा घेण्यात आला.  मागेल त्याला विहीर या अंतर्गत जिल्हयात 5 हजार विहीरीचा लक्षांक ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. योजना राबवित असतांना किंवा कामाचे नियोजन करीत असतांना काही अडचण आल्यास ते लेखी स्वरुपात कळविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावर्षी पाऊस चांगला असल्याचा अंदाज वर्तविला जात असून हा खरीप सुगीचा जाईल असे नियोजन करावे असे त्यांनी सांगितले.
शेतकरी स्वाभिमान वर्ष राबवित असतांना शेतक-याला दिला मिळेल अशा प्रकारे खरीपाचे नियोजन असावे अशा सूचना त्यांनी दिल्या. या बैठकीत कृषी विषयी अनेक मुद्दयावर चर्चा करण्यात आली आहे.  बैठकीचे संचालन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. हसनाबादे यांनी केले. या बैठकीस विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.