दारूबंदीसाठी महिलांचे मुंडेंना निवेदन

नागपूर : विदर्भाची पंढरी असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात दारूबंदीच्या मागणीसाठी अस्तित्व संघटनेतर्फे गुरुवारी मोर्चा काढून महिलांनी मुंडन केले. मुंडन केलेल्या महिलांनी आज विधान भवनावर धडकून महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात दारूबंदीची करण्याची मागणी केली.
बुलडाणा जिल्हा आई जिजाऊंचे जन्मस्थान आहे. संतनगरी शेगावही याच जिल्ह्यात आहे. यानंतरही या जिल्ह्यात दारूचा महापूर आला आहे. दारूमुळे जिजाऊंच्या लेकींचे संसार उद्‌ध्वस्त होत आहेत. तरुणही व्यसनाधीन होत आहेत. महात्मा गांधींची जन्मभूमी असलेले गुजरात राज्य आणि कर्मभूमी वर्धा येथे कोणत्याही आंदोलनाशिवाय दारूबंदी करण्यात आली. मग मातृतीर्थ व विदर्भपंढरी म्हणून बुलडाणा जिल्हा दारूमुक्त का होऊ नये, असा प्रश्न या महिलांनी उपस्थित केला. संघटनेच्या अध्यक्षा प्रेमलता सोनोने व विमल भाटकर यांनी ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन विषय त्यांच्यापुढे मांडला. अन्य मंत्र्यांचीही भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन सादर केले. जिजामाता जन्मोत्सव दिनी बुलडाणा जिल्ह्यात दारूबंदी करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या महिलांनी दिला.