बनावट खतविक्री प्रकरणातील आरोपीस अटक

ब्रम्हपुरी, - बनावट खतांची विक्री करुन शेतकऱ्यांची लुबाडणूक केल्याप्रकरणी चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ब्रम्हपुरी येथील एका युवकास अटक केली आहे. गिरीश पांडुरंग चालखुरे(४३) असे आरोपीचे नाव आहे.
दरवर्षी खरीप हंगामात रासायनिक खताचा काळाबाजार होत असतो. शेतकऱ्यांना हंगामाच्या वेळी खताची आवश्यकता असल्याने तेही जादा रक्कम मोजून खत खरेदी करीत असतात. शेतकऱ्यांच्या या असाहाय्यतेचा फायदा घेत काही बोगस कंपन्यांनी खुल्या बाजारात खतविक्री करणे सुरु केले होते. २०१३ मध्ये ब्रम्हपुरी येथील गिरीश चालखुरे याने अशाच एका कंपनीचा एजंट बनून ग्राहक जमविले. संबंधित कंपनीने त्या शेतकरी ग्राहकांना खत विकले. परंतु पुढे हे खत बनावट असल्याचे लक्षात येताच काही ग्राहकांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार गिरीश चालखुरे याच्यावर ब्रम्हपुरी पोलिसांनी अपराध क्रमांक ३०९८/ १३, कलम ३(२)(डी) जीवनावश्यक वस्तू अधिनियम, तसेच खत नियंत्रण आदेश १९८५ च्या खंड ५, १९(सी)(६) खंड ७ अन्वये गुन्हा दाखल केला होता. परंतु याप्रकरणी तत्कालिन ठाणेदाराची भूमिका संशयास्पद वाटल्याने काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा तपास चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे द्यावा, अशी मागणी पोलिस अधीक्षकांकडे केली होती. शिवाय केंद्रीय खते व रसायनमंत्री हंसराज अहीर यांच्याकडेही तक्रार करण्यात आली होती. श्री.अहीर यांनी हे प्रकरण शेतकऱ्यांशी संबंधित असल्याने थेट मुख्यमत्र्यांना लक्ष घालण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्याचे आदेश दिल्यानंतर या शाखेच्या अधिकाऱ्यांनी गिरीश चालखुरे यास अटक केली. त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान तपासाला गती आल्याने या प्रकरणातील अन्य आरोपींनाही लवकरच अटक केली जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.