एकल महिलांच्या हस्ते ‘जाणीव रुग्णालय’ बांधकाम भूमिपूजन - सोबत फाउंडेशनचा अनोखा सोहळा
एकल महिलांच्या हस्ते ‘जाणीव रुग्णालय’ बांधकाम भूमिपूजन - सोबत फाउंडेशनचा अनोखा सोहळा
सावली :- सोबत फाउंडेशन, चंद्रपूर संचालित ‘जाणीव रुग्णालय’ वास्तू व संस्थेच्या परिसराचा भूमिपूजन सोहळा ११ एकल महिलांच्या हस्ते उत्साहात पार पडला. एकल महिलांना सार्वजनिक धार्मिक कार्यात अवहेलना करीत असतांना एकल महिलांचे हस्ते भूमिपूजन करीत सन्मानाचे स्थान दिल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘सर्च’ संस्थेचे संचालक तथा ‘निर्माण’ उपक्रमाचे प्रमुख अमृत बंग होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सूरज म्हस्के, उपाध्यक्ष डॉ. जानकी गुरपुडे-म्हस्के, कोषाध्यक्ष डॉ. हर्षा नन्नावरे, विश्वस्त रिना दाजगयाये, डॉ. पराग राऊत, डॉ. अमित ढगे, गुरुदेव शेंडे, मयूर बारापात्रे, पोलीस पाटील, संजय रामटेके व तिलकभाऊ वाढणकर उपस्थित होते.
प्रास्ताविकात उपाध्यक्ष डॉ. जानकी गुरपुडे-म्हस्के यांनी संस्थेची स्थापना, ध्येय व आरोग्य-शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. अध्यक्ष डॉ. सूरज म्हस्के यांनी रुग्णालयाच्या प्रवासाचा आढावा घेत एकल महिलांच्या हस्ते भूमिपूजन करण्याचे औचित्य स्पष्ट केले. यावेळी संस्थेच्या परिसराला ‘सृजन वन’, तर रुग्णालयाच्या इमारतीला “वैराग्यमूर्ती गाडगेबाबा भवन” असे नाव देण्याची घोषणा करण्यात आली.
प्रमुख पाहुण्या श्रीमती कल्पना कुमदेव ठाकूर यांनी, “विधवा असल्यामुळे अनेक कार्यक्रमांत आणि घरच्या पूजेतही आम्हाला दूर राहावे लागते; मात्र आज भूमिपूजनाचा मान मिळाल्याने खूप आनंद झाला,” अशा भावना व्यक्त केल्या.
अध्यक्षीय भाषणात अमृत बंग यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत, ग्रामीण नागरिकांना गावातच परवडणाऱ्या दरात आरोग्यसेवा देणे हे मोठे ध्येय असल्याचे नमूद केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संजय रामटेके व तिलकभाऊ वाढणकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन . प्रतीक्षा जेंगटे यांनी केले, तर आभार डॉ. हर्षा नन्नावरे यांनी मानले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!