चिमुरात वन्यजीव शिकारीच्या संशयावरून शेतकऱ्याला वनकोठडी

मादी अस्वल व तिच्या पिल्लाच्या मृत्यूप्रकरणी कारवाई; वाघाचे नखे, सुळे व हाडे काढल्याचाही वनविभागाचा आरोप

अखेर न्यायाल्याने दिली तीन दिवसांची वनकोठडी 

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - दि. २४ नोव्हेंबर २०२६  चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर वनपरिक्षेत्रांतर्गत वन्यप्राण्यांच्या मृत्यू व वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी केल्याच्या संशयावरून वनविभागाने फकीरा संभाजी रांदिवे (वय ४५, रा. ताडोळी, ता. चिमूर, जि. चंद्रपूर) यांना अटक केली आहे. या प्रकरणात चिमूर येथील न्यायालयाने आरोपीला दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत वनकोठडी सुनावली आहे.
वनविभागाकडून प्राप्त माहितीनुसार, दिनांक २३ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजता मौजा बोरगाव रोड परिसरातील सर्व्हे क्रमांक १० मधील शेतात मादी अस्वल व तिचे पिल्लू मृत अवस्थेत आढळून आले. प्राथमिक तपासात शेतात लावलेल्या जिवंत विद्युत तारांच्या संपर्कात आल्याने या दोन्ही वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.
सदर शेत यापूर्वी श्री. यादव दौलत गोटे यांनी तीन वर्षांच्या कराराने आरोपी फकीरा रांदिवे यांना शेतीसाठी दिले असल्याची माहिती वनविभागाने न्यायालयात सादर केलेल्या रिमांड अर्जात नमूद केली आहे.

याशिवाय, जुलै २०२६ मध्ये आरोपीने वाघाचे सहा नखे, दोन सुळे आणि एक हाड काढून ते विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःजवळ ठेवल्याचा आरोपही वनविभागाने केला आहे. या प्रकरणात वाघाचे उर्वरित अवयव हस्तगत करणे, इतर संभाव्य आरोपींचा शोध घेणे आणि वन्यजीवांच्या अवयवांच्या व्यवहारासंबंधी सखोल तपास करणे आवश्यक असल्याचे वनविभागाने न्यायालयासमोर सांगितले.

या प्रकरणी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ मधील कलम २(१६), ९, ३९, ५० व ५१ अन्वये वनगुन्हा नोंदविण्यात आला आहे. वनविभागाने आरोपीची सहा दिवसांची वनकोठडी मागितली होती. मात्र, आरोपीच्या वतीने अॅड. एस. जी. श्रीरामे यांनी बाजू मांडत आरोपी शेतकरी असून त्याला या गुन्ह्यात खोट्या पद्धतीने गोवण्यात आल्याचा युक्तिवाद केला. तसेच वनकोठडीची मागणी फेटाळण्याची विनंती केली.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर चिमूर येथील न्यायिक दंडाधिकारी प्रथम श्रेणी यांनी आरोपीला दिनांक. २७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत वनकोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

या प्रकरणाचा पुढील तपास वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक) श्री. एम. बी. गायकवाड करीत आहेत. वन्यजीवांच्या मृत्यूमागील नेमके कारण, कथित अवयवांची तस्करी आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास आता वनविभागाकडून केला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!