चिमूरमध्ये जनजातीय गौरव सप्ताह उत्साहात साजरा; आदिवासी स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाला अभिवादन!

बिरसा मुंडा जयंतीनिमित्त गोंडी संस्कृती, परंपरा आणि आदिवासी स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा जागर

शहर - प्रतिनिधी ( चंदू मडकवार )

चिमूर : - भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त केंद्र सरकार व आदिवासी विकास विभागाच्या निर्देशानुसार ११ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत जनजातीय गौरव सप्ताह साजरा करण्यात येत आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चिमूर यांच्या नियोजनातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या माध्यमातून आदिवासी स्वातंत्र्यवीरांचे योगदान, गोंडी संस्कृती, परंपरा आणि आदिवासी समाजाच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा देण्यात येत आहे.

या सप्ताहांतर्गत ११ व १२ नोव्हेंबर रोजी नवतळा येथे जागतिक गोंड सगा मांदी शाखेच्या वतीने विशेष मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. यावेळी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणारे शहिद शिरोमणी वीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी शंकरशहा मडावी, रघुनाथशहा मडावी, भीमू कुमरा, राणी दुर्गावती मडावी, टंट्या भिल, राघोजी भांगरे, उमाजी नाईक, अवंतीबाई लोधी, जबरा पहाडिया, प्रवीरचंद्र भंज देव कोवे, श्यामा दादा कोलाम, रामजी गोंड, मनिराम धानू गोंड यांच्यासह विविध आदिवासी स्वातंत्र्यवीरांच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठीच्या योगदानाची माहिती उपस्थितांना देण्यात आली. तसेच गोंडी संस्कृती, परंपरा आणि गोंड-गोंडी-गोंडवाना संस्कृतीचा ऐतिहासिक वारसा यावर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी सहायक प्रकल्प अधिकारी एम. व्ही. डुले यांनी आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली. या योजनांचा लाभ खऱ्या गरजू आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विभाग प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात तिरू. मनोजसिंह गोंड मडावी, अध्यक्ष गोंड समाज चिमूर यांनी आदिवासी स्वातंत्र्यवीरांचे योगदान, गोंडी संस्कृती आणि परंपरांचे महत्त्व सविस्तरपणे विशद केले. यावेळी आरिफ शेख व मिनोल सर उपस्थित होते. संचालन शामराव तुमराम यांनी, तर आभार गणेश कन्नाके यांनी मानले.

शहीद स्मारकांवर दीपोत्सव; वीरांना भावपूर्ण अभिवादन

जनजातीय गौरव सप्ताहाच्या निमित्ताने १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत चिमूर शहरातील स्वातंत्र्यसैनिक व शहीद वीरांच्या स्मारक परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. वीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके चौक (कांपा रोड), तसेच १९४२ च्या चिमूर स्वातंत्र्य संग्रामात हौतात्म्य पत्करलेल्या मनिराम गोंड, धानू गोंड व पैकू गोंड यांच्या प्रतिमा आणि चौकातील फलकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच गोंड मोहल्ला येथील रावेन मेढी गोटुलमधील शहीद वीरांच्या प्रतिमांनाही पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यानिमित्ताने चिमूर येथील शहीद स्मारके, गोंड मोहल्ला (गुढा) तसेच गोंडबहुल जामणी गावात महापुरुषांच्या स्मारकांसमोर भव्य दीपोत्सव आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चिमूरचे प्रशासक श्री. लक्ष्मीकांत खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. नागपुरे सर व श्री. भोपे सर यांनी आदिवासी विकास विभागाच्या योजना व रोजगार कार्डविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तिरू. मनोजसिंह गोंड मडावी होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी समाजाचे योगदान, विशेषतः १९४२ च्या चिमूर स्वातंत्र्य संग्रामातील गोंड समाजाच्या शहीद वीरांचे बलिदान आणि ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले. आदिवासी विकास विभागाच्या योजना समाजातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत व कमीत कमी कागदपत्रांच्या आधारे पोहोचविण्यात याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी गोंड मोहल्ला, चिमूर येथील गोंड समाजातील मुलींनी पारंपरिक गोंडी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या सांस्कृतिक सादरीकरणातून आदिवासी समाजाची समृद्ध कला, संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडले.

कार्यक्रमाला तिरू. विलास जुमनाके, कैलास अलाम, नानाजी उईके (माजी सरपंच), आषिष सिडाम, इंदरशहा मडावी, प्रमोद कोयचाडे, पंकज मडावी, दीपक कुमरे (जामणी), रामदास सयाम, कुणाल मडावी, प्रदीप कुमरे तसेच विलास पुसनाके (पांढरपौनी) यांच्यासह चिमूर, जामणी व पांढरपौनी येथील गोंड समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन दीक्षा कोयचाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अविनाश केराम यांनी मानले.

आदिवासी स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाची आठवण, गोंडी संस्कृतीचे जतन आणि शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा संदेश या जनजातीय गौरव सप्ताहाच्या उपक्रमांतून देण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!