करोडो रुपये खर्चूनही मृत्यूनंतरही 'नरकयातना'; भिसी नगरपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराचे 'स्मशान' दर्शन!
प्रतिनिधी - पंकज मिश्रा
भिसी : - विकासाच्या नावाखाली शासनाच्या करोडो रुपयांच्या निधीची उधळण करायची आणि प्रत्यक्षात मात्र नागरिकांच्या पदरी निराशाच टाकायची, हाच जणू भिसी नगरपंचायतीचा एककलमी कार्यक्रम झाला आहे. भिसी येथील चिमूर रोड लगत असलेल्या स्मशानभूमीच्या कायापालटावर कोट्यवधी रुपये खर्च करूनही, आजही रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या मृतात्म्यांना आणि नातेवाईकांना 'नरकयातना' भोगाव्या लागत आहेत. दिवाबत्ती, लाकूड आणि चौकीदाराअभावी येथील परिस्थिती अत्यंत दयनीय झाली असून, नगरपंचायतीच्या भोंगळ कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गाड्यांच्या हेडलाईटच्या उजेडात उरकला अंत्यविधी!
नुकतीच शनिवारी (दि. १४ नोव्हेंबर) रात्री ७ वाजताच्या सुमारास बेबीबाई गोमाजी बेले यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी या स्मशानभूमीत आणण्यात आले. मात्र, कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या या वास्तूत संपूर्ण अंधार पसरलेला होता. अंत्यविधीसाठी लाकडे रचायची कशी, असा गंभीर प्रश्न नातेवाईकांसमोर उभा राहिला. अखेर, हतबल झालेल्या नागरिकांनी स्मशानभूमीच्या सभोवताली चारचाकी वाहने उभी करून, त्यांच्या हेडलाईटच्या उजेडात लाकडे रचली आणि पुढील विधी पार पाडला. 'कोटींच्या उड्डाणांचे' ढोल बडवणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासनाला याहून मोठी चपराक ती काय असावी?
सौर दिवे शोभेचे, आश्वासने हवेत विरली
स्मशानभूमीचा परिसर प्रशस्त असून येथे शासनाचा निधी खर्चून सौर ऊर्जेचे दिवे (सोलर लाईट) बसवण्यात आले आहेत. मात्र, ते केवळ शोभेच्या वस्तू ठरले असून रात्रीच्या वेळी त्यातून प्रकाशाचा एक कणही पडत नाही. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर येथे अंत्यसंस्कारासाठी लाकडे उपलब्ध करून दिली जातील आणि देखरेखीसाठी कायमस्वरूपी चौकीदार नेमला जाईल, अशा वल्गना नगरपंचायत प्रशासनाने केल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र येथे ना लाकडे आहेत, ना चौकीदार, ना प्रकाश!
विकासाच्या नावाखाली निधीची लूट?
"नाव मोठे आणि लक्षण खोटे" अशी अवस्था सध्या भिसी नगरपंचायतीची झाली आहे. जिवंतपणी तर सोडाच, पण मृत्यूनंतरही नागरिकांना शांतता मिळू नये, यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय? जर करोडो रुपये खर्चूनही मूलभूत सुविधा मिळत नसतील, तर हा पैसा नेमका कोणाच्या घशात गेला, असा संतप्त सवाल आता भिसीकर विचारत आहेत. प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी तात्काळ या प्रकाराची दखल घेऊन स्मशानभूमीतील सुविधा सुरू कराव्यात, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!