कौशल्याच्या बळावर रोजगारनिर्मिती करा; युवकांनी स्वावलंबी व्हावे


नागभीडच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पदवीदान समारंभ; मान्यवरांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
नागभीड : शिक्षणासोबतच संस्कार आणि विनम्रतेची सांगड घाला. असे केल्यास तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आपल्यातील बुद्धिमत्ता आणि कौशल्याचा उपयोग रोजगारनिर्मितीसाठी करणे हीदेखील एक प्रकारची देशसेवाच आहे, असे प्रतिपादन संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष अजय काबरा यांनी केले.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागभीड येथे अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै/ऑगस्ट २०२६ मध्ये उत्तीर्ण झालेल्या तसेच संस्थास्तरावर अव्वल गुणांकन प्राप्त केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेविका तथा संस्थेच्या महिला तक्रार निवारण समितीच्या सदस्य सौ. प्रियाताई लांबट प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या, तर कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, नागभीडचे प्राचार्य प्रा. देविदास भाऊ चिलबुले प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना सौ. प्रियाताई लांबट म्हणाल्या की, पारंपरिक पदवी घेऊन नोकऱ्या शोधण्यापेक्षा कौशल्याधारित शिक्षण घेऊन युवकांनी स्वावलंबी बनावे. आजच्या काळात कौशल्याधिष्ठित शिक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करावा.
प्रमुख वक्ते प्रा. देविदास चिलबुले यांनी युवकांच्या कल्पनाशक्ती आणि उद्योजकतेवर प्रकाश टाकला. आपल्या कल्पनाशक्तीतून विविध नाविन्यपूर्ण व्यवसाय उभारण्याची ताकद युवा पिढीमध्ये आहे. परिश्रमासोबत योग्य प्रयत्नांची जोड दिल्यास यश निश्चित मिळते. शिक्षण आणि परिश्रमातून मिळविलेल्या पदवीचा उपयोग व्यवसायनिर्मितीसाठी करून त्यातून समाजसेवा करण्याचा प्रयत्न युवकांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाला उपप्राचार्य बोरकर सर, नंदागवळी सर, वांदिले सर, वाराणसीवार मॅडम यांच्यासह संस्थेचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मेश्राम सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन नंदेश्वर मॅडम यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!