"त्या" सभागृहाचा ताबा नगरपरिषदेने दिला- नवदुर्गा समितीचा खुलासा
सामाजिक सभागृहाच्या ताब्याबाबत जय मा नवदुर्गा समितीचा खुलासा; नगरपरिषदेच्या २०१२ च्या आदेशाचा दिला दाखला!
सभागृहाचा ताबा देखभाल व दुरुस्तीसाठी अधिकृतपणे दिल्याचा दावा; कार्यक्रमांतून मिळणाऱ्या रकमेतून वीजबिल व देखभालीचा खर्च भागवित असल्याची समितीची माहिती
मूल : वॉर्ड क्रमांक ८ मधील दुर्गामाता मंदिर व सामाजिक सभागृहाच्या व्यवस्थापनावरून सुरू असलेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणी जय मा नवदुर्गा बहुउद्देशीय सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करीत सभागृहाचा ताबा अनधिकृत नसल्याचा दावा केला आहे. मूल नगरपरिषदेने ३० जून २०१२ रोजी दिलेल्या लेखी आदेशानुसार सभागृहाचा ताबा देखभाल व दुरुस्तीसाठी समितीकडे सोपविण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
याबाबत स्थानिक रहिवाशांनी केलेली तक्रारीची बातमी पब्लिक पंचनामा मध्ये प्रकाशित होताच समितीचे पदाधिकाऱ्यांनी याबाबत आपला खुलासा पब्लिक पंचनामाकडे दिला आहे.
समितीच्या म्हणण्यानुसार, संबंधित जागा ले-आऊटमधील असून, सुरुवातीला या जागेचा सातबारा ले-आऊट मालकांच्या नावे होता. मात्र, जय मा नवदुर्गा बहुउद्देशीय सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन सदर सातबारा नगरपरिषदेच्या नावे करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे या जागेच्या मालकी व व्यवस्थापनासंदर्भातील वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक असल्याचे समितीने म्हटले आहे.
आज सभागृहाच्या ताब्याबाबत आक्षेप घेणारे काहीजण पूर्वी जय मा नवदुर्गा बहुउद्देशीय सेवा समितीमध्ये कार्यरत असतानाही सभागृह समितीच्याच ताब्यात व व्यवस्थापनाखाली होते, असा दावा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे सध्या उपस्थित करण्यात येणारे आक्षेप वस्तुस्थितीला धरून नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
सभागृहात लहान-मोठे सामाजिक व खासगी कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांतून मिळणारी थोडीफार रक्कम ही कोणत्याही वैयक्तिक फायद्यासाठी नसून, सभागृहाचे वीजबिल भरणे तसेच नियमित देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी खर्च केली जाते, अशी माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
सार्वजनिक सभागृहाची देखभाल, स्वच्छता, वीजबिल आणि दुरुस्तीचा खर्च भागविण्यासाठी काही आर्थिक तरतूद आवश्यक असते. त्यासाठी कार्यक्रमांतून मिळणाऱ्या रकमेतून खर्च केला जात असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या प्रकरणात एका संस्थेने अनधिकृत ताबा व व्यावसायिक वापराचे आरोप केले आहेत, तर दुसरीकडे जय मा नवदुर्गा बहुउद्देशीय सेवा समितीने नगरपरिषदेच्या ३० जून २०१२ च्या लेखी आदेशाचा आधार घेत आपला ताबा अधिकृत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता नगरपरिषदेने संबंधित आदेश, जागेच्या मालकीची कागदपत्रे आणि सभागृहाच्या व्यवस्थापनाबाबतची अधिकृत नोंद तपासून वस्तुस्थिती स्पष्ट करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नगरपरिषदेचा २०१२ चा आदेश, जागेचा सातबारा आणि सभागृहाच्या व्यवस्थापनाची कागदपत्रे यावरूनच या वादातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!