अंगणवाडीच्या पोषण आहारातील झाडूच्या तुकड्याची अधिकाऱ्यांकडून चौकशी; नमुना प्रयोगशाळेत पाठविणार!
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - वरोरा तालुक्यातील शेगाव बु. येथील इंदिरानगर अंगणवाडी क्रमांक ६ मधून वितरित करण्यात आलेल्या लहान मुलांच्या पोषण आहाराच्या पॅकेटमध्ये झाडूचा तुकडा आढळल्याच्या धक्कादायक प्रकरणाची अखेर संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे. पालकांनी या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त करत तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी अंगणवाडीत भेट देत पोषण आहाराचा नमुना संकलित केला असून, तो प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती दिली.
शेगाव बु. येथील रहिवासी सचिन नरड यांच्या मुलीसाठी इंदिरानगर अंगणवाडी क्रमांक ६ मधून महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत (ICDS) 'मल्टिग्रेन न्यूट्री पफ' (Multigrain Nutri Puff) हे पोषण आहाराचे पॅकेट वितरित करण्यात आले होते. संबंधित पॅकेट उघडल्यानंतर त्यातील खाद्यपदार्थांमध्ये झाडूचा तुकडा आढळून आल्याने हा प्रकार उघडकीस आला. लहान मुलांच्या पोषणासाठी वितरित होणाऱ्या आहारात अशा प्रकारची वस्तू आढळणे ही अत्यंत गंभीर बाब असून, आहाराच्या गुणवत्ता नियंत्रणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पॅकेटवरील माहितीनुसार, संबंधित पोषण आहाराचे वजन २६० ग्रॅम असून बॅच क्रमांक N.PUFF-B04-20 असा आहे. हा पोषण आहार नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील जस्ट युनिव्हर्सल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत उत्पादित व पॅक करण्यात आल्याचे नमूद आहे. या घटनेनंतर पालकांनी संबंधित उत्पादक कंपनी, आहार पुरवठा यंत्रणा तसेच जबाबदार अधिकाऱ्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती.
पालकांच्या मागणीची प्रशासनाकडून दखल
या गंभीर प्रकाराची दखल घेत बाल कल्याण जिल्हा कार्यक्रम अधिकारी चंद्रपूर (तांबे) तसेच महिला समाज कल्याण अधिकारी, पंचायत समिती वरोरा (पारखी) यांनी दुसऱ्याच दिवशी संबंधित अंगणवाडीत भेट दिली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून संबंधित पोषण आहाराचा नमुना संकलित केला असून, तो नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.
प्रयोगशाळेतील तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो शासनाकडे सादर करण्यात येईल. अहवालातील निष्कर्षांनुसार पुढील योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
लहान मुलांच्या आरोग्याशी तडजोड नको!
अंगणवाडीच्या माध्यमातून लहान बालकांना वितरित करण्यात येणारा पोषण आहार हा त्यांच्या आरोग्य, वाढ आणि पोषणासाठी महत्त्वाचा असतो. अशा आहारात झाडूचा तुकडा आढळण्याची घटना केवळ निष्काळजीपणाचा प्रश्न नसून, पोषण आहाराची निर्मिती, पॅकिंग, गुणवत्ता तपासणी आणि वितरण प्रक्रियेतील सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी आहे.
आता प्रयोगशाळेच्या अहवालाकडे ग्रामस्थ व पालकांचे लक्ष लागले असून, चौकशी केवळ नमुना तपासणीपुरती मर्यादित न राहता संबंधित पुरवठा यंत्रणा आणि गुणवत्ता नियंत्रणाची सखोल तपासणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लहान मुलांच्या आरोग्याशी निगडित या प्रकरणात दोष आढळल्यास जबाबदार घटकांवर कठोर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!