अजून किती संसार फाडणार?'


स्वामिनींचा मुख्यमंत्र्यांना सवाल : दारूबंदीसाठी पदयात्रा उद्यापासून

नागपूर
: "मुख्यमंत्री भाऊराया, या फाटक्‍या साडीसारखे अजून किती संसार फाडणार आहात?' असा संदेश लिहिलेल्या फाटक्‍या साड्या व्हेरायटी चौकातील शहीद आदिवासी गोवारी उड्डाणपुलावर व खांबाला बांधून यवतमाळच्या स्वामिनींनी मुख्यमंत्र्यांना दारूबंदीची विनवणी केली.
हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी यवतमाळ जिल्हा दारूबंदी करावी. याकरिता स्वामिनी जिल्हा दारूबंदी अभियान यवतमाळच्या पदाधिकाऱ्यांनी फाटक्‍या साड्यांवर संदेश लिहून शहरातील व्हेरायटी चौकात बांधल्या. यासोबतच यवतमाळ ते नागपूर पदयात्रा काढून यवतमाळ जिल्हा दारूबंदी करावी, अशी मागणीही शासनाला करण्यात येणार आहे. यासाठी यवतमाळ येथील कळंबवरून शुक्रवारी (ता. 4) पदयात्रेला सुरुवात होईल व बुधवारी (ता. 9) नागपूरमध्ये दाखल होईल, अशी माहिती स्वामिनी जिल्हा दारूबंदी अभियान यवतमाळचे संयोजक महेश पवार यांनी दिली.

यवतमाळ जिल्हा दारूबंदीसाठी शासनाची उदासीनता लक्षात घेता, स्वामिनी जिल्हा दारूबंदी अभियानाच्या नेतृत्वात विविध संघटनांतर्फे पदयात्रा काढण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्हा दारूबंदी समिती, दारूबंदी आंदोलन समिती, गुरुदेव सेवा मंडळ, युवा परिवर्तन मंच, राष्ट्रीय युवा संघटन, दिलासा संस्था, विकासगंगा संस्था, ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट, श्री गुरुदेव सेना जिल्हा दारूबंदी अभियान आदी संघटना या अभियानामध्ये सहभागी होणार आहेत. या वेळी सर्व संघटनांतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात येईल. यवतमाळ जिल्हा संपूर्ण दारूबंदी घोषित करण्यात यावी, दारूबंदी संदर्भातील कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, शासनातर्फे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, इतर शासकीय व अशासकीय गट यांच्या माध्यमातून दारूचे दुष्परिणाम लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता प्रभावी जनजागृती अभियान चालवावे, दारूबंदी आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांवर खटले चालू असल्यास वा त्या कारणास्तव अटक झाली असल्यास ते खटले मागे घेण्याची व अटकेत असलेल्यांची सोडवणूक करण्याची कायद्याने तरतूद करावी, अवैध दारूनिर्मिती करणारे व विक्रत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, दारूबंदी असलेल्या जिल्ह्यांच्या सीमेवर विशेष पोलिस पथकाची नेमणूक करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले जाईल, असेही पवार यांनी सांगितले.