नवरात्र महोत्सवात अश्लील भाषेचा वापर व धक्काबुक्की; पत्रकार संघाची कठोर कारवाईची मागणी!



मूल तालुका सरचिटणीस राजेंद्र वाढई यांच्या कुटुंबाशी संबंधित प्रकरण; जिल्हाध्यक्ष शंकर बोरघरे यांचे पोलिसांना निवेदन

मूल :- नवरात्र महोत्सवादरम्यान प्रसाद भोजनाच्या वेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मूल तालुका सरचिटणीस राजेंद्र वाढई यांच्या कुटुंबातील एका सदस्याशी अश्लील व आक्षेपार्ह भाषेचा वापर करून गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच राजेंद्र वाढई यांच्याशी धक्काबुक्की झाल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या चंद्रपूर जिल्हा शाखा व मूल तालुका शाखेने निष्पक्ष तपास करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
      तसेच १९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास टोलेवाई येथे नवरात्र महोत्सवानिमित्त आयोजित प्रसाद भोजनाच्या वेळी हा प्रकार घडला. टोलेवाई येथील पूजा कच्चेवार यांनी कांतापेठ येथील महिला शक्ती मंडळाच्या सदस्यांना भोजनासाठी आमंत्रित केले होते. यावेळी स्वप्निल कच्चेवार यांनी राजेंद्र वाढई यांच्या कुटुंबातील एका सदस्याशी अश्लील व आक्षेपार्ह भाषेचा वापर करून गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. या प्रकारादरम्यान राजेंद्र वाढई यांनाही धक्काबुक्की झाल्याचे समोर आले आहे.
     या प्रकरणी मूल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेची संपूर्ण सत्य परिस्थिती समोर यावी, यासाठी पोलिसांनी सखोल तपास करावा, अशी मागणी पत्रकार संघाने केली आहे.
     प्रसंगी घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या महिला शक्ती मंडळाच्या सदस्यांसह अन्य साक्षीदारांचे जबाब नोंदवावेत, उपलब्ध पुराव्यांची पडताळणी करावी आणि तपासात दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
      दरम्यान महिलांचा सन्मान, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि नागरिकांची सुरक्षितता जपली गेली पाहिजे. त्यामुळे या प्रकरणात कोणाचाही दबाव न घेता निष्पक्ष चौकशी करून संबंधित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी भूमिका पत्रकार संघाने घेतली आहे.
      या प्रकरणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शंकर बोरघरे, जिल्हा संघटक वहाब अली, मूल तालुका अध्यक्ष सतीश राजूरवार, तालुका उपाध्यक्ष प्रकाश चलाख, तालुका सरचिटणीस राजेंद्र वाढई, तालुका संघटक धर्मा सुत्रपवार, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष रोहित कामडे, पत्रकार राजू शंभरकर आणि पत्रकार सुधीर कन्नमवार यांनी निष्पक्ष तपासाची मागणी केली आहे.
      यावेळी जिल्हाध्यक्ष शंकर बोरघरे यांनी मूल पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांना निवेदन दिले असून, त्याची प्रत पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांनाही माहितीसाठी देण्यात आली आहे. आता या प्रकरणात पोलीस तपासातून काय निष्पन्न होते आणि पुढे कोणती कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!